Saturday, 28 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.11.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या तीन संस्थांमध्ये कोविड-19 च्या लस निर्मितीचा आढावा घेत आहेत. आज सकाळी पंतप्रधानांनी अहमदाबाद इथल्या जायड्स बायोटेक पार्क या संस्थेत ‘जायकोवी - डी’ लस निर्मितीचा आढावा घेतला आणि संशोधकांशी संवाद साधला. यानंतर ते हैदराबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेलाही भेट देणार आहेत. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी लसनिर्मितीतली प्रगती, आव्हानं आणि इतर बाबीसंदर्भात पंतप्रधान संवाद साधणार आहेत. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशील्ड ही लस विकसित होत आहे.

भारतात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे आणि या क्षेत्रातील शास्त्रज्ञांबरोबर होणाऱ्या चर्चेमुळे आगामी लसीकरण, त्यातील संभाव्य आव्हानं, आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं आपल्या ट्वीटर संदेशात म्हंटल आहे.

****

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी, बहुजन समाजाबद्दलचे त्यांचे धोरणंच राज्याला आणि देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल, अशा शब्दात पवार यांनी महात्मा फुले यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

औरंगाबाद इथल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं आज मुंबई ठाकरे सरकारची काळी पत्रिका या पुस्तिकेचं प्रकाशन केलं, त्यावेळी फडणवीस बोलत होते. सर्वोच्च न्यायालयात वकील हजर राहत नाहीत, विद्यार्थ्यांचं अतोनात हाल झाले, आम्ही हा कायदा करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सुनिश्चित केलं होतं, असं त्यांनी नमूद केलं. धान उत्पादक शेतकर्यांप्रमाणेच कापूस, सोयाबिन उत्पादक शेतकर्यांनाही बोनस जाहीर करायला पाहिजे, असं ते म्हणाले. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं फडणवीस म्हणाले. 

****

देशात काल ४१ हजार ३२२ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून, ४८५ नागरिकांचा मृत्य झाला आहे. देशातली एकूण रुग्णसंख्या ९३ लाखाच्या वर गेली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३६ हजार २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४१ हजार ४५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८७ लाख ५९ हजार ९६९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या चार लाख ५४ हजार ९४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

****

नवी मुंबईतल्या कोविड चाचणी घोटाळ्याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी आणि कोविड चाचणी समन्वय डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित केलं आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

****

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगांव तालुक्यातल्या पिंपळगाव इथले हुतात्मा सैनिक यश दिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं पार्थिव आज सकाळी पिंपळगाव इथं आणण्यात आलं. 

****

जालना औद्योगिक वसाहतीमधल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मशीन २८ लाखाच्या रोकडसह चोरट्यांनी पळवलं. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीनलाच दोर बांधून गाडीच्या मदतीने मशीन रोडवर ओढले. अवघ्या पंधरा मिनिटात हा सर्व प्रकार घडला.   सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या.

****

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं रमजानपूरा भागातल्या संजरी चौक इथं पहाटे सव्वा तीनच्या सुमारास आग लागल्यानं सात घरं पूर्णतः जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच पाच बंबाच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

दरम्यान, आज सकाळी नाशिक शहरातल्या पांडवलेणी इथं सुद्धा वन क्षेत्रात आग लागली असून, वन खात्याच्या वतीने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

****

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात दोन गावांतून पोलिसांनी शेतात पिकाआड लावलेली गांजाची ७६८ किलो झाडं जप्त केली. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे.

****

No comments: