Tuesday, 24 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2020 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 November 2020

Time 07.10 to 07.25

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०

****

·      परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड संसर्ग नसल्याचं प्रमाणपत्र सोबत बाळगणं बंधनकारक.

·      राज्यात कालपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद.

·      डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोविडसंसर्गाबाबत सावध राहावं - आरोग्यमंत्र्यांचं आवाहन.

·      आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचं काल गुवाहाटी इथं दीर्घ आजारानं निधन.

·      राज्यात काल चार हजार १५३ कोविड बाधितांची नोंद; राठवाड्यात नवे ३७८ रुग्ण.

आणि

·      वीज देयकाबाबत दिलेल्या आश्वासनांपासून राज्य सरकार पळ काढत असल्याचा भाजपचा आरोप; राज्यभर वीज देयक होळी आंदोलन.

****

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मिशन बिगीन अगेन अंतर्गत आंतरराज्य प्रवासासंदर्भात राज्य सरकारनं काल नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या सुचनांनुसार परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड संसर्ग नसल्याचं प्रमाणपत्र सोबत बाळगणं बंधनकारक असेल. नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून विमान तसंच रेल्वेनं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना हा नियम लागू असणार आहे. या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करणं बंधनकारक आहे. विमान प्रवासाच्या ७२ तास आधी, तर रेल्वे प्रवासाच्या ९६ तास आधी ही चाचणी करावी लागेल.

जे प्रवासी चाचणी न करता विमान प्रवास करतील, त्यांना विमानतळावर उतरल्यावर तिथेच स्वखर्चानं ही चाचणी करावी लागेल. यासाठी विमानतळांवर कोविड चाचणीची सोय करावी, तसंच कोविड संसर्गाचं निदान होणाऱ्या प्रवाशांचे पत्ते आणि संपर्काविषयीची माहिती विमानतळ व्यवस्थापकांनी नोंदवून घ्यावी, असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत.

रेल्वेप्रवासासाठीही असेच नियम आहेत. कोविड चाचणी न करता महाराष्ट्रात येणाऱ्या संबंधित चार राज्यातल्या प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर तपासणी केली जाईल, संसर्ग आढळणाऱ्या प्रवाशांवर कोविड केंद्रात उपचार केले जातील, या उपचारांचा खर्च संबंधित प्रवाशांना द्यावा लागणार आहे.

 

संबंधित चार राज्यांमधून रस्ते मार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी चाचणी बंधनकारक नसली, तरी राज्यात प्रवेशापूर्वी त्यांची चाचणी करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. यासाठी राज्याच्या सीमेवर संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी यंत्रणा उभारावी, अशी सूचना सरकारनं केली आहे.

या नियम आणि सूचनांचं पालन होईल याची जबाबदारी संबंधित महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. आज सकाळी दहा वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. या सर्व बाबींवर या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान, नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचं पंतप्रधानांनी काल ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केलं. या ७६ सदनिका पर्यावरणपूरक असून, त्यात ऊर्जा बचत करणाऱ्या एलईडी लाईटसचा वापर, पावसाचं पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जा यंत्रणेची सुविधा आहे.

****

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांची तपासणी करूनच शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आला.

 

औरंगाबाद जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता, ग्रामीण भागातल्या ५८५ शाळांपैकी ४०६ शाळा कालपासून सुरू झाल्या, या शाळांमध्ये १७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी काल पहिल्या दिवशी हजेरी लावली. उर्वरित ४०६ शाळा काल बंदच राहिल्या. पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं काल दिसून आलं.

 

जालना जिल्ह्यातल्या माध्यमिक विभागाच्या ५२६ पैकी ४०९ शाळा कालपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला. शाळेत येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींची शिक्षकांनी प्रवेशद्वारावरच थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून आत प्रवेश दिला. वर्गातही विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरानेच बसविण्यात आलं. दरम्यान, कालपर्यंत जिल्ह्यातल्या चार हजार ९८४ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची स्वॅब चाचणी करण्यात आली असून, पैकी ४८ शिक्षक तर ८ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

 

बीड जिल्ह्यात काल नववी ते बारावी पर्यंतच्या ७६८ पैकी २३६ शाळा सुरू झाल्या, मात्र विद्यार्थी पालकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या शाळा- महाविद्यालयात ७८ हजार ६७३ विद्यार्थ्यांपैकी फक्त दोन हजार ६२८ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

दरम्यान, जिल्ह्यातल्या सहा हजार ६०० शिक्षकांपैकी दोन हजार ९५७ तर तीन हजार ७२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यां पैकी ६१४ जणांची कोविड तपासणी करण्यात आली, यात २४ जण बाधित आढळून आले.

 

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ४९१ शाळेतल्या ७० शिक्षकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर खबरदारी घेत शाळा सुरू झाल्या. शाळेत विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करून आणि पुरेसे अंतर राखून अध्यापन सुरू झालं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड आणि शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी काल वाशी, भूम आणि येडशी इथल्या शाळांना भेट देऊन, शाळा सुरू करण्याच्या अनुषंगानं कामकाजाची पाहणी केली.

 

लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश शाळा सुरू झाल्या असल्याचं माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकरंडे यांनी सांगितलं. कनिष्ठ महाविद्यालयात दयानंद महाविद्यालयाने प्रत्यक्ष वर्ग सुरु केले आहेत, फक्त दहा टक्के पालकांनी संमती दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यात दिवाळीच्या काळात कोविड चाचण्यांची संख्या कमी झाली होती, ती आता पुन्हा वाढवण्यात आल्यामुळे राज्यात रुग्णसंख्याही वाढली असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाबाबत सावध राहण्याचं आवाहन करताना ते म्हणाले –

दिवाळीच्या पिरीयडमधे टेस्टिंगची संख्या जी दररोज ९० हजार व्हायची ती ३० हजारावर आली होती. आता आपण टेस्टिंगपण पूर्ण वाढवलेलं आहे. आणि पूर्ण वाढवल्यानंतरसुध्दा आता तीन - चार हजारांवर संख्या आहे. जरुर जसं टेस्टिंग वाढवू तशी थोडी संख्या वाढेल परंतू याचा अर्थ पॅनिक होण्याची गरज नाही. घाबरण्याची गरज नाही. तसं सगळं नियंत्रणाखाली आहे. काळजी ही घ्यावी लागेल की, मास्क कंपलसरी घातलंच पाहिजे. तो एनफोर्स केला पाहिजे आता. नाही घालणार त्यांला आता कडक शिक्षा करण्याचं काम करावं लागणार आहे. स्पेशल डिस्टसिंगचं महत्व आहे. सतर्कता बाळगा, काळजी घ्या.

 

डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सर्वांनाच अधिक काळजी घेऊन जागरुक राहून काम करावं लागणार आहे, रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली तरी राज्य सरकाराचा आरोग्य विभाग सज्ज असल्याचंही टोपे यावेळी म्हणाले.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी येत्या सहा डिसेंबरला अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना मुंबईत न येण्याचं आवाहन केलं आहे. या दिवशी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचं थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचं नियोजन करण्यात येणार आहे.

****

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचं काल गुवहाटी इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. कोरोना विषाणूचा संसर्गातून बरे झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. सहा वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेल्या गोगोई यांनी सलग तीन वेळा आसामचं मुख्यमंत्रिपद सांभाळलं होतं.

गोगोई यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

राज्यात काल आणखी चार हजार १५३ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ८४ हजार ३६१ झाली आहे. काल ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ६५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल तीन हजार ७२९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८१ हजार ९०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल १२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३७ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात काल पाच, बीड जिल्ह्यात ३, औरंगाबा जिल्ह्यात २ तर नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काल प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात १४१ नवे रुग्ण आढळले. बीड जिल्ह्यात ५८, लातूर ५४, नांदेड ३६, जालना ३८, उस्मानाबाद ३२, परभणी १६ तर हिंगोली जिल्ह्यात काल नवे तीन कोविडबाधित रुग्ण आढळले.

****

मुंबईत काल आणखी ८०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर १४ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात ५२८ नवे रुग्ण, तर दोन मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात ३२३ नवे रुग्ण आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यात १९९, सोलापूर १८१, सातारा ८४, गडचिरोली ७४ जळगाव ५२, बुलडाणा ४५, सांगली ४३, भंडारा ३५, नंदुरबार २०, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी १८, रत्नागिरी १३,धुळे आठ, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या दोन रुग्णांची नोंद झाली. 

****

वीज देयकाबाबत दिलेल्या आश्वासनांपासून राज्य सरकार पळ काढत असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते काल सातारा जिल्ह्यात कराड इथं वीज देयक होळी आंदोलनात बोलत होते. टाळेबंदीच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना उत्पन्नाचं साधनच नव्हतं, त्यांनी ही देयकं भरायची कशी, असा प्रश्न विचारत पाटील यांनी, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सामान्य जनता भरडली जात असल्याची टीका केली. सुधारित वीज देयकं मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशाराही पाटील यांनी दिला. राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं. भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूर तसंच वर्धा इथं, नाशिक इथं सरचिटणीस देवयानी फरांदे तर मुंबईप्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन झालं.

****

उस्मानाबाद इथं जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकार विरोधात घोषणा देऊन वीज देयकांची होळी केली.

परभणी इथं वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलांची होळी करण्यात आली. वीज बिलांची दरवाढ रद्द करावी, टाळेबंदीच्या काळातली सरासरी बिलं रद्द करावीत, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

लातूर इथं भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या नेतृत्वात वीजबिलांची होळी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.  

कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, चंद्रपूर इथंही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

****

वीज देयकांसदंर्भात आश्वासन देऊनही राज्य सरकारनं कुठलीही सवलत दिली नसल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविडची दुसरी लाट शक्यतो येवूच नये, मात्र सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्र बंद न करता यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातले भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी परवा २६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला २५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगार, बिडी कामगार तसंच पतसंस्था कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला आघाडी सरकारनं स्थगिती दिल्याचा खोटा प्रचार सध्या सुरू आहे, असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातल्या प्रचारासाठी सांगली इथं झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते काल बोलत होते. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असंही ते यावेळी म्हणाले.

****

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.

****

लातूर रोड ते गुलबर्गा नवीन रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण मध्य रेल्वे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सुरु केलं असून, हा नवीन रेल्वे मार्ग नळेगाववरुन जोडण्यात यावा अशी मागणी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत काल झालेल्या बैठकीत नवीन रेल्वे मार्गाबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं श्रृंगारे यांनी सांगितलं. २७ नोव्हेंबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात वीज वितरण कंपनीने वीज चोरीस आळा बसावा यासाठी मोहीम हाती घेतली असून, शहरातल्या विविध भागात वीज वितरण कंपनीचे अधिकारी - कर्मचारी भेटी देत वीज चोरी करणारांविरूध्द कारवाई करत साहित्य जप्त करत आहेत. या मोहिमेत ग्राहकांच्या वीज देयकांची वसुलीही करण्यात येत आहे. नागरिकांनी वीज चोरी करू नये, असं आवाहन सहाय्यक अभियंता रुपाली जोशी यांनी केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काल कांद्याचे भाव घसरले. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात तब्बल ७०० रूपयांची घसरण झाली. काल प्रचंड आवक झाल्याने कांद्याचे भाव कमी झाल्याचं सांगण्यात आलं. उन्हाळ कांद्याला सरासरी तीन हजार १०० रूपये, तर लाल कांद्याला सरासरी तीन हजार ६०० रूपये क्विंटल असे भाव होते. लासलगाव बाजार समितीच्या आवारातही उन्हाळ कांद्याचे भाव ७५० तर लाल कांद्याला ३०० रुपयांनी घसरले. काल लाल कांद्याला सरासरी तीन हजार ८०० तर उन्हाळ कांद्याला चार हजार ४०० रुपये भाव मिळाले.

****

राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगांव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या प्रभाग रचना, आरक्षण आणि सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नगरपंचायत सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत २७ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे.

****

No comments: