Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** संविधान दिनानिमित्त राज्यघटनेच्या
उद्देशिकेचं ठिकठिकाणी वाचन
**जालन्यामध्ये कोरोना विषाणू
संसर्गाचे नवे ३६ रुग्ण तर औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
**पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी
कटीबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
आणि
** लातूरमध्ये मराठवाडा रेल्वे
बोगी प्रकल्पातलं उत्पादन फेब्रुवारी महिन्यापासून - खासदार सुधाकर श्रृंगारे
****
आज देशभर संविधान दिन साजरा
झाला. त्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात राज्यघटनेच्या
उद्देशिकेचं वाचन केलं. राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी यांनी राजभवनामध्ये राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या
उददेशिकेचं सामूहिक वाचन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका संदेशाद्वारे संविधान
दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयामध्ये
राज्यघटनेच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक
यावेळी उपस्थित होते. नागपूर इथं पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकात भारतीय
राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथंल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात
संविधान दिन साजरा करण्यात आला. तालुका विधी सेवा समिती औंढा नागनाथ, वकिल संघ औंढा
नागनाथ यांच्यावतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
औंढा न्यायालयाचे न्यायाधीश प्रदिपसिंह ठाकुर हे होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून सहदिवानी
न्यायाधीश डि.एम.गुलाटी उपस्थित होत्या.
****
राज्यात काल कोरोना विषाणू
संसर्गामुळे ४ हजार ८४४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत
१६ लाख ६३ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण
९२ पूर्णांक ६४ शतांश टक्के झालं आहे. काल आणखी सहा हजार १५९ कोरोना बाधितांची नोंद
झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ९५ हजार ९५९ झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे पोलिस अधिक्षक निखील
पिंगळे यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्गामुळे आज एका रुग्णाचा मृत्यू झाला. या संसर्गावर उपचार घेत असलेल्या
सहा रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात आज कोरोना
विषाणू संसर्गाचे ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता बारा
हजार १७४ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गमुक्त झालेल्या ५२ रुग्णांना आज
सुटी देण्यात आली. जिल्ह्यातले अकरा हजार ५४२ रुग्ण या आजारातून आतापर्यंत बरे झाले
आहेत. जालना जिल्ह्यात संसर्ग झालेल्या ३२१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
शेतकरी विरोधी कृषी कायदे
तसंच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी देशभरातल्या
१० केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारत आंदोलन केलं. लातुर इथंही कामगार
संघटनांनी तहसिल कार्यालया समोर आंदोलन करत निदर्शन केली. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सर्व कामगार, कर्मचारी संघटना कृतीसमितीतर्फे संप करण्यात आला. धुळे
तसंच रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग इथं मोर्चा काढण्यात आला.
****
पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी
सदैव कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये
राज्याच्या पोलीस मुख्यालयात पोलीस दलातल्या हुतात्मांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या
`हुतात्मा दालनाचं` उद्घाटन करताना बोलत होते. कोरोना विषाणू संसर्ग काळातल्या पोलिसांच्या
कामगिरीचा आढावा घेणाऱ्या ''अतुल्य हिंमत'या `कॉफी टेबल बुकचं` प्रकाशन यावेळी करण्यात
आलं. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारावा स्मृतीदिन
पाळण्यात आला. पाकिस्तानातल्या `लष्कर- ए- तय्यबा` या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या
या हल्ल्यात १६० हून अधिक व्यक्तींचा बळी गेला होता. या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या
पोलीस शूरवीरांना मुंबई पोलीस आयुक्तालय प्रांगणातील हुतात्मा स्मारकामध्ये राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार
मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली अर्पण केली. त्यानंतर
त्यांनी हुतात्मांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
****
लातूर जिल्ह्यातल्या मराठवाडा
रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून नव्या वर्षातल्या फेब्रुवारी माहिन्यात
प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार असल्याची माहिती खासदार सुधाकर श्रृंगारे यांना या प्रकल्पाच्या
अधिकाऱ्यांनी दिली आहे. खासदार श्रृंगारे यांनी प्रकल्पस्थळी विभागीय रेल प्रबंधक शैलेश
गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेवून झालेल्या आणि होत असलेल्या कामांचा आढावा
घेतला तसंच प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पात मराठवाड्यातील तरुणांसाठी ८० टक्के
जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रकल्प कार्यान्वित होत असताना टप्प्याटप्प्यानं
या जागा भरल्या जाणार असून त्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळून बेरोजगारीची
समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचं खासदार श्रृंगारे यांनी सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं
प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड-पनवेल-नांदेड ही उत्सव विशेष गाडी चालवली जात आहे.
या गाडीस आता एका महिन्याची मुदत वाढ देण्यात आली असुन, दिनांक ३० नोव्हेंबर ते ३०
डिसेंबर पर्यंत ही मुदतवाढ असेल. ही गाडी दिनांक ३० नोव्हेंबर पासून बदलेल्या वेळेनुसार
म्हणजेच नांदेड रेल्वे स्थानकावरून सायंकाळी पाच वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या
दिवशी सकाळी ९ वाजता पनवेल इथं पोहोचेल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र
नर्सी इथं संत नामदेव महाराज यांचा साडे सातशेवा जन्मोत्सव सोहळा आज भक्तिमय वातावरणात
साजरा झाला. कार्तिकी एकादशी आणि संत नामदेव जन्म सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरामध्ये
विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. आज सकाळी सहा वाजता नर्सीसह पंचक्रोशीतल्या
भाविकांच्या उपस्थितीत मंदिर परिसरामध्ये हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव करण्यात आला.
सकाळी साडे सहा वाजता जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आणि सुधीरआप्पा सराफ यांच्या हस्ते ‘श्री’ च्या वस्त्र समाधीची महापूजा आरती करण्यात
आली.
****
वाढीव वीज देयकं तसंच महिला
बचत गटांचं कर्जमाफ करण्यात यावं या मागणीसाठी आज जालना इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळानं मागण्यांचं
एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई, धुळे
तसंच नाशिक इथंही मोर्चा काढण्यात आला.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या दाती
शिवारात लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ट्रक चालक आणि सहाय्यक यांचा
आज जागीच मृत्यु झाला. नांदे़ड - हिंगोली मार्गावर चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्याकडेच्या
नाल्यामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रक हैदराबादहून इंदूरकडे जात
होता. दोघंही मृत इंदूरचे रहिवासी आहेत.
****
परभणी जिल्ह्यात पोलिस अधीक्षक
जयंत मीना यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकानं वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्या तीन वाहनांविरूध्द
कारवाई केली आहे. पालम, जिंतूर, परभणी ग्रामीण, पिंपळदरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या
या कारवाईत २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाचे फौजदार चंद्रकांत
पवार, आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
****////****
No comments:
Post a Comment