आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ नोव्हेंबर २०२० सकाळी
११.०० वाजता
****
देशात
आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोरोना विषाणू बाधित ४४ हजार ३७६ नवे रुग्ण
आढळून आले, तर ४८१ जणांचा मृत्यू झाला. या काळात ३७ हजार ८१६ रुग्णांना उपचारानंतर
घरी सोडण्यात आलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल कोविड बाधित १४६ नवे रुग्ण आढळले, तर उपचारानंतर बरे झाल्यामुळे ११०
जणांना घरी सोडण्यात आलं. दरम्यान, जिल्ह्यात ९ वी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याच्या
पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या तपासण्या सुरु असून काल ३३६ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या
तपासण्या करण्यात आल्या,यामध्ये ५ शिक्षक बाधित असल्याचं आढळून आलं.
****
कार्तिकी
एकादशीला सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून पंढरपूर
शहर आणि परिसरातल्या दहा गावांमध्ये काल रात्री बारा वाजेपासून संचारबंदी लागू करण्यात
आली असून ही संचारबंदी उद्या रात्री बारावजेपर्यंत राहणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद
शंभरकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, कोरोना संसर्ग
टाळण्यासाठी प्रशासनाने ही संचारबंदी लावली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा
विसर्ग करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे
विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या पाण्याचा लाभ औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे.
****
मराठा
आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं
मराठा मशाल जागृती यात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद इथल्या क्रांती चौक इथून शनिवारी
२८ नोव्हेंबरला या यात्रेला सुरुवात होणार असून मुंबईच्या आझाद मैदान इथं सात डिसेंबरला
ही यात्रा दाखल होणार आहे.
****
No comments:
Post a Comment