Monday, 30 November 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ३० नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

कोविड 19 ची लस विकसित करणाऱ्या तीन संशोधकांच्या चमूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहे. जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या संशोधन संस्थेतल्या संशोधकांशी पंतप्रधान दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील.

****

केंद्र सरकारनं मिशन कोविड सुरक्षा या भारतीय कोविड -19 लस विकास अभियानासाठी ९०० कोटी रुपयांचं तिसरे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केलं आहे. भारतीय कोविड-19 लसींच्या संशोधन आणि विकासासाठी जैव तंत्रज्ञान विभागाला हे अनुदान प्रदान केलं जाईल. यामुळे कोविड संसर्ग रोखण्यासाठी अंदाजे पाच ते सहा लसींच्या विकासाला गती देण्यास मदत मिळेल आणि परवाना तसंच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत नियामक अधिकाऱ्यांच्या विचारार्थ त्या बाजारात सादर करणं हे सुनिश्चित करण्यात मदत होईल.

****

शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले धर्मगुरू, गुरु नानक यांची आज ५५१ वी जयंती देशात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकात्मता, शांतता, बंधुत्व, सौजन्य आणि सेवा या मुल्यांना केंद्रस्थानी ठेवून गुरु नानक यांनी दिलेली मानवतेची शिकवण, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, आणि आत्मप्रतिष्ठा हा जगण्याचा मूलाधार आहे, हे त्याचं तत्वज्ञान सर्व मानवी समाजाला प्रेरणादायी आहे, असे गौरवपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सुद्धा गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक याचं भारतीय संत, अध्यात्मिक गुरु आणि तत्वाज्ञांच्या मध्ये खूप मोठं स्थान असल्याचं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुरु नानक देव यांचं स्मरण आणि अभिवादन केलं. गुरु नानक देव यांचे विचार आम्हास समाज सेवा आणि उत्तम जग निर्माण करण्यासाठी सतत प्रेरित करो, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

****

मध्य रेल्वे उद्या मंगळवारपासून काही विशेष गाड्या सुरू करत आहे. यामध्ये मुंबई - लातूर- मुंबई आणि मुंबई-आदिलाबाद- मुंबई या दोन गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्यांमधून फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं आहे.

//**********//

 

No comments: