Sunday, 29 November 2020

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 November 2020

Time 13.00 to 13.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० दुपारी १.००

****

जिंठ्याच्या लेण्यांचा वारसा डिजिटल करून या प्रकल्पाचं जतन करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधताना सांगितलं. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१वा भाग होता. या  प्रयोगामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पहायला मिळेल. यामध्ये `डिजिटलाइज्ड` आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, त्यांचे उद्गार यांचाही समावेश असेल, असं त्यांनी म्हटलं. आपला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशाच्या संस्कृती आणि शास्त्राचा शोध घेण्यासाठी अनेक लोक विदेशांतून येऊन इथंच कायम राहिले आहेत. अनेक लोक शोधकार्य करून मायदेशी परत जातात आणि या संस्कृतीचे चांगले संवाहक बनतात असं ते म्हणाले. या तसंच अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा त्यांनी यावेळी गौरवानं उल्लेख केला. आपला अमूल्य वारसा असलेल्या गोष्टी आंतरराष्ट्रीय टोळ्यांचा शिकार होत आल्या असून अशा टोळ्या पुन्हा सक्रिय होऊ नयेत, यासाठी देशानं प्रयत्न वाढवले असल्याचं त्यांनी सांगितलं. धुळे जिल्ह्यातले शेतकरी, जितेंद्र भोई यांना, नव्या कृषी कायदयाचा वापर केल्यामुळे त्यांच्या मका उत्पादनाचे पैसे मिळण्यासाठी मोठी मदत झाल्याचं उदाहरण त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र सरकारनं गेल्या सप्टेंबर महिन्यात जे कृषी कायदे बनवले त्यामुळे शेतमाल खरेदी केल्यानंतर तीनच दिवसांत शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत आणि जर पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी त्याविरोधात तक्रार दाखल करु शकतो. संबंधित भागातल्या उप विभागीय अधिकाऱ्यांना एका महिन्याचा आत शेतकऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीचं निवारण या कायद्यानुसार करावं लागणार असल्याचं त्यांनी नमुद केलं.  देश टाळेबंदीच्या काळातून बाहेर पडत आहे, आता लसीची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाबाबत कोणताही निष्काळजीपणा करणं आजही अत्यंत घातक आहे. आपल्याला, या संसर्गाविरुद्धचा आपला लढा पुढंही तेवढ्याच ताकदीनं सुरु ठेवायचा असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान, महामारीनं आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल घडून आला आहे. निसर्गाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आता बदल झाला असल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासोबतच, देशाविषयीचे आपले संकल्प, संविधानानं एक नागरिक म्हणून आपली कर्तव्यं पूर्ण करण्याची जी शिकवण आपल्याला दिली आहे, तिचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

****

देशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ४१ हजार ८१० रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ९३ लाख ९२ हजार ९२० झाली आहे. या काळात या संसर्गामुळे ४९६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३६ हजार ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४२ हजार २९८ असून आतापर्यंत ८८ लाख २ हजार २६७ रुग्ण यातून मुक्त झाले आहेत. सध्या ४ लाख ५३ हजार ९५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर या संसर्गातून बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ६८ शतांश टक्के झालं आहे.

****

मुंबईत नव्या १ हजार ६३ रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या २ लाख ८१ हजार ८७४ झाली आहे. गेल्या २४ तासांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १० हजार ७७३ झाली आहे. आतापर्यंत २ लाख ५५ हजारावर रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून सध्या १२ हजार ७५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद शहरात नाल्यात कचरा टाकण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला आहे. आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं महापालिका प्रशासक तसंच आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी या संदर्भातल्या एका बैठकीत सांगितलं.

****

नाशिकचे रहिवासी असलेले, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असिस्टंट कमांडर नितीन भालेराव नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. छत्तीसगड मधील सुखमा इथं नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते, उपचारांदरम्यान त्यांना विरमरण आलं. असिस्टंट कमांडर नितीन भालेराव यांचं पार्थिव रायपूरहून विमानानं मुंबईला आणि तेथून नाशिक इथं आणलं जाणार असून  नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं येत्या मंगळवारपासून वरंगल काझीपेठमार्गे नरसापूर नगरसोल ही विशेष रेल्वे गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

//***********//

 

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...