Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** कोरोना विषाणूच्या वाढत्या
रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक
सूचना
** मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या
स्थगितीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य सरकारचा
निर्णय
** औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या
सूक्ष्मजीवशास्त्र विभागातल्या विषाणू संशोधन आणि निदान या नविन प्रयोगशाळेचं जिल्हाधिकारी
सुनिल चव्हाण यांच्या हस्ते उद्धाटन
आणि
** जालना जिल्ह्यात दोन, तर औरंगाबाद जिल्ह्यात
एका कोविड बाधित रुग्णाचा मृत्यू
****
कोरोना विषाणूच्या वाढत्या
रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं संपर्कातल्या रुग्णांचा शोध
घेणं, प्रतिबंधित क्षेत्र आणि खबरदारीसंदर्भात नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या
आहेत. गृह मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विषाणूला रोखण्यासाठी
उपाय करण्याचे, विविध व्यवहारांवर मर्यादा आणण्याचे आणि गर्दीला नियंत्रित करण्यासाठी
उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मास्क वापरण, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित
अंतर राखण्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जावं, असंही सांगितलं आहे. राज्य किंवा
केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय प्रतिबंधित क्षेत्राबाहेर टाळेबंदी
लागू करु शकत नाही, असं या आदेशात म्हटलं आहे.
गृह मंत्रालयानं जारी केलेल्या
मार्गदर्शक सूचनांमध्ये, प्रतिबंधित क्षेत्रात केवळ अत्यावश्यक सेवांनाच सुरु ठेवण्याची
परवानगी देण्यात आली आहे. तसंच प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचं पालन व्यवस्थित होत
आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी, स्थानिक जिल्हा पोलिस आणि नगरपालिका अधिकाऱ्यांवर
सोपवण्यात आली आहे. संपर्कातल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी देण्यात
आला आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती या पहिल्या
७२ तासात शोधून काढाव्या, असं या आदेशात म्हटलं आहे. या मार्गदर्शक सूचना एक डिसेंबर
ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी लागू असतील.
****
मराठा आरक्षणाला सर्वोच्च
न्यायालयानं दिलेल्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया
पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाबाबत राज्य
सरकारनं आज शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमधल्या नऊ सप्टेंबर
२०२० नंतरची सर्व प्रवेश प्रक्रिया सामाजिक आणि शैक्षणिक मागास - एसईबीसी प्रवर्गासाठीचे
आरक्षण नं ठेवता पार पाडण्याचे निर्देश सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आले आहेत.
नऊ सप्टेंबर २०२० पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला असेल, मात्र अद्याप
प्रवेश दिला गेला नसेल तर अशा एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या
सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रशासकीय विभागांनी या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी
करावी असंही या आदेशात म्हटलं आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या
अंतिम निकालापर्यंत हा शासन निर्णय लागू राहणार आहे.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष
दिलीप चव्हाण यांनी केलं आहे.
****
राज्यातल्या धर्मादाय रूग्णालयांमध्ये दहा टक्के गरिब रूग्णांना मोफत उपचार
द्यावेत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
यासंदर्भातल्या बैठकीत ते आज बोलत होते. कोविड १९ महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण
भागातले रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत, मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा
ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरीब रूग्णांची सेवा
करावी अशा सूचना विधी आणि न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी
दिल्या.
****
शेतकरी
विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी
देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी उद्या २६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला
आहे. या संपाला २५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगार,
बिडी कामगार तसंच पतसंस्था कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही या संपाला पाठिंबा दिला आहे.
पक्षाच्या औरंगाबाद जिल्हा कमिटीचे सचिव विधीज्ञ भगवान भोजने यांनी प्रसिद्ध केलेल्या
पत्रकात ही माहिती दिली आहे. आयटक संलग्नित लाल बावटा रिक्षा युनियननेही या संपात सहभागी
होणार असल्याचं सांगितलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. मात्र
लाल कांद्याचे भाव वाढत आहेत. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात
उन्हाळ कांद्याला सरासरी तीन हजार ३०० रुपये भाव मिळाला, तर लाल कांद्याला सरासरी चार
हजार ३०० रुपये भाव मिळाला.
दरम्यान,
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सह अन्य बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे
भाव घसरू लागले आहेत. नाशिक बाजार समितीत कोथिंबीर, मेथी आणि शेपू या भाज्यांना एक
ते तीन रुपये प्रति जुडी असा अत्यल्प भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालं, अनेक
शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात जुड्या तशाच फेकून दिल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातल्या विषाणू संशोधन आणि
निदान या नविन प्रयोगशाळेचं उद्धाटन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते आज झालं.
या प्रयोगशाळेला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आय.सी.एम.आर कडून सप्टेबर २०१९
मध्ये मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासन पुरस्कृत या प्रयोगशाळेत आजपर्यंत एक लाख २६
हजार ६१० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या प्रयोगशाळेची दोन हजार कोरोना
विषाणू चाचण्या प्रति दिवस करण्याची क्षमता असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर
यांनी दिली.
****
जालना
जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं
झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३११ झाली आहे. तर आज दिवसभरात ६९ नवीन रुग्ण आढळून
आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १२ हजार १३८ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त
झालेल्या १३३ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ११ हजार ४९० रुग्ण
बरे झाले असून, सध्या ३३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीत एका ७० वर्षीय महिलेचा आज
कोरोना विषाणू संसर्गानं मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक
हजार १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या ४२ हजार ६४६ झाली असून
८०१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आज आठ जणांना बरे झाल्यानं सुटी देण्यात आली.
त्यामुळे औरंगाबाद जिल्हयात आतापर्यंत ४० हजार ७०७ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात
केली आहे.
****
धुळे
जिल्ह्यात आज आणखी १५, तर भंडारा जिल्ह्यात ७१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले.
****
निराधारांसाठीच्या
विविध योजनेतल्या वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना घरपोहोच अर्थसहाय्य द्यावं, अशी
मागणी लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या
ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये मिळून एक दत्तक बॅक आहे. त्यामुळे या बॅकेतून निराधारासाठीच्या
विविध योजनेतल्या वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना दिलं जाणारं अर्थसाहाय्य खात्यावरून
काढण्यासाठी दरमहा प्रवास करावा लागतो आणि रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं, असं आमदार
पवार यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी या मागणीची दखल घेतली असून, यासंदर्भात लवकरच
बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
****
कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं मास्क न लावता फिरणाऱ्या
नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. आज हिंगोली शहरातल्या गांधी चौक आणि इंदिरा चौक
याठिकाणी कारवाई केली असून, चाळीस नागरिकांकडून आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
लातूर
शहरात महानगरपालिकेचे विकेंद्रीत पद्धतीने ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे चार प्रकल्प
शहरात सुरु करण्यात आले आहेत. या माध्यमातून निम्म्या शहरातला कचरा प्रभागातच
कुजवून खत निर्मिती केली जात आहे. शहरातल्या
एकूण नऊ प्रभागात निर्माण होणाऱ्या सुमारे २५ टन ओल्या कचऱ्यावर या माध्यमातून दररोज
प्रक्रिया होत आहे. अर्ध्या लातूर शहरातला कचरा शहरातच कुजवून त्यापासून खत निर्मिती
सुरू आहे.
//************//
No comments:
Post a Comment