Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2020
Time 07.10 to 07.25
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०
****
·
पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
·
बँक कर्मचारी, शेतकरी तसंच कर्मचारी संघटनांच्या देशव्यापी संपाला
संमिश्र प्रतिसाद.
·
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक
विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद.
·
महात्मा फुले समता परिषदेचा ‘समता पुरस्कार’ पद्मश्री डॉ. तात्याराव
लहाने यांना जाहीर.
·
राज्यात काल नव्या सहा हजार ४०६ कोविडग्रस्तांची नोंद; मराठवाड्यात
नवे साडे चारशे रुग्ण.
·
मराठवाड्यात काल दोन अपघातात सहा जणांचा मृत्यू.
आणि
·
लातूर इथल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारी महिन्यापासून
प्रत्यक्ष उत्पादन.
****
पोलिस
विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी म्हटलं आहे. राज्य पोलीस महासंचालनालयात काल झालेल्या हुतात्मा दालनाचं उद्घाटन
तसंच कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्र्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. २६/११
च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना अभिवादन करताना, मुख्यमंत्र्यांनी,
पोलिसांची कामं जनतेपर्यंत पोहोचणं आवश्यक असल्यानं, अशा हुतात्मा दालनाची संकल्पना
मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसंच महाराष्ट्रात सर्वत्र राबवण्यात यावी, अशी सूचना केली.
गृहमंत्री
अनिल देशमुख, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसह
संपूर्ण राज्य शासन पोलीस विभागासाठी सदैव सकारात्मक असून, विभागाच्या इतर मागण्यांचाही
लवकरात लवकर विचार होईल, असं गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितलं.
१९६४
ते २०१९ या कालावधीत विविध घटनांमध्ये हुतात्मा झालेल्या, ७९७ हुतात्म्यांची एकत्रित
माहिती, या दालनात प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी
खुलं करण्याचं नियोजन असून, भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी खुलं केलं जाणार आहे.
****
बँक
खासगीकरणाच्या विरोधात देशभरातल्या चार लाखांवर बँक कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसाचा संप
केला. सरकारच्या या चुकीच्या धोरणांना संपाच्या माध्यमातून संघटना विरोध करत असल्याचं,
कर्मचारी संघटनेचे महासचिव देविदास तुळजापूरकर यांनी सांगितलं. खासगी आणि सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांचं विदेशी बँकांमध्ये विलीनीकरण झालं, तर भारतीय बँकिंग विदेशी
भांडवलदारांच्या हातात जाईल, जे देशाच्या हिताचं नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. कालच्या
या संपात राज्यभरातल्या दहा हजारावर शाखांमधले, जवळपास तीस हजार कर्मचारी संपावर होते,
अशी माहिती तुळजापूरकर यांनी दिली.
बँक
कर्मचाऱ्यांसह शेतकरी आणि कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाला काल संमिश्र प्रतिसाद
मिळाला. देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी काल देशव्यापी संप पुकारला होता.
शेतकरी विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द कराव्यात, या आणि
इतर मागण्यांसाठी, हे आंदोलन करण्यात आल्याचं, संघटनांकडून सांगण्यात आलं.
औरंगाबाद
इथं चौकाचौकांत मानवी साखळी करून कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधलं. विविध
कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.
लातूर इथं कामगार संघटनांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत निदर्शनं केली.
****
कोविड
प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण संचालनालयानं आंतरराष्ट्रीय व्यावसायिक
विमानसेवेवर असलेली बंदी, ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. यादरम्यान वंदे भारत मिशन अंतर्गत
विमानसेवा मात्र सुरूच राहणार आहे. त्यामुळे विदेशात अडकलेले भारतीय या सेवेचा लाभ
घेऊन देशात परत येऊ शकणार आहेत. या सेवेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंत २० लाखांपेक्षा
जास्त भारतीय नागरिक विदेशातून परतले आहेत, तर या मोहिमेच्या सातव्या टप्प्यात, नोव्हेंबरअखेर
आणखी २४ देशांतून एक लाख ९५ हजार नागरिक भारतात परतणार आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या पुण्यात ‘सिरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’ला भेट देणार आहेत. या भेटीत
ते ‘कोविशिल्ड’ लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
दरम्यान,
पंतप्रधान परवा रविवारी २९ नोव्हेंबरला, आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१ वा भाग आहे. आकाशवाणी
आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली
आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित
सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी केलं आहे.
****
जम्मू
काश्मीरमध्ये श्रीनगर इथं सैन्यदलाच्या शीघ्र कृती दलावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात,
दोन सैनिक काल हुतात्मा झाले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव इथले सैनिक यश
देशमुख यांचा समावेश आहे.
****
संविधान
दिन काल सर्वत्र पाळण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात संविधानाच्या
उद्देशिकेचं वाचन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनीही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करत, संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय
संविधानाचा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं संविधान म्हणून आदरानं उल्लेख
केला जातो, संविधानाचे शिल्पकार म्हणून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती
सदैव कृतज्ञ राहावं लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रिपब्लिकन
पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतल्या
वांद्रे इथल्या निवासस्थानी, ७१ संविधान ग्रंथांचं वाटप करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांनी देशाला दिलेलं संविधान जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान असून, संविधानाचा आपल्याला
अभिमान असल्याचं आठवले म्हणाले. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा संविधानातला भारत साकार
केला, तर भारत जागतिक महासत्ता होईल, असं आठवले यांनी नमूद केलं.
औरंगाबाद
इथं भडकल दरवाजा परिसरातल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध
पक्ष संघटनांच्या वतीनं पुष्पांजली अर्पण करून, संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात
आलं.
जालना
जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचं
वाचन करून तसंच बाबासाहेबांना अभिवादन करून संविधान दिन साजरा केला.
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात संविधान दिन साजरा
करण्यात आला.
****
अखिल
भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा ‘समता पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री
डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह,
असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीला
पुण्यात फुले वाडा इथं, हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
****
राज्यात
काल आणखी सहा हजार ४०६ कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१८ लाख २ हजार ३६५ झाली आहे. काल ६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ८१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार हजार
८१५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ६८ हजार
५३८ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या राज्यात ८५ हजार ९६३ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत.
****
मराठवाड्यात
काल दहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४५० रुग्णांची नोंद झाली.
बीड जिल्ह्यात पाच कोविडग्रस्तांचा, औरंगाबाद जिल्ह्यात चार तर हिंगोली जिल्ह्यात काल
एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
जिल्ह्यात काल १५७ नवे रुग्ण आढळले, लातूर जिल्ह्यात ९१, बीड ७४, जालना ३६, नांदेड
३५, उस्मानाबाद २९, हिंगोली २२ तर परभणी जिल्ह्यात काल नव्या सहा रुग्णांची नोंद झाली.
****
औरंगाबाद
महानगरपालिका क्षेत्रात कोविड संसर्ग रोखण्यासाठी प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांनी
राबवलेल्या अष्टसुत्रीची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाली आहे, कोविड प्रतिबंधाबाबत
काल राष्ट्रीय स्तरावर वेबिनार घेण्यात आलं, त्यावेळी पाण्डेय यांनी या अष्टसुत्रीबाबत
माहिती दिली. सिटी बसचा वापर, मोबाईल स्वॅब कलेक्शन, संकलित माहितीच्या विश्लेषणासाठी
वॉर रुम, मोबाईल फिव्हर क्लिनिक यासारखे उपक्रम पांडेय यांनी राबवले.
दरम्यान,
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर काल ८६ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तर औरंगाबाद
विमानतळावर ३२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली.
****
धुळे
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यात काल कार आणि टँकरच्या अपघातात चार जणांचा
मृत्यू झाला. लातूरहून औरंगाबादकडे जाणारी ही कार, टायर फुटल्यानं दुभाजक ओलांडून विरूद्ध
दिशेनं येणाऱ्या टँकरवर धडकली. गेवराई नजीक वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात कारमधून
प्रवास करणारे दोन जण जागीच ठार झाले, तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
झाला. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह वंचित
बहुजन आघाडीच्या तीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या दाती शिवारात काल लोखंडी खांब वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात होऊन ट्रक
चालक आणि सहाय्यक अशा दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. नांदेड - हिंगोली मार्गावर चालकाचा
ताबा सुटल्यानं ट्रक रस्त्यालगतच्या नाल्यामध्ये कोसळल्यानं हा अपघात झाला. अपघातग्रस्त
ट्रक हैदराबादहून इंदूरकडे जात होता. दोघंही मयत इंदूर इथले रहिवासी आहेत.
****
लातूर
जिल्ह्यातल्या मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचं काम जवळपास पूर्ण झालं असून, येत्या
फेब्रुवारी महिन्यात या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. खासदार सुधाकर
श्रृंगारे यांनी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांच्यासह आढावा बैठक
घेवून, प्रकल्पाची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात मराठवाड्यातल्या
तरुणांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रकल्प कार्यान्वित होत असताना
टप्प्याटप्प्यानं या जागा भरल्या जाणार असून, त्यामुळे मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार
मिळून बेरोजगारीची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागेल, असं खासदार श्रृंगारे यांनी
सांगितलं.
****
गेल्या
काही वर्षात ऊसासाठी पाण्याचा बेसुमार वापर आणि पर्यावरणाचा -हास झाल्यामुळे आगामी
काळात महाराष्ट्रात पाणीबाणी अटळ आहे, असं जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी म्हटलं
आहे. वातावरणातील बदल आणि जल व्यवस्थापन या विषयावर काल औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्रातर्फे वेबिनार घेण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात
मुलबक पाणी असताना, त्याचं नियोजन होत नसल्याचं ते म्हणाले.
****
वाढीव
वीज देयक माफी तसंच महिला बचत गटांची कर्ज माफी या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेच्यावतीनं काल ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद इथं मनसे जिल्हाध्यक्ष
सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात
असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीड, जालना, उस्मानाबाद इथंही मनसे कार्यकर्त्यांनी
आंदोलन केल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
परभणी
महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधाच्या त्रिसुत्रीचं
पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र नर्सी इथं संत नामदेव महाराज यांचा साडे सातशेवा जन्मोत्सव
सोहळा काल भक्तिमय वातावरणात साजरा झाला. काल सकाळी सहा वाजता नर्सीसह पंचक्रोशीतल्या
मंदिर परिसरामध्ये हजारो पणत्या पेटवून दीपोत्सव करण्यात आला.
****
औरंगाबाद
विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या
सूचना, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकारी,
कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. काल औरंगाबाद इथं मतमोजणी प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन
करताना ते बोलत होते. या निवडणुकीसाठी येत्या एक डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला
मतमोजणी होणार आहे.
****
लातूर
शहरात प्लास्टिक बंदीसाठी महानगरपालिकेनं तीन पथकांची नियुक्ती केली आहे. स्वच्छतेविषयी
नागरिकांकडून तक्रारी आल्यास त्यांचं तत्काळ निवारण करण्याच्या सूचनाही, स्वच्छता निरीक्षकांना
देण्यात आल्या आहेत. प्लास्टिकबंदी राबवण्यासाठी दररोज शहरातल्या आस्थापनांना भेटी
दिल्या जाणार असून, बंदी असलेलं प्लास्टीक आढळल्यास, संबंधितांना दंड ठोठावला जाणार
आहे.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज सिडनी इथं खेळला जाणार आहे.
भारतीय वेळेनुसार सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल. तीन एकदिवसीय
सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना २९ नोव्हेंबरला तर तिसरा सामना दोन डिसेंबरला होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment