Tuesday, 22 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 September 2020

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०२० सकाळी ७.१० मि.

****

·      रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या हमीभावात वाढ.

·      राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चेदरम्यान गदारोळ करणारे आठ सदस्य संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित; उपसभापतींविरूद्धचा अविश्वास ठराव फेटाळला.

·      मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचा सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल; आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक.

·      राज्यात आणखी १५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू.

·      मराठवाड्यात ४७ बाधितांचा मृत्यू, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद.

आणि

·      राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार कायम, नद्या दुथडी भरुन वाहत आहेत तर अनेक धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु.

****

रबी हंगामातल्या गहू, हरभरा आणि करडईसह सहा पिकांच्या किमान आधारभूत किंमत - हमी भावात वाढ करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी काल लोकसभेत केली. गव्हाच्या किमान हमीभावात क्विंटलमागे ५० रुपये वाढ करण्यात आली आहे. आता गव्हाचा किमान हमीभाव एक हजार ९७५ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २२५ रुपये वाढ झाल्यानं, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, जवाच्या दरात ७५ रुपये वाढीनंतर हा दर प्रतिक्विंटल सोळाशे रुपये, मसूरच्या दरात ३०० रुपये वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल, मोहरीच्या दरात २२५ रुपये वाढीनंतर मोहरीचा किमान हमीभाव आता चार हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. करडईच्या दरात प्रतिक्विंटल ११२ रुपयांनी वाढ करण्यात आली असून, हा दर आता पाच हजार ३२७ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

कृषी सुधारणा विधेयकानंतरही किमान हमीभाव कायम असल्याचा पुनरुच्चार यावेळी तोमर यांनी केला, मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला.

****

राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकांवर चर्चा आणि मतदानावेळी गदारोळ करणाऱ्या आठ सदस्यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित केलं होतं. निलंबनाचा ठराव मंजूर झाल्यावर सभापतींनी या सदस्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितल्यावर या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली, त्यामुळे सदनाचं कामकाज लागोपाठ चार वेळा आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं, त्यानंतर सभापतींनी या सर्व सदस्यांना चालू पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित केल्याचं जाहीर केलं.

दरम्यान, या कारवाईच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी काल संसद भवन परिसरात निदर्शनं केली. निलंबित खासदार रात्रभर या आंदोलन स्थळी बसून होते.

दरम्यान, विरोधी पक्षांनी राज्यसभा उपसभापतिंविरूद्ध दिलेला अविश्वास प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावला आहे.

****

कृषी सुधारणा विधेयकांमुळे शेतमालाची आंतरराज्यीय विक्री सोपी होणार असल्याचं, विधान सभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात असा कायदा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाजारांची निर्मिती झाल्याचं आणि शेतकरी तिथे थेट विक्री करत असल्याचं दिसून आलं, असं फडणवीस म्हणाले. डॉ.स्वामिनाथन आयोगानं अशाच प्रकारच्या शिफारसी केलेल्या असून, हा आयोग पूर्णपणे लागू करण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं, फडणवीस म्हणाले. औरंगाबादमध्ये आमदार हरीभाऊ बागडे यांनीही वार्ताहरांशी बोलतांना ही विधेयकं शेतकऱ्यांच्या हिताची असल्याचं सांगितलं.

****

मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला आहे. आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया असून, यावर पुढे सुनावणी होईल, आपण एक टप्पा पुढे गेलो आहोत, दोन दिवसांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर भूमिका मांडतील, अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काल मुंबईत दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी ही माहिती दिली. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला आरक्षणावर स्थगिती देण्याचा अधिकार नाही. शिवाय, ५० टक्के आरक्षणावर युक्तिवादच झाला नसल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. राज्यात ५० टक्के मागासवर्गीय आरक्षण असल्यानं यात मराठा समाजाला बसवणं शक्य नसल्यानं ५० टक्क्यांची सीमा ओलांडून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. यासंदर्भात आता पंतप्रधानांनीच मार्गदर्शन करावं, असं त्या म्हणाल्या.

****

मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चानं काल राज्यभर आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यात आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं.

सोलापूर जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदारांच्या घरासमोरही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल ठिय्या आंदोलन करण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं काल सोलापूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्येही काल आंदोलन करण्यात आलं.

सकल मराठा समाज संघटनेनं काल हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव इथं आंदोलन केलं. मराठा समाज आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात त्वरित दाखल करावी यासह आरक्षणासंबंधीच्या इतर मागण्यांचं निवेदन सेनगावच्या तहसीलदारांना देण्यात आलं.

****

राज्य सरकारनं धनगर समाजाचं आरक्षण मार्गी लावावं, अन्यथा राज्यात धनगर विरुद्ध सरकार संघर्ष अटळ असून जे होईल त्याची जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. ते काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. येत्या दोन दिवसांत या आंदोलनाची दिशा ठरणार असून राज्यभरातील युवक आणि ज्येष्ठ मंडळी तीव्र आंदोलन करण्याचा तयारीत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती संवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी सकल धनगर समाजाने परभणी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं आहे. माजी आमदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. हरिभाऊ शेळके, यांच्यासह अनेक मान्यवरांनी सादर केलेल्या या निवेदनात धनगर आणि धनगड हे एकच आहेत, म्हणून धनगर आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, गरज पडल्यास अध्यादेश काढावा, आदी मागण्या केल्या आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं मल्हार आर्मीच्या वतीनं तुळजाभवानी देवीच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात आरक्षणाची ज्योत पेटवण्यात आली. ही ज्योत सबंध महाराष्ट्रभर फिरवण्यात येणार असून आरक्षणाचा वनवा महाराष्ट्रभर पोहोचणार असल्याचं मल्हार आर्मीचे सुरेश कांबळे यांनी सांगितलं.

****

हिंगोली लोकसभा मतदार संघातल्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं पीक कर्ज आणि मतदार संघातल्या बँकांच्या कार्यप्रणालीसंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन चर्चा केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या ११ तालुक्यांत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांकडे शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्जाची मोठ्या प्रमाणावर मागणी केली आहे. मात्र, फक्त ३० टक्के शेतकऱ्यांनाच आतापर्यंत कर्ज वाटप करण्यात आलं आहे. खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना सांगितलं.

****

राज्यात काल आणखी १५ हजार ७३८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १२ लाख २४ हजार ३८० झाली आहे. काल दिवसभरात २०० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय गेल्या आठवड्यात विविध रुग्णालयात मरण पावलेल्या ८१ रुग्णांची, तसंच त्यापूर्वीच्या आठवड्यात मृत पावलेल्या ६३ रुग्णांचीही काल नोंद घेण्यात आली. त्यामुळे राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३३ हजार १५ जणांचा मृत्यू झाला आहे. काल ३२ हजार सात रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ लाख १६ हजार ३४८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७४ हजार ६२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार १८७ रुग्णांची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात तेरा बाधितांचा मृत्यू झाला, तर नवे ३१७ रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या २८५ रुग्णांची भर पडली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सात रुग्णांचा मृत्यू झाला, बीड जिल्ह्यात १३३, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी ११४ रुग्णांची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १६७ रुग्णांची भर पडली. जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला, जालना जिल्ह्यात ७९ तर परभणी जिल्ह्यात आणखी ७२ रुग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला तर नव्या २० रुग्णांची नोंद झाली.

****

पुणे जिल्ह्यात आणखी दोन हजार ३३८ नवे रुग्ण आढळले, तर ७६ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत एक हजार ८३७ नवे रुग्ण, तर ३६ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी एक हजार ६१ रुग्ण आढळले, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार ३५०, सातारा ६९०, जळगाव ४७५, सोलापूर २९९, अमरावती २२५, गोंदिया १२९, बुलडाणा १३७, यवतमाळ १२६, अकोला ११७, वाशिम ८९, रत्नागिरी ७०, पालघर ५१, गडचिरोली ३६, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी २४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. 

****

राज्य शासनाच्या आदेशाव्यतिरिक्त जिल्हा प्रशासनानं टाळेबंदीबाबत कोणताही आदेश जारी केला नसून टाळेबंदीबाबत कोणतीही अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे. जिल्हा‍धिकाऱ्यांनी काल सर्व नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींची दूरदृष्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून, माझे कुटुंब माझी जबाबदारी, या योजनेची आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. स्थानिक पातळीवर नगराध्यक्ष किंवा पंचायत समिती सभापती यांनी आवश्यकता वाटल्यास लोकांना बरोबर घेऊन जनता संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा असंही दिवेगावकर म्हणाले.

****

राज्याच्या अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. बहुतांशी नद्या दुथडी भरुन वाहत आहेत, तसंच धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे.

औरंगाबाद शहरात काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यात काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

कोकण तसंच सांगली आणि वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला.

नाशिक जिल्ह्याच्या काही भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून गोदावरी नदीचे पाणी वाढले आहे.

दरम्यान, राज्यात येत्या दोन दिवसात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्पाचे आणखी दोन दरवाजे काल उघडण्यात आले. धरणाचे एकूण चौदा दरवाजे आता उघडण्यात आले असून नदीपात्रात २५ हजार २२३ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.

****

लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठवावा असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात कारसा-पोहरेगाव तसंच खरोळा बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी जाऊन खरीप पिकांचं नुकसान झालं, हे दरवाजे उघडण्यास लागलेल्या विलंबाची खाते निहाय चौकशी करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

****

परभणी जिल्ह्यात सोयाबीन तसंच कापूस खरेदीसाठी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा परभणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.

****

परभणी तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने, पुरानं, तसंच ओढे आणि नाल्यांच्या काठावरील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त शेत जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं असून, या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोनपेठ तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शिवसेनेच्या तालुकास्तरिय कार्यकारीणीनं तहसीलदार डॉक्टर आशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली आहे.

****

सध्या पोषण माह सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना नागलीची खीर देता येईल. या नागलीच्या खीरची पाककृती सांगत आहेत आहारतज्ञ जाई संत –

प्रथम नागली भाजून घ्यावी. ती दळून वस्त्रगाळ करावी. पातेल्यात अर्धा चमचा तूप घेऊन त्यात दोन चमचे नागलीचे पीठ भाजून घ्यावे. नंतर त्यात आवश्यक त्या प्रमाणात दूध घालावे व चवीपुरती साखर घालावी. चांगले शिजू द्यावे. या खिरीतून मुलांना आयर्न, कॅल्शियम मिळते. खीर पातळ असल्यामुळे मुलांना चावायलाही काही प्रॉब्लेम होत नाही.

****

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनानं जाहीर केली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसंच रुग्णालयातल्या जखमींची भेट घेतली. या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेत सात मुलांसह १४ जण मरण पावले असून, आतापर्यंत २० जणांना ढिगाऱ्याच्या बाहेर काढण्यात आलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी इथल्या महावितरणच्या कार्यालयातील सहायक अभियंता तुषार नांद्रे याला काल १७ हजारांची लाच स्विकारतांना अटक करण्यात आली. विद्युत ठेकेदाराकडून विद्युत वाहिनी स्थलांतरासह, नव्या विद्युत मीटर संबंधीची फाईल मंजूर करण्यासाठी नांद्रे यानं लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

****

दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रिमीअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघानं सनरायजर्स हैदराबाद संघाचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघानं निर्धारित २० षटकात १६४ धावा केल्या, प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबाद संघ केवळ १५३ धावाचं करू शकला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 05 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...