Saturday, 25 July 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.07.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सुरू असलेली टाळेबंदी केवळ‍ आर्थिक प्रश्र्न सोडवण्याकरता पूर्णपणे उठवण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. या संसर्गामुळे निर्माण आव्हानं लक्षात घेता आरोग्य आणि अर्थव्यवस्थेमधे योग्य समतोल साधण्याची गरज असल्याचं त्यांनी एका मुलाखती दरम्यान नमुद केलं आहे. टाळेबंदी पूर्णपणे उठवली जाणार नसली तरी आपण काही गोष्टी टप्याटप्यानं सुरू करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. एकदा व्यवहार सुरू झाल्यानंतर पुन्हा बंद करता येणार नसल्यानं आपण टप्प्यामधे उपाय योजत असल्याचं ते म्हणाले. येत्या एकतीस जुलैपर्यंत टाळेबंदी लागू असेल आणि ‘पुनश्च हरीओम’ म्हणत जून महिन्यापासून टाळेबंदी अंशतः उठवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या सरकारनं सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण केला असल्याच्या पार्श्र्वभूमीवर एका प्रश्र्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, हे ‘ठाकरे सरकार’ नसून ‘सर्वांचं सरकार’ आहे.    
****
सुरक्षादलांनी श्रीनगर शहरालगतच्या भागात एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना आज ठार केलं. सुरक्षादलांनी रणबीरगड भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यावरून या भागाला वेढा घालून तपासणी मोहीम हाती घेतली होती.  दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार सुरू केल्यामुळे उडालेल्या चकमकीत हे दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या भागात तपास मोहीम सुरू असून दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. 
****
देशात कोरोना विषाणुचे नवे ४८ हजार ९१६ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची एकूण संख्या तेरा लाख ३६ हजार ८६१ झाली आहे. देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या आठ लाख ४९ हजार ४३१ आहे. कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३ पूर्णांक ५४ शतांश टक्के आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गावर सध्या चार लाख ५६ हजार ७१ रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात गेल्या चोवीस तासांमधे ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ३१ हजार ३५८ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणूचे ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामधे २२ रुग्ण महापालिका हद्दीतले, तर १८ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या ४ हजार ५२६ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ४३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातले राज्य राखीव दलाचे ६५ पोलिस आणि अन्य दोन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. यात गडचिरोली इथं विलगीकरणात असलेले सुरक्षा दलाचे ६२ पोलिस आहेत. आरमोरी तालुक्यातल्या एका व्यक्तीसह किटाळी इथले सुरक्षा दलाचे तीन पोलिस, आणि गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना विषाणू कक्षातल्या एका कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे.
****
सांगलीच्या जिल्हा कोरोना विषाणू नियंत्रण कक्षात ५ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आज आढळून आलं. यात तीन अधिकारी आणि २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याआधी कक्षातल्या एका अधिकाऱ्याला याची लागण झाली आहे.
****
कोरोना विषाणूची साखळी रोखण्यासाठी धुळे शहरात तीन दिवस जनता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीला जनतेनं प्रतिसाद दिला असून शहरातल्या रस्त्यांवर सामसूम असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित २०४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९ हजार १८३ बाधित रुग्ण आढळून आले हाते. यापैकी २ हजार ३६४ रुग्ण जळगाव शहरातले आहेत. काल जिल्ह्यात १० रुग्ण मरण पावले.
****
रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे ४६४ रूग्ण वाढले असून जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या आता १२ हजार ४६९ झाली आहे. काल जिल्ह्यातल्या अकरा रूग्णांचा कोरोना विषाणुमुळे मृत्यू झाला.
****
नागपंचमीचा सण आज सर्वत्र साजरा केला जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यात सावरगाव इथं श्री नागोबा मंदिरात नागपंचमीनिमीत्त पूजा करण्यात आली. 
****
राज्यातल्या ८७२ शिवभोजन केंद्रांमधून जुलै महिन्यात २३ तारखेपर्यंत २२ लाख ३५ हजारहून अधिक थाळ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...