Saturday, 28 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** देशातल्या तीन संशोधन संस्थांमध्ये कोविड 19 च्या लस संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधानांकडून आढावा

** ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊन ताकद दाखवण्याची गरज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याकडून व्यक्त

** राज्यातल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच क्षेत्रात कुचकामी- भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची टीका

 आणि

** जालना जिल्ह्यात आज २३ रुग्ण तर औरंगाबाद इथं ११ रुग्ण कोविड संसर्गातून मुक्त

****

कोविड 19 च्या लससंशोधन आणि उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या तीन संशोधन संस्थांना भेट देऊन आढावा घेतला, यामध्ये अहमदाबाद इथली जायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. आज सकाळी अहमदाबादमध्ये तर दुपारी हैदराबाद इथे विकसित होणाऱ्या लसीचा आढावा घेतल्यानंतर सायंकाळी पंतप्रधान हैदराबादहून वायूदलाच्या विशेष विमानाने पुण्यात दाखल झाले, पुण्यातल्या लोहगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्यूटला पोहोचून पंतप्रधानांनी इथं विकसित होत असलेल्या कोव्हिशील्ड लसीसंदर्भात शास्त्रज्ञांकडून माहिती जाणून घेतली. सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्यासह संस्थेतले शास्त्रज्ञ, संशोधकांनी पंतप्रधानांना लसनिर्मितीतल्या टप्प्यांबाबत माहिती दिली. लस संशोधन आणि उत्पादन प्रक्रियेत कार्यरत असलेल्या सर्व चमूचं पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केलं असून, भारत सरकार संपूर्ण पाठिंब्यासह सक्रियपणे या सर्वांसोबत कार्यरत असल्याचं, पंतप्रधानांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.

देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांबरोबरच्या चर्चेमुळे आगामी लसीकरण, त्यातली संभाव्य आव्हानं, आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७१वा भाग आहे.

****

थोर समाज सुधारक, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी - बहुजन समाजाबद्दलचं धोरणच राज्याला तसंच देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा कुठलाही विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी रस्त्यावर येऊन ताकद दाखवण्याची गरज, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार आज पुण्यात ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, एक लाख रुपये, मानपत्र, आणि स्मृती चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात भुजबळ बोलत होते. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावं अशी भूमिका आपण मांडली. ओबीसी समाज हा नेहमीच मराठा आरक्षणाला पाठिंबा देत असतांना समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं भुजबळ म्हणाले.

या पुरस्कारला उत्तर देताना डॉ लहाने यांनी आपण हा पुरस्कार आपल्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. कोविड प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क लावणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं डॉ लहाने यांनी नमूद केलं.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केलं आहे. 

****

जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले सैनिक यश देशमुख यांच्या पार्थिव देहावर आज जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री तसंच माजीसैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी देशमुख यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सैन्य दल तसंच पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या चार फैरी झाडून देशमुख यांना मानवंदना देण्यात आली

****

पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांचा पार्थिव देह आज पुण्यातून पंढरपूरमार्गे सरकोली या त्यांच्या गावी नेण्यात आला. पंढरपुरात शिवतीर्थावर भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भालके यांचं काल रात्री पुण्यात उपचारादरम्यान निधन झालं, त्यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांचे नेते तसंच समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राज्यातल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच क्षेत्रात कुचकामी ठरल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उणीवा निदर्शनास आणून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात घेतल्या जात असलेल्या पत्रकार परिषदांच्या श्रुंखलेत ते आज नागपूर इथं बोलत होते. शिवसेनेनं निवडणुकीत जाहीरनाम्यात  घरगुती वीज देयकात ३० टक्के सूट देण्याचं आश्वासन पाळलं नाही, उलट कोविडच्या संकटात विजेचे दर वाढवल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली.

****

जालना जिल्ह्यात आज दिवसभरात ३६ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार २४० झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातूनमुक्त झालेल्या २३ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ५९२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३३५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटीतल्या अकरा रुग्णांना आज कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ३१ रुग्ण या संसर्गातून बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३ हजार ६४ झाली असून ८९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या एक हजार १४३ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात शेगांव - कालखेड रस्त्यावर दूध वाहतुक करणाऱ्या वाहनाशी टक्कर होऊन एक दुचाकीस्वार आणि त्याच्या पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास हा अपघात घडला.

****

नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात आज पहाटेच्या सुमारास एका नागरी वसाहतीत आग लागून सात घरं खाक झाली,  तर सुमारे १० ते १२ घरांना आगीची झळ बसली आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला. सुदैवानं आगीत जीवीत हानी झाली नाही, मात्र अनेक घरांचं आणि घरगुती साहित्याचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, नाशिक शहरातल्या पांडवलेणी परिसरातली आगही आटोक्यात आली आहे. आज सकाळच्या सुमारास लागलेली ही आग वनविकास महामंडळाचे मजूर आणि स्थानिक युवकांनी विझवली. या आगीत सुमारे एक हेक्टर पेक्षा अधिक वन क्षेत्र बाधित झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद शहरात पैठण दरवाजा ते सिटीचौक आणि सिटीचौक ते शहागंज हा मार्ग नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. आयटक संलग्नित शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने या निर्णयाबद्दल महापालिका प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांचे आभार व्यक्त केले आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापुर तालुक्यातल्या काही भागात आज दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, त्यामुळे तापमानात घट होऊन थंडीचा जोर वाढला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

हिंगोली इथल्या समृध्दी प्रकाशनामार्फत राज्यस्तरीय संत नामदेव काव्य साहित्य पुरस्कार दिला जातो, यंदा हा पुरस्कार धुळे इथले कवी भीमराव फुलपगारे यांच्या ’संस्कृतीचं वऱ्हाड’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे.

//**********//

No comments: