Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 November 2020
Time 07.10 to 07.25
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०
****
·
कोविड प्रतिबंधाबाबत नागरिकांना नव्यानं जागरूक करण्याची आवश्यकता
पंतप्रधानांकडून व्यक्त.
·
कोविड लस आणि वितरणासंदर्भात राज्यात कृती दलाची स्थापना - मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे.
·
राज्यात टाळेबंदीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं आरोग्यमंत्र्यांकडून
स्पष्ट.
·
काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचं निधन.
·
राज्यात आणखी पाच हजार ४३९ कोविड रुग्णांची नोंद; मराठवाड्यात
नवे ५०६ रुग्ण.
·
कोविड संसर्गाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त राखावी
- औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांचं आवाहन.
आणि
·
बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू.
****
कोविड
लसीकरणाची प्रक्रिया विनाअडथळा पारदर्शक पद्धतीनं राबवली जाण्यासाठी राज्य आणि केंद्र
सरकारने समन्वयानं काम करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. कोविडचा अधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांनी
काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
कोविड
लसीच्या साठवणीसाठी शीतगृह उभारणीवर राज्यांनी आतापासूनच लक्ष द्यावं, असं पंतप्रधानांनी
सांगितलं. कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत नागरिकांना नव्यानं जागरूक करण्याच्या आवश्यकतेवर
पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले –
लोगोंको कोरोना की गंभीरता के
प्रती हमे फिरसे जागरूक करना ही होगा। हमें किसी भी हालत में ढिलाई नही बरतने देनी
हैं। अब वैक्सिन आने के बाद भी हमारी प्राथमिकता यही होगी की सभी तक कोरोना की वैक्सिन
पोहोंचे। उसमें तो कोई विवाद हो ही नही सकता। लेकिन कोरोना वैक्सिन से जुडे भारत का
अभियान अपने हर नागरिक के लिए एक प्रकारसे नेशनल कमिटमेंट की तरह है। इतना बडा अभियान
स्मुथ हो, सिस्टीमैटीक हो और सस्टेनेबल ये लंबा चलनेवाला है। इसके लिए हम सभी को हर
सरकार को, हर संघटन को, एकजुट हो कर के, कोऑर्डिनेशन के साथ एक टीम के रूप मे काम करना
ही पडेगा।
कोरोना
विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आणि मृत्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत
चांगल्या स्थितीमध्ये असून, हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचं त्यांनी नमूद
केलं. कोरोना बाधित रुग्णांचं प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर
एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन पंतप्रधानांनी
यावेळी केलं.
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यासह, गुजरात, हरियाणा, केरळ, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि राजस्थान
या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते.
या
वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कोरोना विषाणूची लस आणि तिचं वितरण यासंदर्भात
राज्यात एका कृती दलाची स्थापना करण्यात आली असल्याचं सांगितलं. कोरोना विषाणू संसर्ग
रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसंच
प्रतिबंधित क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने
हा लढा देता येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातल्या
सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचं गांभीर्य समजावून सांगावं, असंही मुख्यमंत्री
म्हणाले.
दरम्यान,
केंद्रीय आरोग्य सचिवांनी या बैठकीत केलेल्या सादरीकरणानुसार महाराष्ट्रात गेल्या दोन
आठवड्यात दररोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत घसरण झाली असून, आठ राज्याच्या तक्त्यात आता
राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
****
दरम्यान,
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मुख्य सचिव हे राज्यात स्थापन करण्यात आलेल्या
कृती दलाचे अध्यक्ष असतील. नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य
विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त आणि वैद्यकीय
शिक्षण संचालक, हे या दलाचे सदस्य असतील. लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी
ठरवणं, लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसंच लसीची किंमत ठरवणं, ही
कामं कृती दलाकडे सोपवण्यात आली आहेत.
****
राज्यात
टाळेबंदीबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
आगामी काळात राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी काही निर्बंध
घालण्याबाबत विचार सुरु असल्याचं ते म्हणाले. राज्यातली कोविड-19 ची स्थिती इतर राज्याच्या
तुलनेत समाधानकारक असून, यापुढे ज्या घटकांकडून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो त्यांच्या
चाचण्या करण्यावर भर दिला जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
****
केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली
आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित
सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी
केलं आहे.
****
काँग्रेस
पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचे आज पहाटे कोविड संसर्गाने निधन झालं.
ते ७१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे
साडे तीन वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल पटेल यांनी
ट्वीट संदेशातून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण
केली. चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणात दिलेलं योगदान
सदैव स्मरणात राहील, असं पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
काँग्रेसच्या
महासचिव प्रियंका गांधी यांनी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या निधनानं
मोठी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे
****
धान
उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल सातशे रुपये देण्याचा निर्णय राज्य
सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप
पणन हंगाम २०२०-२१ मधल्या खरेदी केलेल्या धानासाठी केंद्र शासनानं निश्चित केलेल्या
दराव्यतिरिक्त ही रक्कम देण्यात येणार आहे.
येत्या
शुक्रवारपासून राज्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं
घेतला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये
एकूण १६ कापूस उत्पादक जिल्ह्यातल्या २१ केंद्रामध्ये तसंच ३३ जिनिंग मिलमध्ये कापूस
खरेदी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये निविदेस प्रतिसाद न मिळालेल्या
बीड, परभणी आणि जळगाव या तीन जिल्ह्यात नऊ कापूस खरेदी केंद्रं डिसेंबर महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहेत.
****
राज्यात
अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असताना केंद्र सरकारनं
मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं, केंद्राची ही वागणूक सापत्नभावाची असल्याचं कॉंग्रेस
प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर
परिषदेत बोलत होते. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी
केंद्राचं पथक आलं नाही, जीएसटी परतावा आणि राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत,
यावरुन विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातल्या भाजप सरकारचा प्रयत्न
असल्याचा आरोप थोरात यांनी केला.
****
भारतीय
जनता पक्ष यापुढे स्वबळावर निवडणुका लढवेल आणि जिंकेल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ
निवडणूक दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषेदत बोलत होते. अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार
काळ चालणार नाही, ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ, तोपर्यंत
सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राहू, असं फडणवीस म्हणाले. आपल्या कार्यकाळात तीन वर्ष
दुष्काळ असल्यामुळे, आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या
वीज जोडण्या तोडल्याही नाही, त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही
प्रमाणात वाढ झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहुतांश
शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
केंद्रानं
केलेले कायदे आणि आदेश राज्य सरकार मानत नसेल तर ते बंड असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे
नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल सांगली इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
राज्य सरकारनं घटनाबाह्य भूमिका घेतल्यास केंद्र राष्ट्रपती राजवट लावू शकतं, असा इशारा
त्यांनी दिला. मराठा आरक्षणाला न्यायालयातून स्थगिती आहे, मात्र मुस्लिम समाजाच्या
पाच टक्के आरक्षणाला स्थगिती नाही. धर्मनिरपेक्षतेचा चेहरा सांगणारं महाविकास आघाडीचं
सरकार मुस्लिमांना आरक्षण का देत नाही, असा प्रश्नही आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित
केला.
****
केंद्र
सरकारनं ४३ मोबाईल ॲप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अली सप्लायर्स, अलिबाबा
वर्कबेंच, लालामूव्ह इंडिया, स्नॅक व्हिडिओ, कॅमकार्ड, फ्री डेटिंग ॲप, कॅशियर वॉलेट
इत्यादी ॲप्सचा यात समावेश आहे.
****
राज्यात
काल आणखी पाच हजार ४३९ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१७ लाख ८९ हजार ८०० झाली आहे. काल ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ६८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार
हजार ८६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ५८
हजार ८७९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८३ हजार २२१ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल चार कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, तर नव्या पाचशे सहा रुग्णांची नोंद झाली.
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल तीन रुग्णांचा तर औरंगाबाद जिल्ह्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला. औरंगाबाद
जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवीन १४६ रुग्ण आढळले, बीड जिल्ह्यात ९९ रुग्ण,
लातूर जिल्ह्यात ८८, नांदेड ६१, जालना ५०, उस्मानाबाद २९, परभणी १९, तर हिंगोली जिल्ह्यात
काल १४ नवे रुग्ण आढळले.
****
कोविड
संसर्गाला अटकाव करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त राखण्याचं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेचे
प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. सध्या
दररोज दीडशेच्या आसपास नवे कोविड रुग्ण आढळत आहेत, पुढच्या पाच दिवसांत ही संख्या दररोज
तीनशेच्या घरात गेली तर दुसरी लाट आली, असं समजावी लागेल, त्यामुळे कोविड प्रतिबंधाच्या
दृष्टीनं औरंगाबाद शहरासाठी पुढचे पाच दिवस महत्त्चाचे असल्याचं पाण्डेय म्हणाले.
दरम्यान,
औरंगाबाद रेल्वेस्थानकावर सचखंड एक्स्प्रेसमधून आलेले ४ प्रवासी कोरोना विषाणू बाधित
असल्याचं आढळून आलं. गाडीतल्या २६० प्रवाशांची काल चाचणी करण्यात आली. औरंगाबाद विमानतळावरही
काल २६ प्रवाशांची चाचणी करण्यात आली.
****
सार्वजनिक
खाजगी भागीदारीमुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील असा विश्वास वैद्यकीय
शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे. ते काल या संदर्भातल्या एका बैठकीत
बोलत होते. राज्यातलं एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निवडून तिथे सार्वजनिक खाजगी
भागीदारी तत्वातून महाविद्यालय कसं चालतं हे पाहण्याचं नियोजन करण्यात येत असल्याचं
देशमुख यांनी सांगितलं. हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला
गती देण्यात येईल, असंही देशमुख यांनी यासंदर्भातल्या अन्य एका बैठकीत सांगितलं.
****
शिवसेनेचे
आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना सक्तवसुली संचालनालय - ईडीनं चौकशीसाठी
ताब्यात घेतलं आहे. ईडीनं काल सरनाईक यांच्या ठाण्यातल्या घर आणि कार्यालयावर छापे
घातले. या छाप्यांमागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
****
बीड
जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातल्या पाटसारा इथं बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा
मृत्यू झाला. नागनाथ गर्जे असं या शेतकऱ्याचं नाव असून गर्जे काल दुपारी दोन वाजेच्या
सुमारास शेतात पिकांना पाणी देत असतांना बिबट्यानं त्यांच्यावर हल्ला केला, या हल्ल्यात
गंभीर जखमी झालेले गर्जे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या परिसरात वनविभागानं सापळा
लावला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गायिका
वैशाली भैसने-माडे हिनं नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं
आवाहन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment