Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 November 2020
Time 13.00 to 13.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० नोव्हेंबर २०२० दुपारी १.००
****
कोविड १९ची लस विकसित करणाऱ्या
तीन संशोधकांच्या चमूंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहे. जीनोव्हा बायोफार्मा,
बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या संशोधन संस्थेतल्या संशोधकांशी पंतप्रधान दूरदृश्य
संवाद प्रणालीद्वारे कोविड लसीच्या संशोधनाबाबत चर्चा करतील.
****
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज न बाळगण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकर्यांनी सुरु
केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून हे
आवाहन केलं. पंजाबमधल्या शेतकर्यांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक धान्य बाजार
समित्यांमध्ये किमान आधारभूम किमतीत विकलं, असं नमूद करत जावडेकर यांनी, या कृषी कायद्यांमुळे
किमान आधारभूत किंमत आणि बाजार समित्या अबाधित राहणार असल्याचं स्पष्ट केलं.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची ५५१ वी जयंती
आज साजरी होत आहे. यानिमित्तानं नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारासह ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये
विशेष कार्यक्रमातून गुरुनानक यांना अभिवादन केलं जात आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गुरुद्वारांमध्ये गुरुनानक जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचं आयोजन
करण्यात आलं आहे. गुरुद्वारांमध्ये सकाळपासून
भजन, कीर्तन, कथा, व्याख्यान आदी कार्यक्रम सुरु आहेत.
****
जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारतानं मोठं यश मिळवलं आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा
प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या मागे कमी आहे. ही संख्या सध्या सरासरी ९९ अशी
आहे. विशेष लक्ष केंद्रित करून राबवलेल्या अभियानाद्वारे मृत्यूदर कमी ठेवण्याचे प्रभावी प्रबंधन करण्यात आले असून, हा
आकडा ५०० पेक्षा कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंलत्रालयानं सांगितलं.
दरम्यान, देशात काल दिवसभरात ३८ हजार ७७२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले,
तर ४४३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९४ लाख ३१ हजार
६९२ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३७ हजार १३९ रुग्णांचा मृत्यू
झाला आहे. तर काल ४५ हजार ३३३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात
आतापर्यंत ८८ लाख ४७ हजार ६०० रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख ४६ हजार ९५२ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत. काल आठ लाख ७६ हजार १७३ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत
१४ कोटी तीन लाख ७९ हजार ९७६ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं
सांगितलं.
****
औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघाच्या उद्या होत असलेल्या निवडणुकीसाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातल्या पदवीधर मतदारांना विशेष नैमित्तीक रजा मंजूर केली
आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार असल्याचं
जिल्हाधिकाऱ्यांनी काल या संदर्भात काढलेल्या परिपत्रात नमूद केलं आहे.
उद्या
सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत पदवीधर तसंच शिक्षक मतदारांना मतदान करता
येईल, मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. कोरोना विषाणू बाधित मरदारांना शेवटच्या दोन
तासात मतदान करता येईल.
****
राज्यात
मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज उद्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू
होणार आहे. सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत
सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजेपासून ते सायंकाळी
साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. डी
दिघे यांनी दिली.
****
औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं रेल्वेस्थानक आणि विमानतळावर
कोरोना विषाणू चाचणी करण्यात येत आहे. सचखंड एक्सप्रेस रेल्वेनं काल आलेल्या २५३ जणांची
आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.तर औरंगाबाद विमानतळ इथं ३९ प्रवाशांची चाचणी घेण्यात
आली. विमानतळावर परवा केलेल्या आरटीपीसीआर चाचणीत दोन जण बाधित आढळून आले असल्याची
माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकद्वारे
त्यांची माहिती देण्याचं आवाहन शासकीय कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं करण्यात आलं
आहे. भविष्यात घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमासाठी
ही माहिती संकलित केली जात असल्याचं कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधण्याचं अथवा केव्हीके औरंगाबादच्या फेसबुक
पेजवर अपलोड केलेल्या लिंकवर ही माहिती भरावयाची आहे.
****
कोरोना
विषाणू संसर्ग काळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढली असल्यानं चालू वर्षी
१६ लाख हळद पोत्यांची निर्यात करण्यात आली आहे. सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व
ठिकाणची हळद विक्रीसाठी येत असून सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. राज्यात
सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं.
//***********//
No comments:
Post a Comment