Monday, 30 November 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 November 2020 Time 18.00 to 18.10 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 November 2020

Time 18.00 to 18.10

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००

****

** पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उद्या मतदान; मराठवाड्यात ८१३ मतदान केंद्रांवर पथकं रवाना

** ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं अकोला इथं दीर्घ आजारानं निधन

** शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची जयंती सर्वत्र भक्तिभावानं साजरी

** जालना तसंच औरंगाबाद इथं आज प्रत्येकी दोन कोविडबाधितांचा मृत्यू

आणि

** कृषीपूरक उद्योग - व्यवसाय उभारून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्य - सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांचं आश्वासन

****

मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात उद्या पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत मतदान होणार आहे. विभागात एकूण ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार ८१३ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील. औरंगाबाद जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ७९ मतदारांसाठी २०६ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. जालना जिल्ह्यात २९ हजार ७६५ मतदारांसाठी ७४ मतदान केंद्र, परभणी- ३२ हजार ७१५ मतदारांसाठी ७८ केंद्रं, हिंगोली- १६ हजार ७९४ मतदारांसाठी ३९ केंद्रं, नांदेड- ४९ हजार २८५ मतदारांसाठी १२३ केंद्रं, बीड - ६३ हजार ४३६ मतदारांसाठी १३१ केंद्रं, लातूर - ४१ हजार १९० मतदारांसाठी ८८ केंद्रं,तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३३ हजार ६३२ मतदारांसाठी ७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर मतपत्रिका, मतपेट्या आणि सर्व आवश्यक साहित्यासह मतदान केंद्र पथकं आज रवाना झाली. कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या सर्व मतदान केंद्रांचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं असून, इतरही सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार असून, कोविड बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे.

 

जालना जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या ठिकाणचे आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, पदवीधर मतदारांनी या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क योग्य पद्धतीने बजवावा यासाठी, निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरवलेल्या जांभळया रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा, आपली पहिली पसंत असलेल्या उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या रकान्यात "१" हा अंक लिहावा, उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर आपल्या पसंती क्रमानुसार २, ३, ४, इत्यादी अंक लिहिणं ऐच्छिक असल्याचं, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मतपत्रिकेवर इतर काहीही लिहू नये किंवा खुणा करू नयेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून उद्या कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा मंजूर करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त कार्यालयातील उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.

या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी विभागात एकूण ९३७ सुक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी केलं आहे. 

****

ज्येष्ठ रंगकर्मी, राम जाधव यांचं आज अकोला इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रंगभूमीवर अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणूनही आपली छाप पाडलेल्या जाधव यांना राज्यशासनासह विविध संस्थांनी अनेक पुरस्कार देऊन गौरवलं होतं. २०११ मध्ये रत्नागिरी इथं भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद राम जाधव यांनी भुषवलं होतं. त्यांच्या निधनानं नाट्यक्षेत्रासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

****

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांचं आज सकाळी निधन झालं, चंद्रपूर जिल्ह्यात आनंदवन इथं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांच्या नात तर डॉ विकास आमटे यांच्या कन्या असलेल्या डॉ. शीतल यांना ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च २०१६ मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ या पुरस्कारनं गौरवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होत्या, त्यातच यांनी आनंदवनातले कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते, मात्र आमटे कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून, हे आरोप तथ्यहीन असल्याचं स्पष्ट केलं होतं.

****

शीख धर्माचे संस्थापक गुरु नानकदेव यांची जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुनानक यांना अभिवादन केलं, प्रत्येकाशी सन्मानाने आणि प्रेमपूर्वक आदराने वागण्याची गुरुनानक यांची शिकवण आजच्या काळात खूप महत्त्वाची असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुनानक यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांना अभिवादन केलं. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावलं असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे

गुरुनानक जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांधमध्ये कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. जालना इथं सार्वजनिक मिरवणूक न काढता शीख बांधवांनी सामाजिक उपक्रम राबवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्य सरकार मागील वर्षभरात सर्वच बाबतीत अपयशी ठरल्याची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. त्या आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती ही जनतेची निराशापूर्ती असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार संतोष दानवे यांनीही यावेळी राज्यसरकारच्या धोरणांवर टीका केली.

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोविडबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या आता ३१९ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात ६८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता बारा हजार ३५१ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झालेल्या १११ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले अकरा हजार ७१३ रुग्ण या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आज दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर नऊ जणांना उपचारानंतर कोविड संसर्गमुक्त झाल्यानं, रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात या संसर्गाने आजपर्यंत एक हजार १४७ जणांचा मृत्यू झाला असून, ४१ हजार १८५ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत, जिल्ह्यातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ४३ हजार ३०० झाली आहे

****

मराठवाड्यातल्या युवकांनी कृषीपूरक उद्योग - व्यवसाय उभारावेत, असं आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. लातूर तालुक्यात रायवाडी इथं संगमेश्वर बोमणे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या श्रीशैल्य हायटेक नर्सरीचा शुभारंभ आज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन देशमुख यांनी दिलं.

****

हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा जवळ आज मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वे विभागानं उद्यापासून काही गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, यामध्ये सिकंदराबाद - मनमाड- सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेसचा समावेश आहे. हैदराबाद -जयपूर-हैदराबाद उत्सव विशेष गाडी, पूर्णा पाटणा पूर्णा उत्सव विशेष गाडी या दोन गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आदिलाबाद-मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस या गाडीला उद्यापासून मध्ये तीन अधिकचे डबे जोडले जाणार आहेत.

****////****

 

No comments: