Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 November 2020
Time 07.10 to 07.25
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०
****
·
वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून
नव्या मार्गदर्शक सूचना जारी.
·
चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया, एसईबीसी आरक्षणाविना
पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
·
एसईबीसी विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेशाचा निर्णय
धक्कादायक - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील.
·
देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांचा आज देशव्यापी संप;
सरकारकडून शिस्तभंग कारवाईचा इशारा.
·
कोविड प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांना बळ मिळू दे -कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापुजेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचं पांडुरंगाला साकडं.
आणि
·
राज्यात काल नव्या सहा हजार १५९ कोविडग्रस्तांची नोंद; मराठवाड्यात
४०८ नवे रुग्ण; हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण नाही.
****
वाढत्या
कोविड रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं नव्या मार्गदर्शक सूचना
जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड संसर्ग
रोखण्यासाठी उपाय करण्याचे, तसंच दैनंदिन व्यवहारांवर मर्यादा आणून गर्दी नियंत्रित
करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि सुरक्षित
अंतर राखण्याच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, असंही गृहमंत्रालयानं सांगितलं आहे.
केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश प्रतिबंधित क्षेत्राबाहेर
टाळेबंदी लागू करु शकत नाही, असं या आदेशात म्हटलं आहे.
प्रतिबंधित
क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून नियमांचं
पालन व्यवस्थित होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. तातडीची वैद्यकीय सेवा वगळता, अन्य कामासाठी
कोणालाही प्रतिबंधित क्षेत्राच्या आत अथवा बाहेर जायला प्रवेश मिळणार नाही. बाधित रुग्णाच्या
संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती या पहिल्या ७२ तासात शोधून काढाव्यात,
असं या आदेशात म्हटलं आहे. या मार्गदर्शक सूचना एक डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी
लागू असतील.
****
लक्ष्मी
विलास बँकेचं डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये विलिनीकरण करण्याच्या योजनेला केंद्रीय
मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल
ही बैठक झाली. यामुळे ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर बंधनं राहणार
नाही.
ब्रिक्स
देशांसोबत झालेल्या क्रीडा संस्कृती आणि क्रीडा विषयक सहकार्याबाबतच्या सामंजस्य करारालाही
कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
२०२०-२१
या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया, सामाजिक आणि शैक्षणिक मागास - एसईबीसी प्रवर्गासाठीच्या
आरक्षणाविना पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय
काल राज्य सरकारनं जारी केला. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या अंतरिम
स्थगितीनंतर ही प्रक्रिया ठप्प झाली होती, मात्र त्यापूर्वी आरक्षणासह झालेले प्रवेश
कायम राहणार मात्र नऊ सप्टेंबर २०२० पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केला
असेल, मात्र अद्याप प्रवेश दिला गेला नसेल, तर अशा एसईबीसी विद्यार्थ्यांना, खुल्या
प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठा
आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासंदर्भातल्या अर्जावरच्या अंतिम निकालापर्यंत हा
निर्णय लागू राहणार आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रवेश प्रक्रिया
सुरू करणं आवश्यक असल्याचं, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण
यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध
आहेत, त्यामुळे एसईबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुला प्रवर्गातून प्रवेश घेता
येणार असल्याचा दिलासाही त्यांनी दिला.
****
दरम्यान,
एसईबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय
धक्कादायक असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर
इथं वार्ताहरांशी बोलत होते. घटनातज्ज्ञांना सोबत न घेता सरकार निर्णय घेत असून, मराठा
समाजाला न्याय द्यायचा असेल तर सुपर न्यूमेरीकल वापरलं पाहिजे, असं ते म्हणाले. आत्ताचं
सरकार अभ्यास करायलाच तयार नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
****
केंद्रीय
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कोरोना विषाणू संसर्गा विषयी जनजागृती मोहीम सुरु केली
आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात धुणं आणि एकमेकात सुरक्षित
सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन हिंगोली नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी
केलं आहे.
****
कार्तिकी
एकादशीचा सोहळा आज भक्तिभावानं साजरा होत आहे. यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते
आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. वारकरी प्रतिनिधी म्हणून पंढरपूरचे
कवडूजी भोयर आणि कुसुमबाई भोयर हे दाम्पत्य पवार दाम्पत्यासह महापूजेत सहभागी झाले.
कोविडचं
संकट दूर होऊ दे, कोविडवरची लस लवकर मिळू दे आणि कोविडवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असं साकडं पांडुरंगाकडे घातल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी
सांगितलं.
****
राज्यातल्या
अनुसूचित जाती प्रवर्गातून, केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांच्या, एकरकमी अर्थसहाय्य योजनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि
प्रशिक्षण संस्था - बार्टीने, घातलेल्या अटी रद्द करून, गेल्या वर्षीच्या मूळ नियमावलीप्रमाणेच
लाभ देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
यूपीएससी
मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत एकरकमी ५० हजार रुपये
अर्थसहाय्य दिलं जातं. मात्र इतर योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना, एकरकमी अर्थसहाय्य
योजनेचा लाभ घेता येणार नसल्याची अट बार्टीनं घातली होती, या अटीसह अन्य जाचक अटी तातडीनं
रद्द करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत.
****
कौशल्य
विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी
कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या विभागाच्या
सादरीकरणावेळी ते काल बोलत होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अत्याधुनिक
प्रशिक्षण केंद्रं सुरू करावीत, कौशल्य विद्यापीठ निर्माण करण्याबाबत विचार करण्यात
यावा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातल्या
धर्मादाय रूग्णालयांमध्ये दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावेत, असे निर्देश
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत
होते. कोविड १९ महामारीच्या कार्यकाळात ग्रामीण भागातले रुग्ण शहरात उपचारासाठी आले
नाहीत, मात्र, आता रुग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो, यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी
सहकार्य करण्याची सूचना विधी आणि न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी या
बैठकीत दिल्या.
****
शेतकरी
विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी
देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला
२५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माथाडी कामगार, बिडी कामगार
तसंच पतसंस्था कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही या संपाला पाठिंबा दिला असल्याचं पक्षाच्या
औरंगाबाद जिल्हा कमिटीचे सचिव विधीज्ञ भगवान भोजने यांनी सांगितलं. आयटक संलग्नित लाल
बावटा रिक्षा युनियननेही या संपात सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे. राज्य सरकारी
मध्यवर्ती कर्मचारी संघटनेनंही आज लाक्षणिक संप पुकारला असून, राजपत्रित अधिकारी संघटनेनं
या संपाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान,
संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात
येईल, असं शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल आणखी सहा हजार १५९ कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
१७ लाख ९५ हजार ९५९ झाली आहे. काल ६५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात
या विषाणू संसर्गानं आतापर्यंत ४६ हजार ७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल चार
हजार ८४४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ६३
हजार ७२३ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ८४ हजार ४६४ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल ६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ४०८ रुग्णांची नोंद झाली.
जालना
तसंच नांदेड जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात
प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले
नवे १११ रुग्ण आढळले, जालना जिल्ह्यात ६९, लातूर ६६, नांदेड ५८, बीड ५७, उस्मानाबाद
२८ तर परभणी जिल्ह्यात काल नवे १९ कोविडग्रस्त आढळले. हिंगोली जिल्ह्यात काल एकही नवा
रुग्ण आढळून आला नाही.
****
औरंगाबादच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागातल्या ‘विषाणू संशोधन आणि
निदान’ या नवीन प्रयोगशाळेचं उद्धाटन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते काल
झालं. या प्रयोगशाळेला भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद आय.सी.एम.आर कडून सप्टेंबर
२०१९ मध्ये मंजुरी मिळाली आहे. केंद्र शासन पुरस्कृत या प्रयोगशाळेत आजपर्यंत एक लाख
२६ हजार ६१० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. या प्रयोगशाळेची दोन हजार कोरोना
विषाणू चाचण्या प्रति दिवस करण्याची क्षमता असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर
यांनी दिली.
****
निराधारांसाठीच्या
विविध योजनेतल्या वृद्ध आणि निराधार लाभार्थ्यांना घरपोहोच अर्थसहाय्य द्यावं, अशी
मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे
यांच्याकडे केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये मिळून एक
दत्तक बॅंक आहे. त्यामुळे या बॅंकेतून रक्कम काढण्यासाठी वृद्ध आणि निराधारांना दरमहा
प्रवास करावा लागतो आणि रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं, असं आमदार पवार यांनी म्हटलं
आहे. मुंडे यांनी या मागणीची दखल घेतली असून, यासंदर्भात लवकरच बैठक आयोजित करण्याचे
निर्देश दिले आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार फड यांनी नागरिकांना कोविडपासून
बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
****
हिंगोली
नगरपरिषदेनं मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर काल कारवाई केली, यावेळी चाळीस नागरिकांकडून
आठ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
****
येत्या
एक डिसेंबरला होणाऱ्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी काल औरंगाबाद
शहरातल्या ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ६७ मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्यात
आलं. मतदारांनी या सुविधेबाबत समाधान व्यक्त केलं आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी विभागातल्या
आठ जिल्ह्यात एकूण ८१३ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी तीन लाख
७४ हजार ४५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
परभणी
जिल्ह्यात पूर्णा पोलिस ठाण्यातले सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे आणि कर्मचारी
समीर पठाण यांनी केलेल्या समुपदेशनामुळे, मानसिक ताणतणावतून आत्महत्या करण्यास निघालेल्या
३० वर्षीय युवकाचे प्राण वाचले. आर्थिक विवंचनेतून हा युवक आत्महत्या करणार होता, त्याला
एका व्यक्तीनं पोलिस ठाण्यात आणलं असता, पोलिस निरीक्षकांनी त्याचं समुपदेशन करत त्याला
आत्महत्येपासून परावृत्त केलं.
****
महाराष्ट्र
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शिखर परिषदेचे महाराष्ट्र् अध्यक्ष निखील लातूरकर यांना
पुण्याच्या जयशंकर प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार नुकताच प्रदान
करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथं झालेल्या या कार्यक्रमात शास्त्रज्ञ डॉ.
विनोद पोतदार यांच्या हस्ते लातूरकर यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
हिंगोली
जिल्हा सामान्य रुग्णालयातला लिपिक विनायक देशपांडे याला ११ हजार रुपयांची लाच घेताना
काल अटक करण्यात आली. वैद्यकीय देयकाची प्रक्रिया करून, जिल्हा कोषागार कार्यालयातून
देयक काढून देण्याच्या मागणीसाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
मराठवाड्यात
तापमानात पुन्हा घट होत आहे. परभणी इथं काल नऊ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद
झाली.
दरम्यान,
येत्या दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक
ठिकाणी पाऊस पडेल, तर कोकणात हवामान कोरडं राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी २९ नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७१ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
No comments:
Post a Comment