Wednesday, 25 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

देशाचा कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ७२ शतांश टक्के झाला आहे. देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ३७६ नवे कोविड बाधित आढळल्यानं, देशभरातली कोविडग्रस्तांची एकूण संख्या ९२ लाख २२ हजार २१७ झाली आहे. यापैकी ८६ लाख ४२ हजार ७७१ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत देशात या संसर्गाने ४८१ नागरिकांचा मृत्यू झाला, यामुळे देशात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या १ लाख ३४ हजार ६९९ झाली आहे. मृत्यूचं हे प्रमाण एक पूर्णांक ४६ शतांश टक्के एवढं झालं आहे. सध्या देशात ४ लाख ४४ हजार ७४६ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

****

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल राजकीय तसंच सामाजिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली, ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनानं कॉंग्रेस पक्षानं ‘चाणक्य’ गमावला आहे, राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीचं मार्गदर्शक नेतृत्व हरपल्याची भावना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटेल यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटन कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं, या शब्दांत चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अहमद पटेल यांच्या निधनानं काँग्रेस पक्षाची तसंच वैयक्तिक आपली कधीही न भरून येणारी हानी झाली आहे, या शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पटेल यांना शोकभावना व्यक्त केली, तर अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशात पटेल यांच्या निधनामुळे धर्मनिरपेक्ष विचारांसाठी संघर्ष करणारा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला, या शब्दांत पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पटेल यांचं आज पहाटे हरयाणातल्या गुरुग्राम इथं कोविड संसर्गाने निधन झालं, ते ७१ वर्षांचे होते.

****

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या छत्तीसाव्या पुण्यतिथी निमित्त आज राज्यात विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा जिल्ह्यात कराड इथं चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं.

धुळे तसंच सोलापूर इथंही काँग्रेस भवनात चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

कार्तिकी एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या मंदिरात उद्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. तर वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दांपत्य पवार यांच्यासह महापूजेत सहभागी होणार आहे. आज सहा वीणेकरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकून ही निवड करण्यात आली. मूळचे वर्ध्याचे असलेले भोयर गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूर इथं विठ्ठल मंदिरात वीणा पहारा देत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात गेल्या पाच दिवसांत ८०० हून अधिक पक्षी प्रेमींनी भेट दिली आहे. या पक्ष्यांसह विविध वनस्पती, प्राणी, अनेक प्रकारचे मासे, फुलपाखरं पाहण्यासाठी हे पर्यटक या अभयारण्यात येत असतात. कोविड प्रादुर्भावामुळे आरोग्य नियमांचं पालन करणं सर्व पर्यटकांना बंधनकारक करण्यात आलं आहे.

****

निवार चक्रीवादळ आज संध्याकाळी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यावरुन ताशी १२० ते १३० किलोमीटर वेगानं जाण्याचा अंदाज आहे. पुद्दुचेरीत राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या ३० तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याचं दलाचे महासंचालक एस एन प्रधान यांनी सांगितलं आहे.

****

No comments: