Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 September 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३
सप्टेंबर
२०२० सकाळी ७.१० मि.
****
·
मराठा समाजातल्या सामाजिक आर्थिक मागास प्रवर्गातल्या उमेदवारांना
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेले लाभ तसंच अन्य सुविधा-सवलती देण्याचा राज्य
मंत्रीमंडळाचा निर्णय.
·
कोविड-19 रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह
सात राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद
साधणार.
·
भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसंच बटाटा या वस्तू
जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्याची तरतूद असलेलं “जीवनावश्यक वस्तू कायदा सुधारणा”
विधेयकासह सात विधेयकं राज्यसभेत पारित.
·
आठ सदस्यांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय कामकाजावरचा बहिष्कार
मागे न घेण्याची काँग्रेसची भूमिका, लोकसभेच्या कामकाजावरही बहिष्कार.
·
राज्यात आणखी १८ हजार ३९० कोविड बाधितांची नोंद, ३९२ जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू.
·
मराठवाड्यात ४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू, तर नव्या
एक हजार ४०३ रुग्णांची नोंद.
आणि
·
ज्येष्ठ गायिका अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि प्रसिद्ध लेखक,
आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार डॉ.भाऊ लोखंडे यांचं निधन.
****
मराठा
समाजातल्या सामाजिक आर्थिक मागास - एसईबीसी प्रवर्गातल्या तरुण आणि विद्यार्थ्यांना
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेले लाभ देण्यासह काही महत्त्वाचे निर्णय काल
राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
काल मंत्रिमंडळ बैठक झाली. यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती
योजना आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना आता आर्थिक दृष्ट्या
दुर्बल घटकांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल, छत्रपती शाहू महाराज
संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला भरीव निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात
येईल, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी
देण्यात येणाऱ्या भागभांडवलात ४०० कोटी रुपयांनी वाढ करण्यात येईल, मराठा क्रांती मोर्चामध्ये
मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरीत
घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात
आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करण्यात येईल या निर्णयांचा
यात समावेश आहे.
****
देशात
कोविड-19 रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांच्या मुख्यमंत्री
आणि आरोग्य मंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. या राज्यांमधल्या
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत, तसंच राज्यातल्या
वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा ते यावेळी घेतील.
****
जीवनावश्यक
वस्तू कायदा सुधारणा विधेयकासह सात विधेयकं काल राज्यसभेत पारित झाली. जीवनाश्यक वस्तू
कायदा सुधारणा विधेयकामध्ये भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, तेल, कांदा तसंच बटाटा या
वस्तू जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळण्याची तरतूद आहे. या वर्षी जून महिन्यात केंद्र
सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेईल. या सुधारणेनंतर शेतकऱ्यांना
त्यांचं उत्पादन विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल तसंच मागणी आणि पुरवठा साखळीत संतुलन
राखता येईल, असं अन्न अणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
धान्याचं उत्पादन आणि साठवणुकीसाठी हे विधेयक मदतकारी ठरेल, असंही ते म्हणाले.
याशिवाय
राज्यसभेनं काल कंपनी सुधारणा विधेयक, बँकिंग नियंत्रण सुधारणा विधेयक, कर निर्धारण
आणि अन्य कायद्यांमध्ये सवलत तथा सुधारणा विधेयक, राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठ
विधेयक आदी विधेयकांना मंजुरी दिली. ही विधेयकं आता राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवली
जाणार आहेत.
****
राज्यसभेतल्या
निलंबित सदस्यांच्या समर्थनार्थ, विरोधी पक्षांनी आता लोकसभेच्या कामकाजावरही बहिष्कार
टाकला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पक्षाची ही भूमिका जाहीर केली. त्यापूर्वी
रब्बी पिकांच्या किमान हमीभावाच्या मुद्यावरून लोकसभेचं काम काल तासाभरासाठी स्थगित
झालं होतं. सरकारनं हमीभावात जाहीर केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचं, अधीर रंजन
चौधरी यांनी म्हटलं.
****
राज्यसभेच्या
आठ सदस्यांचं निलंबन मागे घेतल्याशिवाय कामकाजावरचा बहिष्कार मागे घेणार नसल्याचं विरोधी
पक्षांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आम
आदमी पार्टी, द्रविड मुनेत्र कळघम, तेलंगण राष्ट्र समिती आणि शिवसेना या पक्षांनी कामकाजावर
बहिष्कार टाकला आहे.
शेतकऱ्यांचा
शेतमाल कोणीही किमान हमीभावापेक्षा कमी किमतीने घेऊ नये, सर्व राज्य सरकारांना हमी
भाव देणं बंधनाकरक करावं, आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाचे खरेदी दर
निश्चित करावे अशा तरतुदी असणार एक विधेयक सरकारनं संसदेत आणावं अशी मागणी राज्यसभेतले
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी बहिष्काराबाबतची भूमिका स्पष्ट करताना केली.
****
राज्यसभेच्या
निलंबित सदस्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांनी काल एका दिवसासाठी उपोषण केलं. काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवार
यांनी, उपसभापतींची कार्यपद्धत आणि सरकारच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान,
निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्राबाबत आयकर विभागाची आपल्याला नोटीस मिळाली असल्याचं
पवार यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार
सुप्रिया सुळे, यांनाही अशाच प्रकारची नोटीस आयकर विभागानं बजावल्याचं, ते म्हणाले.
****
राज्यात
काल दिवसभरात आणखी १८ हजार ३९० कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण
रुग्णसंख्या १२ लाख ४२ हजार ७७० झाली आहे. काल ३९२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ३३ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर
काल २० हजार २०६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत नऊ
लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या दोन लाख ७२ हजार ४१० रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ४० कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या एक हजार ४०३ रुग्णांची
नोंद झाली.
औरंगाबाद
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सात बाधितांचा मृत्यू झाला, औरंगाबाद जिल्ह्यात
३५८, तर उस्मानाबाद जिल्ह्यात नव्या २०६ रुग्णांची भर पडली. लातूर जिल्ह्यात सहा रुग्णांचा
मृत्यू झाला, तर आणखी २४० रुग्णांची नोंद झाली.
नांदेड, जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. नांदेड
जिल्ह्यात आणखी २३५, जालना जिल्ह्यात ८८, तर परभणी जिल्ह्यात आणखी ७६ रुग्ण आढळले.
बीड जिल्ह्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या १४६ रुग्णांची भर पडली. हिंगोली
जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर नव्या ५४ रुग्णांची नोंद झाली.
****
पुणे
जिल्ह्यात आणखी तीन हजार २९१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ९६ जणांचा मृत्यू
झाला. मुंबईत एक हजार ६२८ नवे रुग्ण आणि ४७ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात एक
हजार १५४ नवे रुग्ण आढळले, तर १५ जणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यात एक हजार २७३,
सातारा ७०८, सांगली ६९७, रायगड ५०७, पालघर २७८, गोंदिया २०६, गडचिरोली ९३, धुळे ८६
तर वाशिम जिल्ह्यात काल आणखी ७८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली.
****
ज्येष्ठ
गायिका अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं काल साताऱ्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे निधन
झालं, त्या ७९ वर्षांच्या होत्या. सातारा इथं एका दूरचित्रवाणी मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान
त्यांना संसर्ग झाला होता. उपचारादरम्यान काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. आशालता
यांनी वेगवेगळी मराठी नाटकं, मराठी आणि हिंदी चित्रपटातून विविध भूमिका साकारल्या होत्या.
‘महाश्वेता’ या दूरदर्शन मालिकेत त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या स्मरणात आहे.
आशालता यांच्या निधनाबद्दल चित्रपट सृष्टीतून दु:ख व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर
काल शासकीय नियमानुसार सातारा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
प्रसिद्ध
लेखक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ.भाऊ लोखंडे यांचं काल नागपूर इथं
निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि
महात्मा फुले-आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्ष पद त्यांनी भूषवल होतं. ‘निकाय’ या
नियतकालिकाचे ते संपादक होते.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या उमरा शिवारात चंदनाची सुगंधी लाकडं तस्करीसाठी लपवून ठेवलेल्या शेतात
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल छापा मारला. यावेळी सहा लाख रुपये किमतीची एक क्विंटल
२० किलो चंदनाची लाकडं जप्त करण्यात आली. याप्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
यंदाच्या
खरीप पीक कर्ज वाटपामध्ये मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्हा प्रथम तर राज्यात सहाव्या
क्रमांकावर असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितलं. ते काल औरंगाबाद इथं
यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात अधिक माहिती देतांना ते म्हणाले
–
औरंगाबाद जिल्ह्याचं २०–२१ खरीप कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते चौदाशे ९६ कोटी
होतं. २ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९६ कोटी खरिपासाठी होतं आणि बाकीचे साधारणतः
२९९ कोटी म्हणजे ३०० कोटी रब्बीसाठी. तर आपण खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले आहे.
आणि राज्यामध्ये खरीप पीक कर्ज वाटपामध्ये आपला नंबर सहावा क्रमांक आहे डिविजन मध्ये
फस्ट आहे.
दरम्यान,
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातली सर्व दुकानं, आस्थापना हॉटेल
रात्री नऊ नंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यात औंढा तालुक्यातल्या पिंपळदरी परिसरात काल अतिवृष्टी झाली असून, पिंपळदरी
तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलं आहे.
****
जालना
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी
रवींद्र बिनवडे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. पुढील दहा दिवसात पंचनामे
पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा, असं याबाबतच्या आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड
शहराजवळच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा काल बंद करण्यात
आला. सध्या धरणाच्या नऊ दरवाजातून ९१ हजार ८५१ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात
येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे.
****
येत्या
दोन दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच
ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
सध्या
पोषण माह सुरू आहे. लहान मुलांचं आरोग्य सृदृढ राहावं यासाठी त्यांना देण्यात येणारा
आहार हा पोषण युक्त असणं आवश्यक आहे. या पोषण युक्त आहारामध्ये बालकांना दलिया देता
येईल. या दलियाची पाककृती सांगत आहेत आहार तज्ञ जाई संत –
प्रथम एक वाटी दलिया रवा भाजतो त्याप्रमाणे खरपूस भाजून घ्यावा.
नंतर कढईत फोडणी करून त्यामध्ये गाजर, शेंगदाणे, कांदा, मटार इत्यादी घालून परतवून
घ्यावे. नंतर त्यामधे भाजलेला दलिया घालावा. दलिया शिजण्यासाठी पाणी घालावे. १५ ते
२० मिनिटं चांगले शिजू द्यावे. दलियात आपण गाजर, मटार, शेंगदाणे, कांदा इत्यादी घातल्यामुळे
दलिया रंगीत दिसतो आणि त्यातील पोषण वाढते. व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात. मुलांचे
आरोग्य वाढण्यास मदत होते.
****
नांदेड
वाघाळा शहर महानगर पालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या मोहिनी येवनकर तर उपमहापौरपदी
काँग्रेसचेच मसूद खान यांची बिनविरोध निवड झाली. काल झालेल्या या निवडणूक प्रक्रियेसाठी
पीठासीन अधिकारी म्हणून महापालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांनी काम पाहिले.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ
आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शहर काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे
यांनी केली आहे. त्यांनी काल अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांना या मागणीचं निवेदन
दिलं. त्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी
विधयेकांचा निषेध त्यांनी यावेळी केला.
****
बीड
जिल्ह्यात ऊसतोड कामगार आणि मुकादम संघटना, सीटू ऊसतोड कामगार संघटना, शिवसंग्राम ऊसतोड
संघटना अशा विविध संघटनेच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कामगारांना तोडणी
दर ४०० रुपये करुन वाहतूक दर आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी, कल्याणकारी महामंडळ
स्थापन करावं, ऊसतोड दरवाढीचा करार तीन वर्षाचा करावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी
हे आंदोलन करण्यात येत आहे.
****
बीड
जिल्ह्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
देण्याची मागणी शिवसंग्राम संघटनेनं केली आहे. शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर
काकडे यांनी काल बीड तालुक्यात नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत
होते.
****
राज्यात
एकीकडे कोरोना विषाणू संसर्गानं जनता चिंतेत आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टीनं शेतकरी हैराण
झालेले असताना, राज्य सरकार मात्र याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही, त्यामुळे राज्यकर्त्यांवर
खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर
यांनी केली आहे. लातूर शहरातल्या गांधी चौकात काल शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं
विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं, त्यावेळी निलंगेकर बोलत होते.
****
लातूर
जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघातले किल्लारी आणि बेलकुंड साखर कारखाने सुरु करण्याची
मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री अमित देशमुख
यांच्याकडे केली आहे. पवार यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट
घेऊन, मतदारसंघात ऊसाचं वाढलेलं क्षेत्र, बंद असलेले साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची
अडचण दूर होण्याच्या दृष्टीनं करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा केली.
****
इंडियन
प्रिमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल राजस्थान रॉयल संघानं चेन्नई सुपर किंग संघाचा
१६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघानं निर्धारित २० षटकात
२१६ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २०० धावाच करू शकला.
****
No comments:
Post a Comment