Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 November 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ नोव्हेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** कोविड 19 च्या लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या पुण्यातल्या
सीरम इन्स्टिट्यूटसह देशातल्या तीन प्रयोगशाळांना भेट देणार
** एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ
** गेल्या ९ महिन्यांपासून खंड पडलेला लोकशाही दिन पुन्हा सुरू करण्याचे सरकारचे
निर्देश
** औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू
आणि
** पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा भारतावर ६६ धावांनी विजय
****
कोविड 19 च्या लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या देशातल्या तीन प्रयोगशाळांना भेट देणार आहेत. यामध्ये अहमदाबाद
इथली जायड्स बायोटेक पार्क, हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट
ऑफ इंडिया या संस्थांचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयानं एका ट्विट संदेशातून ही
माहिती दिली. या तीनही संस्थांच्या तज्ज्ञांशी चर्चा करून, पंतप्रधान लसनिर्मितीतली
प्रगती, आव्हानं आणि इतर बाबी जाणून घेणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग
परिवहन महामंडळ - एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली.
एसटी महामंडळाकडून सुमारे २७ घटकांना प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत
सवलत मिळते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाशी निगडीत असलेलं 'स्मार्ट
कार्ड' काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबरला संपणार
होती. मात्र कोविड प्रादुर्भावामुळे सध्या लाभार्थींना स्मार्टकार्ड घेण्यासाठी आगारात
येणं शक्य नसल्यानं, या योजनेला मुदतवाढ दिल्याची माहिती परब यांनी दिली
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं
आवाहन वाशिमचे अपर जिल्हाधिकारी शरद पाटील यांनी केलं आहे.
****
कोविड-१९ मुळे गेल्या ९ महिन्यांपासून खंड पडलेला लोकशाही दिन उपक्रम पुन्हा
सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. नागरिकांच्या
विविध समस्यांची स्थानिक स्तरावरच सोडवणूक करण्याच्या उद्देशानं दर महिन्याच्या पहिल्या
सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जात असे, कोविड प्रादुर्भावामुळे हा उपक्रम बंद पडला
होता. आता हा उपक्रम पुन्हा सुरू करताना, नागरिकांच्या तक्रारी व्हर्च्युअल पद्धतीने
घ्याव्यात, तक्रारींचं जागेवरच निराकरण करावं, संसर्गाचं कारण देऊन उपक्रम टाळू नये,
अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
****
अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर केलेली
कारवाई सूडबुद्धीने केल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आज या प्रकरणी झालेल्या
सुनावणीत न्यायालयानं नुकसानाच्या मूल्यांकनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली
असून, नुकसान भरपाईचा मूल्यांकन अहवाल मार्च २०२१ पर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं
दिले आहेत. तसेच यापुढे कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने ७ दिवसांची नोटीस द्यावी,
असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहे. तसंच कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास
परवानगी न्यायालयानं दिली आहे.
****
कोविड काळात खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे म्हणून
काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पात्रतेनुसार पदोन्नती देण्याचा निर्णय
राज्य सरकारनं घेतला आहे, महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही माहिती
दिली. आज जळगाव इथं ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महिला आणि बाल विकास विभागाची आढावा
बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. महिला आणि बालकांचा योग्य विकास व्हावा, त्यांचं
संरक्षण व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला आणि बाल विकास भवन उभारण्यात येणार
असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. त्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याची सूचना
करत, जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून यासाठी ३ टक्के निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय
घेणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं.
****
धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात दोन गावांतून
पोलिसांनी शेतात पिकाआड लावलेली गांजाची ७६८ किलो झाडं जप्त केली. बाजारभावानुसार या
गांजाची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. वनपट्ट्यांमध्ये गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे
वनपट्टे शासन जमा केले जातील, असा इशारा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातल्या बंधारपाडा गावातूनही पोलिसांनी
एका शेतात लावलेला सुमारे अडीच किलो गांजा
जप्त करत, एका इसमाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीनं आपल्या
घरात गांजाची बेकायदेशीर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवली होती.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या दोंडाईचा इथं एका घरातून
सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत विविध कंपन्याचा
सुमारे नऊशे पाकिटं गुटखा जप्त करण्यात आला. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला, तर औरंगाबाद शासकीय
वैद्यकीय रूग्णालयातल्या आठ जणांना उपचारानंतर बरे झाल्यानं सुटी देण्यात आली. जिल्ह्यात
आतापर्यंत एक हजार १४३ जणांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. तर ४० हजार ९२४
जणांना आतापर्यंत बरे झाल्यानं सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या
४२ हजार ९१४ वर पोहोचली आहे.
****
क्रिकेट
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सिडनी इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात
यजमान ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा ६६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत यजमान
संघानं भारतीय संघासमोर ३७५ धावांचं लक्ष्य ठेवलं, मात्र हार्दिक पंड्याच्या ९० आणि
शिखर धवनच्या ७४ धावांच्या खेळीनंतरही भारतीय संघ निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात
३०८ धावाच करू शकला
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना २९ नोव्हेंबरला तर तिसरा सामना
दोन डिसेंबरला होणार आहे.
****
अंबाजोगाई इथं आयोजित ३६ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती
समारोहाचा जसरंगी जुगलबंदी मैफलीने समारोप झाला. या समारोहात यंदा चंद्रशेखर कुलकर्णी
यांना कृषी क्षेत्रासाठी, सरोजनी देशपांडे यांना संगीतासाठी, लेखिका रेखा बैजल यांना
साहित्यासाठीचा तर योगेश खंदारे यांना युवा गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. इतिहासाचे
अभ्यासक प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांनी समारोहाच्या सांगता सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन
केलं, सर्व क्षेत्रात समतोल साधून राज्य सर्व क्षेत्रात अग्रेसर करणं, हीच यशवंतरावांना
खरी श्रद्धांजली ठरेल असं मत, रोडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं उघडण्याच्या
मागणीसाठी आज औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनसह विविध दहा संघटनांनी ऑनलाईनपद्धतीनं
निषेध नोंदवत सरकारचं लक्ष वेधलं. या संघटनांच्या प्रतिनिधींनी सामाजिक संपर्क माध्यमांवर
दृकश्राव्य फिती अपलोड करुन अजिंठा वेरुळसह जिल्हाभरातली पर्यटन स्थळं उघडण्याबाबत
सरकारनं ताबडतोब निर्णय घ्यावा अशी मागणी केली. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे
अध्यक्ष जसवंत सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या उद्योगांवर अवलंबून
असलेल्या हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं ते म्हणाले. राज्यात कोकणातले
समुद्रकिनारे, मुंबईतल्या घारापुरी लेण्या, तसंच विविध गड किल्ल्यांवर पर्यटन सुरू
असताना औरंगाबाद जिल्ह्यातली पर्यटन स्थळं मात्र बंद आहेत, याकडे जसवंतसिंह यांनी लक्ष
वेधलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगाव इथल्या ग्रामसेवकाच्या संगणक मदतनीसाला १८ हजार
रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. सतीश गिरम असं या आरोपीचं नाव असून, जमिनीचा
उतारा देण्यासाठी त्यानं २१ हजार रुपये लाच मागितली होती, त्यापैकी १८ हजार रुपये घेताना
त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
****
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी विसर्ग करण्यात येत आहे.
त्या विसर्गात आज सकाळी वाढ करण्यात आली, सध्या कालव्यातून १६०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने
पाणी सोडण्यात येत असल्याचं पाटबंधारे विभागाने कळवलं आहे.
****////****
No comments:
Post a Comment