Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2020
Time 13.00 to 13.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००
****
संविधान
दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संविधानाच्या उद्देशिकेचं
वाचन केलं. २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाच्या संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार केला होता,
हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झालं.
****
मुंबईत
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आज बारावा स्मृतीदिन पाळण्यात
येत आहे. पाकिस्तानातल्या लष्कर- ए- तय्यबा या दहशतवादी संघटनेनं घडवून आणलेल्या या
हल्ल्यात १६० हून अधिक व्यक्तींचा बळी गेला होता.
या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई
पोलिसांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दक्षिण मुंबईतल्या पोलीस
मुख्यालयात अलिकडेच बांधण्यात आलेल्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम होणार आहे. मात्र कोरोना
विषाणू साथीच्या पार्श्र्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित
राहता येईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्यासह इतर मंत्र्यांनी या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन
केलं.
****
कोविड
रुग्णांची संख्या सलग १८ व्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं आहे.
काल दिवसभरात ४४ हजार ४८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५२४ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ९२ लाख ६६ हजार
७०६ झाली आहे, तर मृतांचा आकडा एक लाख ३५ हजार २२३ इतका आहे. काल ३६ हजार ३६७ रुग्ण
बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८६ लाख ७९ हजार १३८ रुग्ण
बरे झाले असून, सध्या चार लाख ५२ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात रुग्ण
बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक सात दोन टक्के तर मृत्यूदर एक पूर्णांक चार सहा टक्के
इतका आहे.
****
देशात
चालू खरीप विपणन हंगामात ३०४ लाख टन धानाची खरेदी करण्यात आल्याचं कृषी मंत्रालयानं
सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही खरेदी १७ पूर्णांक आठ दोन टक्के अधिक आहे. महाराष्ट्रासह
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगढ, जम्मू काश्मीर,
केरळ, गुजरात आणि आंध्र प्रदेशात धान खरेदी योग्य रितीने सुरु असल्याचंही मंत्रालयानं
सांगितलं.
****
लँडलाईन
फोनवरुन मोबाईलवर फोन करण्यासाठी संबंधित नंबरच्या आधी शून्य लावावा लागणार असल्याचं
दूरसंचार मंत्रालयानं सांगितलं. पुढच्या वर्षी १५ जानेवारीपासून हा बदल लागू होईल.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्रायच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं
मंत्रालयानं सांगितलं. लँडलाईन वरुन लँडलाईनवर आणि मोबाईल वरुन लँडलाईनवर फोन करण्यासाठी
कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं.
****
शेतकरी
विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी
देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला
२५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
दरम्यान,
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात
येईल, असं शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्य
शासनाच्या वतीनं संत साहित्य तसंच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१९-२० चा
ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे. कार्तिकी
एकादशीचं औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत
या पुरस्काराची घोषणा केली. संत साहित्याविषयी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना
अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं दर वर्षी ‘ज्ञानोबा
तुकाराम पुरस्कारा’नं सन्मानित केलं जातं. पाच लाख रुपये, मानपत्र तसंच मानचिन्ह असं
पुरस्काराचं स्वरुप आहे. ह.भ.प.बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपूर इथल्या तनपुरे महाराज
आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून, वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा
समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. साने गुरुजींपासून
ते डॉ.दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचं साहचर्य राहिलं
आहे.
****
सातार्याहून
मुंबईकडे जाणारया एस. टी. बसला मुंबई - पुणे दृतगती मार्गावर आज पहाटे अपघात झाला.
यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले. मृत व्यक्ती मुंबईतला बेस्ट
कर्मचारी असल्याचं समजतं. बसने पाठीमागून एका अज्ञात वाहनास धडक दिल्यानं हा अपघात
झाला.
****
निवार
चक्रीवादळ काल रात्री तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर धडकलं असून, चेन्नईसह अनेक भागात
मुसळधार पाऊस झाला. सहा तासानंतर चक्रीवादळाचा जोर कमी होईल, मात्र याचा प्रभाव म्हणून
१५ तास पाऊस पडत राहील, असं हवामान विभागानं सांगितलं.
****
No comments:
Post a Comment