Thursday, 30 July 2020

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 30.07.2020 18.00

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 July 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० जुलै २०२० सायंकाळी ६.००

****

·       देशात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्यांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा जवळपास दुप्पट

·       औरंगाबाद इथं आज तीन कोविडग्रस्तांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १३ हजार ६७९

·       उस्मानाबाद १३२ तर जालन्यात ५१ नवे रुग्ण; नांदेडचे आणखी एक आमदार बाधित

·       समता दलाच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांना भ्रष्टाचारप्रकरणी चार वर्ष तुरुंगवास

आणि

·       औरंगाबाद जिल्ह्यात एका संशयिताच्या तीन मालमत्तांवर ईडीची धाड; सात किलो सोन्यासह रोकड जप्त

 

*****

देशात कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्यांची संख्या सक्रीय रुग्णांपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या देशात पाच लाख २८ हजार २४२ रुग्ण कोविड संसर्गासाठी उपचार घेत आहेत, तर १० लाखांवर रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ६४ पूर्णांक ४४ शतांश टकक्यांवर पोहोचला आहे. या संसर्गामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण वैद्यकीय सुविधांच्या योग्य व्यवस्थापनामुळे कमी झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. जून महिन्यात या बाधितांचा मृत्यू दर तीन पूर्णांक ३३ शतांश टक्के होता, तो आता दोन पूर्णांक २१ शतांश टक्क्यांवर आला आहे.

****

औरंगाबाद इथं आज तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये शहरातल्या विश्रांती नगर इथल्या ४६ वर्षीय, एन सहा सिडको आविष्कार कॉलनी इथल्या ७९ वर्षीय पुरुष आणि खोकडपुरा इथल्या ७६ वर्षीय स्त्री रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाने जिल्ह्यातल्या मृतांची संख्या आता ४६७ झाली आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ११३ जणांचा अहवाल बाधित आला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागात ७३ आणि महापालिका हद्दीतले ४० रुग्ण आहेत. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता १३ हजार ६७९ झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ६८० रुग्ण बरे झाले, तर तीन हजार ५३२ जणांवर उपचार सुरु आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात आज आठही तालुक्यात मिळून १३२ नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या आता ९९१ इतकी झाली. त्यापैकी ४८२ रुग्ण आतापर्यंत कोविड संसर्गातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर ४६१ रुग्णांवर जिल्ह्यातल्या विविध रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शहरात एक ऑगस्ट पासून दुचाकी वाहनांना प्रतिबंध केला आहे. या आदेशानुसार फक्त शासकीय अधिकारी - कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतल्या व्यक्तींनाच यातून सूट देण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणखी ५१ जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित आले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता दोन हजार १४८ झाली आहे.

****

नांदेड जिल्ह्यात आणखी एका आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोविडची लक्षणं जाणवल्याने या आमदारांनी कोविड चाचणी करून घेतली, त्यात कोविडची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानं, त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात गंगाखेड इल्या जैदिपुरा भागातल्या ३२ वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा परभणी इथं एका खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोविड १९ मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २८ झाली आहे.

****

अमरावती जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात कोविड नमुना घेण्यासंदर्भात घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असून, असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असं महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. एका युवतीचा कोरोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी स्वॅब घेतल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञाने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून तिच्यासोबत गैरवर्तणूक केली. पडीत मुलीने या प्रकाराची बडेनरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं हा प्रकार समोर आला. सदर व्यक्तीला अटक करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे.

रम्यान, अमरावती जिल्ह्यात आज ५७ नवे कोविड बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यानुसार जिल्ह्यात आता कोव़ड रुग्णांची संख्या दोन हजार १४ झाली आहे.

****

संरक्षण दलाच्या एका व्यवहारात भ्रष्टाचार प्रकरणी समता दलाच्या माजी अध्यक्ष जया जेटली आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना दिल्ली न्यायालयानं चार वर्ष तुरुंगवास आणि प्रत्येकी एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तहलका न्यूज पोर्टलने जानेवारी २००१ मध्ये एका स्टिंग ऑपरेशनद्वारे हा भ्रष्टाचार उघड केला होता. या प्रकरणी आज निर्णय सुनावताना न्यायालयानं जया जेटली, पक्षातले त्यांचे सहकारी गोपाल पचेरलवाल आणि निवृत्त मेजर जनरल एसपी मुरगई या तिघांना आज सायंकाळपर्यंत न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश दिले आहेत.

****

पुढच्या दोन वर्षांत देशभरात ऑप्टिक फायबरचं जाळं विस्तारण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं असल्याचं, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. स्वावलंबी भारत अभियानांर्गत भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय डिजिटल संमेलनाचं उद्धाटन गोयल यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग जगतासाठी एकल खिडकी योजनेचं उद्दीष्ट सावकाश परंतु निश्चित साध्य केलं जाईल, असं ते म्हणाले. सरकारी धोरण अधिक सुलभ करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, यासाठी उद्योगक्षेत्राकडून येणाऱ्या सूचनांचं स्वागत असल्याचं, गोयल यांनी म्हटलं आहे.

****

अखिल भारतीय सेवानिवृत्त बँक कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १८ लाख रुपये मदत दिली आहे. या रकमेचा धनादेश महासंघाच्या राज्य शाखेचे मानद सचिव श्रीकांत पै यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुर्पूद केला. बँकेतल्या सेवानिवृत्तांसाठी स्थापन करण्यात आलेल्या या संघटनेचे देशभरात अडीच लाखावर सदस्य आहेत. कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना सरकारच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी या महासंघाने स्वेच्छेने मदत संकलित केली, यापैकी ६० टक्के रक्कम त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला तर ४० टक्के रक्कम पंतप्रधान मदत निधीत जमा केली आहे.

****

सक्तवसुली संचालनालय - ईडीनं औरंगाबाद जिल्ह्यात एका संशयिताच्या तीन मालमत्तांवर आज धाड घातली. विदेशी विनिमय नियमन कायद्यानुसार केलेल्या या कारवाईत सात किलो सोन्याच्या विटा आणि सुमारे ६२ लाख रुपयांची रोकड ईडीने जप्त केल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचं, ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

****

व्होकल फॉर लोकल अभियानांतर्गत जम्मू इथं हस्तकला आणि हातमाग संचालनालयानं हस्तकला वस्तूंचं प्रदर्शन भरवलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कारागीर, वीणकर, तसंच सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढावं तसंच हे सर्वजण स्वावलंबी व्हावेत, म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली.

****

 

चंद्रपूर जिल्ह्यात टाळेबंदी काळात आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करता यावा, याकरीता केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीच्या साह्यानं पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चंद्रपूर महानगर पालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार पुढाकार घेतला आहेत. या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे फिरते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे

****

उस्मानाबाद पोलीस ठाण्यातला पोलीस नाईक आतिश सरफाळे याला आज तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराच्याविरोधातल्या लोकांवर कारवाई करणं तसंच वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं पाच हजार रुपये लाच मागितली होती. त्यापैकी तीन हजार रुपये घेताना त्याला आज एका उपाहारगृहात सापळा रचून अटक करण्यात आली.

****

राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातल्या सुमारे १३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा उद्यापासून समाप्त करत असल्याचं पत्र सरकारने जारी केलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्‍या कालावधीत कोणाच्‍याही नोकऱ्या जाणार नाहीत, असे स्‍पष्‍ट निर्देश मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी दिले असतांनाही, पाणी पुरवठा आणि स्‍वच्‍छता विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी २७ जुलै रोजी सेवा समाप्तीचं पत्र काढलं आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचं या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

****

अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं उद्या आणि परवा ऑनलाईन व्याख्यान आणि वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये प्रख्यात विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार डॉ विजय चोरमारे, डॉ संजय शिंदे आणि प्राध्यापक बाबुराव गुरव यांचं उद्या व्याख्यान होणार आहे. दुसऱ्या दिवशी एक ऑगस्टला ज्येष्ठ साहित्यिक डॉ ऋषिकेश कांबळे, आणि गझलकार प्राध्यापक मुकुंद राजपंखे हे विचार मांडणार आहेत.

****

सोन्याच्या दरात आज ११० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रतितोळा ५३ हजार ८६० रुपये झाला. काल हा दर प्रतितोळा ५३ हजार ७४२ रुपये एवढा होता. चांदीच्या दरात आज किलोमागे दोन हजार ३८४ रुपयांनी घट झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतिकिलो ६४ हजार १०० रुपये झाला आहे.

//************//


No comments: