Tuesday, 24 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

कोविड संसर्गातून रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर ९३ पूर्णांक ७६ शतांश टक्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत देशात सुमारे ३८ हजार नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. यामुळे देशात कोविडग्रस्तांची एकूण संख्या ९१ लाख, ७७ हजार, ८४१ झाली आहे. काल ४२ हजारावर कोविड बाधितांनी कोविड संसर्गावर मात केल्यानं, त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली, त्यामुळे देशभरातल्या कोविड संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ लाख ४ हजार, ९५५ झाली आहे. सध्या चार लाख ३८ हजार ६६७ रूग्ण देशातल्या विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत, तर १ लाख ३४ हजार २१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासात ११ लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण कोविड चाचण्यांची संख्या १३ कोटी ३७ लाख एवढी झाली आहे.

****

महाराष्ट्रात कोविड लसीचे वितरण आणि लसीकरण या संदर्भात टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली, या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही माहिती दिली. कोरोना लसीबाबत आपण सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्यानं संपर्कात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं.

****

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या दोन मुलांची घरं आणि कार्यालयांवर आज सकाळपासून अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं शोध मोहिम सुरू केली आहे. सरनाईक यांचं घर आणि कार्यालय मिळून दहा ठिकाणी ही शोधमोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे. मात्र ही शोधमोहीम कशासंदर्भात आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

*****

भारतीय जनता पक्ष यापुढे स्वबळावर निवडणुका लढवेल आणि जिंकेल, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघ निवडणूक दौऱ्यानिमित्त पत्रकार परिषेदत बोलत होते. अनैसर्गिक आघाडी केलेलं सरकार फार काळ चालणार नाही, ज्या दिवशी ही आघाडी तुटेल त्या दिवशी आपण पर्यायी सरकार देऊ, तो पर्यंत सक्षम विरोधी पक्षाचं काम करत राहू, असं फडणवीस म्हणाले. वीज देयकात सवलतीचं आश्वासन न पाळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. आपल्या कार्यकाळात तीन वर्ष दुष्काळ असल्यामुळे, आपण शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची सक्ती केली नाही आणि कोणाच्या वीज जोडण्या तोडल्याही नाही, त्यामुळे आपल्या कार्यकाळात वीज देयकांच्या थकबाकीत काही प्रमाणात वाढ झाल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

****

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन हजार ७१२ कोविड बाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातले ९४ हजार ४७६ कोरोना बाधीत रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोविड बाधितांची एकूण संख्या ९८ हजार ९६४ झाली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ५०० झाली आहे. यापैकी ४० हजार ६०० रुग्ण आतापर्यंत कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार १३६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, तर सध्या ७६७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता १२ हजार १५ झाली असून, जिल्ह्यातले अकरा हजार २३८ रुग्ण आतापर्यंत या आजारातून बरे झाले आहेत. तर ३०७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

परभणी जिल्ह्यात कोविडबाधितांची संख्या सात हजाराच्या घरात पोहोचली आहे. यापैकी सहा हजार ६०० हून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर २८७ रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात कोविड बाधितांची संख्या ३ हजार २७० झाली असून, यापैकी ३ हजार १९५ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. सध्या २४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

****

सोलापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दर आंदोलन सुरू आहे. ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातल्या मरवडे इथं लवंगी इथल्या भैरवनाथ साखर कारखान्याकडे जाणारा ट्रॕक्टर काल पेटवून देण्यात आल्यामुळं वाहतुकीचा खोळंबा झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या नाथसागर धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आता सध्या तीनशे घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात येत असून संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा वेग ७०० घनफूट प्रतिसेकंदांपर्यंत वाढवला जाणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय न करण्याचं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. या पाण्याचा लाभ औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होणार आहे.

****

No comments: