Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 November 2020
Time 07.10 to 07.25
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ नोव्हेंबर २०२० सकाळी ०७.१०
****
** देशातल्या तीन संशोधन संस्थांमध्ये कोविड 19 च्या लस संशोधन
आणि उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधानांकडून आढावा
** कोविडची लस पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता जागतिक
आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांच्याकडून व्यक्त
** थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनी त्यांना सर्वत्र
अभिवादन
** महात्मा फुले समता पुरस्कार ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ
पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना प्रदान
** तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच क्षेत्रात
कुचकामी-भाजपची टीका
** राज्यात काल पाच हजार ९६५ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात
नव्या ४२९ रुग्णांची नोंद
** बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात बिबट्याचा काल एक
महिला आणि तिच्या मुलावर हल्ला
** औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं एकाच कुटुंबातल्या तिघांची
हत्या
आणि
** परभणी इथला शालेय विद्यार्थी अजय डाके याचं पंतप्रधानांकडून
कौतुक
****
कोविड 19 च्या लससंशोधन आणि
उत्पादन प्रक्रियेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन संशोधन संस्थांना
भेट देऊन आढावा घेतला, यामध्ये अहमदाबाद इथली जायडस बायोटेक पार्क, हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि
पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटचा समावेश आहे. काल सकाळी अहमदाबादमध्ये तर दुपारी हैदराबाद इथे विकसित
होणाऱ्या लसीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला, त्यानंतर सायंकाळी ते पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचले. जगातल्या
या सर्वात मोठ्या लसनिर्मिती संस्थेत विकसित होत असलेल्या कोव्हिशील्ड लसीसंदर्भात
पंतप्रधानांनी माहिती जाणून घेतली. सुमारे ५० मिनिटांच्या या चर्चेत सीरम इन्स्टिट्यूटचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांच्यासह संस्थेतले शास्त्रज्ञ, संशोधकांनी
पंतप्रधानांना लसनिर्मितीतल्या टप्प्यांबाबत माहिती दिली.
लस संशोधन आणि उत्पादन
प्रक्रियेत कार्यरत असलेल्या तीनही
संस्थांमधल्या सर्व चमूचं पंतप्रधानांनी कौतुक आणि अभिनंदन केलं
असून, भारत सरकार संपूर्ण पाठिंब्यासह सक्रियपणे या सर्वांसोबत कार्यरत असल्याचं,
पंतप्रधानांनी एका ट्विट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर
पत्रकारांशी बोलताना अदर पुनावाला यांनी, भारतात लस वितरणाला प्राधान्य देणार असल्याचं
सांगितलं. लसीची किंमत सर्वांना परवडणारी असेल, तसंच जुलै महिन्यापर्यंत या लसीचे ४०
कोटी डोस पुरवले जातील, असंही पुनावाला यांनी सांगितलं.
देशात कोरोना प्रतिबंधक लस
निर्मितीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यावर आली असताना पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे
आणि या क्षेत्रातल्या शास्त्रज्ञांबरोबरच्या चर्चेमुळे आगामी लसीकरण, त्यातली संभाव्य
आव्हानं, आणि त्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी मदत होणार असल्याचं, पंतप्रधान कार्यालयानं
आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७१वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे
****
कोरोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध
करण्यासाठीची लस पुढच्या महिन्यातही येऊ शकते, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या
मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केला आहे. लातूर इथल्या स्वामी
रामानंद तीर्थ व्याख्यानमालेअंतर्गत काल कोविड विषयावर सामाजिक संपर्क माध्यमातून त्या
बोलत होत्या. या लसीचं संशोधन आणि चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत, एक ते दोन कंपन्यांची
लस ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल,
आणि मार्च एप्रिल मध्ये ही लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याचं, स्वामिनाथन यांनी
सांगितलं. या व्याख्यान उपक्रमात द व्हॅकसिन्स अलायन्स संस्थेच्या डॉ रंजना कुमार,
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
****
नवी मुंबईतल्या कोविड चाचणी घोटाळ्याप्रकरणी मनपा आरोग्य
अधिकारी आणि कोविड चाचणी समन्वयक डॉ. सचिन नेमाने यांना निलंबित करण्यात आलं आहे. या
घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती, या समितीने
दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
****
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने
कोरोना विषाणू संसर्गाविषयी जनजागृती मोहीम सुरु केली आहे. कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं, वारंवार हात
धुणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यक
देविदास फुलारे यांनी केलं आहे.
****
थोर समाज सुधारक, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा
जोतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त काल सर्वत्र त्यांना
अभिवादन करण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
काल मंत्रालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही महात्मा फुले यांना अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार, शेतकरी- बहुजन
समाजाबद्दलचं धोरणच राज्याला तसंच देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाईल,
असं पवार यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद इथं औरंगपुरा परिसरात
असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या
वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
अखिल भारतीय महात्मा फुले
समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार काल पुण्यात ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ पद्मश्री
डॉ.तात्याराव लहाने यांना समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे अन्न आणि ग्राहक संरक्षण
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, एक लाख रुपये, मानपत्र, आणि स्मृती
चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना भुजबळ यांनी,
महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही, असं
मत व्यक्त केलं. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी
रस्त्यावर येऊन ताकद दाखवण्याची गरज, भुजबळ यांनी व्यक्त केली.
या पुरस्कारला उत्तर देताना
डॉ लहाने यांनी आपण हा पुरस्कार आपल्या आईला आणि उपचार केलेल्या रुग्णांना समर्पित
करत असल्याचं सांगितलं. कोविड प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे रोखू शकतो त्यासाठी मास्क
लावणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं डॉ लहाने यांनी नमूद केलं.
****
राज्यातल्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार सर्वच
क्षेत्रात कुचकामी ठरल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य
सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या उणीवा निदर्शनास आणून देण्यासाठी
भाजपतर्फे राज्यभरात घेतल्या जात असलेल्या पत्रकार परिषदांच्या श्रुंखलेत ते काल नागपूर
इथं बोलत होते. शिवसेनेनं निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं, घरगुती वीज देयकात ३०टक्के
सवलतीचं आश्वासन, पाळलं नाही, उलट कोविडच्या संकटात विजेचे दर वाढवल्याची टीका मुनगंटीवार
यांनी केली.
****
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून घोळ होत असल्याचा
आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकारच्या
वर्षभराच्या कमागिरीवर भारतीय जनता पक्षानं काल मुंबईत 'ठाकरे सरकारची काळी पत्रिका'
या पुस्तिकेचं प्रकाशन केलं, त्यावेळी फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षण कायदा करताना
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे आपल्या सरकारनं सुनिश्चित केलं होतं, असंही
फडणवीस म्हणाले. हे सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलं असून, महाविकास आघाडीमधल्या तिन्ही
पक्षांमध्ये समन्वय नसल्याची टीका फडणवीस यांनी केली.
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर
इथं दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले मराठा बटालियनचे सैनिक यश देशमुख यांच्या पार्थिव
देहावर काल जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात आले. सैन्य दल तसंच पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या चार फैरी झाडून देशमुख
यांना मानवंदना देण्यात आली
****
पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार
भारत भालके यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी पंढरपूर तालुक्यात सरकोली या त्यांच्या
मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी काल सकाळी पंढरपुरात
शिवतीर्थावर भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. भालके यांच्या निधनाबद्दल
विविध पक्षांचे नेते तसंच समाजाच्या सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं
आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
ज्येष्ठ स्वयंसेवक सुरेंद्र भास्कर थत्ते यांचं नाशिक इथं शुक्रवारी मध्यरात्रीनंतर
निधन झालं, ते ८० वर्षांचे होते. आणिबाणी विरोधात लढा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण
अडवाणी यांची ऐतिहासिक रामरथ यात्रा तसंच एनरॉन विरोधी लढ्यात थत्ते यांचं मोठं योगदान
होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल नाशिक इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
राज्यात काल आणखी पाच हजार ९६५ कोविड बाधित रुग्ण आढळले,
त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख १४ हजार ८१५ झाली आहे. काल तीन हजार ९३७
रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १६ लाख
७६ हजार ५६४ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातूनमुक्त झाले असून, सध्या राज्यात ८९ हजार
९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा कोविड संसर्गमुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४ दशांश
टक्के झाला आहे.
****
मराठवाड्यात काल सहा कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या ४२९ रुग्णांची नोंद झाली. बीड जिल्ह्यात काल ३ कोविडग्रस्तांचा, उस्मानाबाद
जिल्ह्यात दोन तर नांदेड जिल्ह्यात काल एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल नवे १२० रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात
६४, नांदेड ६१, बीड ६० जालना ३६, उस्मानाबाद ३२, हिंगोली ३१, तर परभणी जिल्ह्यात काल
२५ नवे रुग्ण आढळले.
****
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात
बिबट्याने काल एक महिला आणि तिच्या मुलावर हल्ला केला. शिलावती दिंडे आणि अभिषेक दिंडे
अशी त्यांची नावं असून, बिबट्याच्या हल्ल्यात हे दोघं गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर
आष्टीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आष्टी तालुक्यात या आठवड्यात बिबट्याच्या
हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं
एकाच कुटुंबातल्या तीन जणांची हत्या झाल्याची घटना काल पहाटे निदर्शनास आली. पती, पत्नी
आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलीचा मृतांमध्ये समावेश आहे, तर सहा वर्षीय मुलगा गंभीर
जखमी झाला आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
जालना इथं औद्योगिक वसाहतीतल्या
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचं एटीएम २८ लाख रुपयांच्या रोकडसह चोरट्यांनी पळवून नेलं.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या
चोरट्यांनी एटीएम मशीनलाच दोरखंड बांधून गाडीच्या मदतीने मशीन ओढून काढल्याचं पोलिसांकडून
सांगण्यात आलं.
****
परभणीतल्या बालविद्या मंदीर
शाळेत सहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या अजय जितेंद्र डाके या विद्यार्थ्याच्या कलागुणांचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...
परभणी येथील बालविद्या मंदिरचा विद्यार्थी अजय जितेंद्र डाके याने पंतपधान नरेंद्र
मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यासोबत रेखाचित्र काढून त्यांना पाठवलं होतं. पंतप्रधानांनी
अजयच्या चित्रकलेचं मुक्तकंठाने कौतुक करत, या कलेच्या माध्यमातून आपले मित्र आणि आसपासच्या
लोकांना सामाजिक संबंधांच्या मुद्यांप्रती सजग करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला
आहे. अजयने पत्रातून व्यक्त केलेल्या देशाबद्दलच्या भावनेचंही पंतप्रधानांनी कौतुक
केलं आहे. विनोद कापसीकर आकाशवाणी वार्ताहर परभणी
****
औरंगाबाद विभागातील पदवीधर
मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी
परभणी जिल्ह्यात ३२ हजार ७१५ पदवीधर मतदारांसाठी ७८ मतदान केंद्रं उभारण्यात आली असल्याचं,
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात ७४ मतदान
केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदारांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यात प्रशासनास
सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पदवीधर
मतदारांना आपल्या मतदान केंद्राचा तपशील समजावा, यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
//*************//
No comments:
Post a Comment