Friday, 24 July 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 JULY 2020 TIME 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 July 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जुलै २०२० सायंकाळी ६.००
****
** शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा झपाट्याने वाढवाव्यात - मुख्यमंत्र्यांची सूचना
** औरंगाबाद शहरात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या सहा पटीने वाढवल्याने, कोविड संसर्गाचं निदान जलद - महापालिका आयुक्तांचा दावा 
** परभणी जिल्ह्यातल्या नागरी भागात आज सायंकाळपासून दोन दिवस संचारबंदी लागू 
** उच्च शिक्षणाच्या नियोजनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'कृती दल'स्थापन
आणि
** बीड जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह सापडला, दोघांचा शोध सुरू
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधा मर्यादित आहेत, त्या झपाट्याने वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त टास्क फोर्सचे डॉक्टर आणि मुंबईतल्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला, कोविड संसर्ग निदानासाठी मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणं हे एकमेव उद्दिष्ट असल्याचं, त्यांनी सांगितलं.
सर्व जिल्ह्यांत उपचारांमध्ये एकसुत्रीपणा आणि समानता असणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत, त्या झपाट्याने वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वांची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.  टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनीही यावेळी डॉक्टरांना मार्गदर्शन केलं.
****
औरंगाबाद शहरात कोविड संसर्ग चाचण्यांची संख्या सहा पटीने वाढवल्याने, कोविड संसर्गाचं निदान लवकर होत असल्याचा दावा, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. आज पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना, आयुक्तांनी नुकत्याच संपलेल्या नऊ दिवसांच्या टाळेबंदीच्या काळात चाचण्यांची संख्या पूर्वीच्या प्रतिदिन सातशे ते आठशेवरून दिवसाकाठी पाच हजारावर नेल्याचं सांगितलं. पूर्वी दररोज दीडशे ते दोनशे जणांना कोविड संसर्ग झाल्याचं निदान होत होतं, मात्र चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यानं गेल्या काही दिवसांपासून रुग्ण सापडण्याचं प्रमाण सुमारे दीडपटीने वाढल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातल्या प्रवेश नाक्यांवर सध्या बारा वैद्यकीय पथकं तर रेल्वे स्थानकावर दोन पथकं तैनात आहेत. पुढच्या महिन्यात ही संख्या २१ पर्यंत वाढवणार असल्याचं, आयुक्तांनी सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर गेल्या महिन्यातल्या १९ दिवसांवरून आता ३१ दिवसांवर गेला असल्याचं, आयुक्त पांडेय यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद इथं आज पाच कोरोना विषाणू बाधित पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये संघर्ष नगरातल्या ५५ वर्षीय, हर्सुल इथल्या ६० वर्षीय, घाटी निवासस्थानातल्या ५७ वर्षीय, हडकोतल्या ७६ वर्षीय आणि क्रांती नगर इथल्या ६७ वर्षीय पुरूष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ८९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले. यात महापालिका हद्दीतल्या ५९, ग्रामीण भागातल्या २५ आणि शहरातल्या प्रवेश नाक्यावरील जलद चाचणीत आढळलेल्या पाच रुग्णांचा समोवश आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता १२ हजार ४३६ झाली आहे. त्यापैकी सात हजार १७८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर चार हजार ८२७ जणांवर उपचार सुरु आहेत. 
****
परभणी जिल्ह्यातल्या नागरी भागात आज सायंकाळपासून दोन दिवस संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केला आहे. आज सायंकाळी पाच वाजेपासून सुरू झालेली संचारबंदी रविवारी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. परभणी महानगरपालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर तसंच जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका हद्द आणि त्या लगतच्या तीन किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू राहणार आहे. या काळात पेट्रोल पंप आणि गॅस वितरक यांच्यासह दूध विक्रेत्यांना सकाळी ६ ते सकाळी ९ या काळात सूट देण्यात आली आहे. केश कर्तनालयांना सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सूट असेल, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
कोरोनाविषाणू संसर्ग रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मागिल ११ दिवसापासून लावण्यात आलेली संचारबंदी मध्यरात्री पासून अशंताः शिथील करण्यात आली आहे. यामुळे ११ दिवसानंतर आजपासून बँकांचे कामकाज ग्राहकांसाठी खुले झाले आहे. बँक व्यवस्थापनाने सावधगिरी बाळगत सामाजिक अंतर राखत कामकाज चालु ठेवले. आज सकाळी ७ वाजल्यापासून सर्वच बाजारात गर्दी दिसून आली.
****
नागपूर शहरात उद्या आणि परवा जनता संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. शहरात वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं, नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं. लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
कोविड १९ च्या चाचण्या जलद गतीनं करण्यासाठी भारत आणि इस्त्राईल यांनी संयुक्तपणे एका चाचणी संचाची निर्मिती केली आहे. भारतीय संशोधन आणि विकास संस्था आणि इस्त्राईलच्या संशोधन विभागातल्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे हा संच तयार केला आहे. नवीन तंत्रज्ञानावर आधारलेल्या या चाचणी संच्याद्वारे ३० सेकंदात कोविड संक्रमणाचे प्राथमिक निष्कर्ष मिळू शकतात अशी माहिती भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गा नंतरच्या काळातल्या उच्च शिक्षणाच्या नियोजनासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 'कृती दला' ची स्थापना करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली आज या संदर्भात बैठक झाली.  प्र-कुलगुरु डॉ. प्रविण वक्ते या कृती दलाचे अध्यक्ष असून अन्य दहा जणांचा यामध्ये समावेश आहे. आगामी काळात कोरोना विषाणू संसर्गा नंतरची शिक्षण पद्धती बदलणार असून सुरक्षित अंतर ठेवून कशा पद्धतीनं अध्यापन, प्रात्यक्षिके, संशोधन, परीक्षा आणि मूल्यांकन करायचे याबद्दलचा निर्णय या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचं कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितलं आहे.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात काल एक दुचाकीस्वार आणि त्याची दोन मुलं नदीच्या प्रवाहात वाहून गेले. खळेगाव इथं ही दुर्घटना घडली. यापैकी मुलीचा मृतदेह सापडला असून दुचाकीस्वार आणि त्याच्या मुलाचा शोध अद्याप सुरू आहे. जिल्ह्यात काल रात्री सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान जिल्ह्यात वडवणी तालुक्यात ऊर्ध्व कुंडलिका धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने या धरणाच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली, त्यामुळे धरणातून काल रात्रीपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
****
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच वक्र दरवाजे २० सेंटीमीटर म्हणजे अर्ध्या फुटाहून अधिक उघडण्यात आले असून पूर्णा नदीपात्रात आज सकाळपासून ३ हजार ८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणात होणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणं किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, तरी नदी काठच्या गावांतल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. खडकपूर्णा प्रकल्प ७० पूर्णांक १२ शतांश टक्के भरला असून प्रकल्पालगत असलेल्या नदीकाठच्या १९ गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
****
लातूर इथं ७३ जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेऊन संकल्पपत्र भरून दिलं आहे. कोरोना विषाणू बाधित झाल्यानंतर विलगीकरण कक्षामध्ये असणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी दहा दिवसांच्या विलगीकरण कालावधीत असताना, बाधित रुग्णांशी संपर्क करून प्लाझ्मा देण्यासाठी तयार केल्याचं सांगितलं. ते म्हणाले….

प्लाझ्मा थेरपी हा एक उपचार कोरोना बाधित रुग्णांवर करण्याची याठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि त्या प्रतिसादाला अनुसरुन १३५ रुग्णांना कनव्हेंस केलं. आणि प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत त्या सर्वांना सांगितल्या नंतर १३५ रुग्णांमधल्या ७३ रुग्णांनी स्वत:हून पुढाकार घेत त्याठिकाणी प्लाझ्मा दान करण्याबाबतचा फॉर्म भरून दिला आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वे सनथनगर हैदराबाद ते दिल्ली दरम्यान कार्गो एक्स्प्रेस रेल्वे गाडी सुरु करत आहे. ही साप्ताहिक रेल्वे गाडी येत्या ०५ ऑगस्टपासून धावेल. दर बुधवारी सायंकाळी हैदराबाद सुटणारी ही गाडी शुक्रवारी सकाळी दिल्लीत पोहोचेल. या रेल्वेमुळे छोटे तसंच मध्यम व्यापारी सुद्धा आपला माल रेल्वेने हैदराबाद ते दिल्ली दरम्यान पाठवू शकतील, असं दक्षिण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...