Sunday, 29 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढण्याचा मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा इशारा

** केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

** कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये एका तर जालन्यात चार रुग्णांचा मृत्यू

आणि

** भारत ऑस्ट्रेलिया एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी

****

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर येत्या आठ डिसेंबरला मोर्चा काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला आहे. मराठा मोर्चाची आज पुण्यात बैठक झाली, त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ऊर्जा भरतीमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास - एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना वगळल्याच्या विरोधात सर्व जिल्ह्यात वीज महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर परवा एक डिसेंबरला आंदोलन केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. राज्य सरकारनं न्यायालयीन प्रक्रिया आणि इतर प्रत्येक बाबतीत वेळकाढूपणा केल्यानं, मराठा समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे, या अस्वस्थतेतूनच हे आंदोलन केलं जात असल्याचं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

****

मराठा समाजाला आरक्षण का देण्यात येत नाही, याचा जाब प्रत्येकानं राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. ते आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या समाजानं सत्तेत बसवलं, तोच समाज सत्तेतून खाली उतरवेल, असा इशाराही उदयनराजे यांनी यावेळी दिला. सर्वोच्च न्यायालायचा निकाल येईल, त्याला अधीन राहून मराठा समाजाची टक्केवारी राखून ठेवत इतर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाच्या मोर्चांना उत्तर देण्यासाठी प्रतिमोर्चे काढण्यात येतात, त्यामागे कोण असतं, असा प्रश्नही उदयनराजे यांनी विचारला आहे.

****

राज्यात मुंबई उच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांचं कामकाज येत्या मंगळवारपासून नियमितपणे सुरू होणार आहे. सर्व न्यायालयांचे न्यायाधीश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरा वाजेपासून दुपारी दीड वाजेपर्यंत आणि दुपारी दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस. डी दिघे यांनी दिली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची सद्य स्थिती लक्षात घेऊन मुख्य न्यायाधीश आणि प्रशासकीय न्यायाधीशांच्या समितीनं हा निर्णय घेतला आहे.

****

केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचं संरक्षण साधणारे कायदे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा हा ७१वा भाग होता. या कायद्यांची ‘योग्य आणि पूर्ण माहिती’ शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले. या कायद्याचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या भटाणे गावातले शेतकरी जितेंद्र भोई यांनी व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याबाबत जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीसाठी आपली प्रतिक्रिया दिली आहे…

 

आज माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मन की बात या कार्यक्रमातून देशाचे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी माझा नामोल्लेख केला. त्याबद्दल मला खूपच आनंद होत आहे. माननीय प्रधानमंत्री साहेबांचे आभार मानतो की, माझे मक्याचे पैसे बुडालेले असताना मी केंद्र शासनाचा शेतकरी हिताचा कायद्याच्या मदतीने मला तो पैसा परत मिळाल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज एका ९० वर्षीय कोविड बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १४४ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. औरंगाबाद इथल्या घाटी रुग्णालयातून आज सहा जणांना सुट्टी देण्यात आली, जिल्ह्यातले ४१ हजार ११५ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोविडबाधितांची एकूण संख्या ४३ हजार १८४ झाली आहे.

****

जालना जिल्ह्यात आज चार कोविडबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता ३१७ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात कोरोना विषाणू संसर्ग झालेले ४३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार २८३ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ६०४ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर बाधित असलेल्या ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्वच प्रकल्प वर्षभरापासून रखडले असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव इथला टेक्निकल टेक्सटाईल पार्क आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे प्रकल्प, महाविकास आघाडी सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी घेवून केंद्राकडे शिफारस केली नसल्यामुळे रखडले असून, सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसाठी न ठेवल्यानं आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केले नसल्यानं रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येत्या पंधरा डिसेंबर पर्यंत यासंदर्भात बैठक घेतली नाही तर मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करण्यात येईल, असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

****

मध्य रेल्वे परवा, मंगळवारपासून काही विशेष गाड्या सुरू करत आहे. यातली मुंबई - लातूर विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून रात्री नऊ वाजता सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता पोहचेल. लातूर इथून रात्री साडे दहा वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहचेल. मुंबई-आदिलाबाद विशेष ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून दुपारी चार वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडे नऊ वाजता आदिलाबादला पोहचेल. आदिलाबाद इथून दुपारी एक वाजता सुटणारी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचेल. या विशेष गाड्यांमधू फक्त आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. 

$60B7F3D6-B41D-4F2E-890F-60F527B****

क्रिकेट

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचा ५१ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघानं आज सकाळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, निर्धारित षटकांत यजमान संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात ३८९ धावा करत, भारतीय संघासमोर ३९० धावांचं आव्हान ठेवलं. कर्णधार विराट कोहलीच्या ८९ आणि के एल राहुलच्या ७६ धावा वगळता भारतीय संघाचे अन्य फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले, निर्धारित षटकांत भारतीय संघ ३३७ धावांवर सर्वबाद झाला. तीन सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना दोन डिसेंबरला खेळवला जाणार आहे.

****

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या आजचा एकदिवसीय सामना खेळून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं अडीचशे एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम केला आहे.  असा विक्रम करणारा कोहली हा नववा भारतीय खेळाडू आहे. कोहलीच्या आधी अजहरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, आणि महेंद्रसिह धोनी या कर्णधारांसह अनिल कुंबळे, युवराज सिंह, विरेंद्र सेहवाग, यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.

****

राज्यात परवा, मंगळवारी पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या करता मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, शासकीय किंवा खासगी आस्थापनांनी दिलेलं ओळखपत्र, शिक्षण संस्थेत कार्यरत शिक्षक मतदारांना दिलेलं ओळखपत्र, पदवी किंवा पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत अपंगत्वाचं मूळ प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्रं पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग काळात औषधी गुणधर्मामुळे परदेशात हळदीची मागणी वाढली असल्यानं चालू वर्षी १६ लाख हळद पोत्यांची निर्यात करण्यात आली आहे. सांगली मार्केट यार्डात देशातल्या सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येत असून सध्या दररोज ४ हजार हळद पोत्यांची आवक सुरू आहे. राज्यात सांगली, हिंगोली, वसमत, नांदेड, जळगाव इथून दरवर्षी हळदीचं उत्पादन घेतलं जातं.

****////****

 

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...