Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
**
माहिती आणि
प्रसारण मंत्रालयांतर्गतचे चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि भारतीय बाल चित्रपट संस्थाचं
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची
मंजुरी; डीटीएच
सेवा पुरवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमधल्या सुधारणांनाही मान्यता
** येत्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान सन्मान निधिचा पुढचा हप्ता जारी करणार
** कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर
नाताळ साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं
गृहमंत्री अनिल देशमुख याचं आवाहन
**
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या पुरस्कारांच्या संख्येत वाढ
आणि
** नांदेडच्या वार्षिक
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेवर काही प्रमाणात निर्बंध, कृषिसह इतर प्रदर्शन भरणार नाही
****
केंद्रीय
मंत्रीमंडळानं चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट
संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण
करण्यास मंजुरी दिली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
विलिनीकरण करण्यात आलेल्या सर्व माध्यम विभागामधील कर्मचाऱ्यांच्या हिताची संपूर्ण
काळजी घेण्यात आली असून कोणालाही सेवेतून कमी केलं जाणार नसल्याचं त्यांनी मंत्रीमंडळ
बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.
देशात
डीटीएच सेवा पुरवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमधल्या सुधारणांनाही मंत्रीमंडळानं
मंजुरी दिली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. डीटीएच परवाना आता २० वर्षांसाठी दिला
जाणार असून दर तीन महिन्याला परवाना शुल्क जमा केले जाईल. डीटीएच सेवेत १०० टक्के विदेशी
गुंतवणुकीसह परवानगी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९००० कोटी रूपयांच्या
शिष्यवृत्ती योजनेसही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली असल्याचं
मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. ५ वर्षात ४ कोटींपेक्षा
जास्त अनुसुचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
आहे. यात ३५ हजार ५३४ कोटी म्हणजेच ६०
टक्के रक्कम केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार तर्फे दिली जाणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधिचा
पुढचा हप्ता जारी करणार आहेत. यामुळे नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ हजार
कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होईल. या कार्यक्रमात पंतप्रधान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी
संवाद साधणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान
निधि आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांबाबत हे शेतकरी
आपले अनुभव सांगणार आहेत.
****
कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी
नाताळ उत्सव साध्या पद्धतीनं आणि गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा
करावा, असं आवाहन गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी केलं आहे. ख्रिश्चन बांधवांनी नाताळ
सणानिमित्त चर्चमध्ये कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचं आयोजन
करावं तसंच ६० वर्षावरील तसंच १० वर्षाखालील लहान बालकं यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन
प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. धार्मिक, सांस्कृतिक
कार्यक्रमाचं अथवा मिरवणुकांचं आयोजन करू नये. फटाक्याची आतिषबाजी करु नये. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचं आणि तरतुदींचं काटेकोर पालन करावं,
असं आवाहन गृहमंत्री देशमुख यांनी केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
लातूरचे पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे
यांनी केलं
आहे.
****
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्यावतीनं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढवण्यात आली आहे. नव्यानं ३६ पुरस्कार सुरू करण्यात आले असून या वर्षापासून ९९ पुरस्कार दिले जाणार असल्याचं कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज मुंबईत
सांगितलं. ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला आहे. निवड आणि शिफारशी बाबतच्या
कार्यपध्दतीत सुधारणा आणि एकसुत्रीपणा येण्यासाठी पुरस्कारांच्या निकषांमध्येही
बदल करण्यात आले असल्याचं भुसे यांनी सांगितलं.
****
३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्काचे चलन भरुन दस्तावर
स्वाक्षरी केल्यास पुढील चार महिन्यांपर्यंत दस्ताची नोंदणी करता येईल, त्यामुळे नागरिकांनी दस्तऐवज
नोंदणीसाठी गर्दी करू नये असं आवाहन बीडचे मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी केलं आहे. राज्य सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली
आहे. नागरीकांनी ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा आणि संबंधित
बँकेकडून याबाबतचे दस्त प्राप्त करुन घ्यावे. दस्तऐवज नोंदणीची
सुविधा शनिवारीही सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा
भरण्यासाठी विशेष प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने ही प्रवेश
प्रक्रिया होणार असून यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक
संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए डॉट ए सी डॉट इन या
संकेतस्थळावर येत्या शनिवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.
याबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि
रिक्त जागांची माहितीही या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन
परभणी जिल्ह्यातले प्रगतशील शेतकरी
कांतराव देशमुख यांनी केलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या वार्षिक श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेवर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर
काही प्रमाणात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ही यात्रा
मर्यादित स्वरुपात भरणार आहे. जनावरात होणारा लंम्पी आजाराचा
प्रादुर्भाव लक्षात घेता या यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीनं भरवण्यात येणारे स्टॉल,
कृषि प्रदर्शन, पशु प्रदर्शन, बचत गटांच्या वस्तु प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येणार नसल्याचं जिल्हा परिषदेच्या
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केलं आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू
बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात या संसर्गानं मृत्यू झालेल्या
रुग्णांची संख्या ३४१ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात नवीन १२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले तर ४४ जणांना
उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली. सध्या २६४ रुग्णांवर रुग्णालयात
उपचार सुरू असल्याचं जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातही आज ४७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून
आले असून २२ जणांना या आजारातुन बरे झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. तर
सध्या २३१ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीनं येत्या शनिवारी जिल्हास्तरीय
युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे हा महोत्सव
घेण्यात येणार आहे. १५ ते २९ वयोगटातील स्पर्धकांनी त्यांचे प्रवेश
अर्ज उद्यापर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करावे असं आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केलं आहे. या महोत्सवात लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय
गायन आणि वाद्य, शास्त्रीय
नृत्य या कलांचा समावेश असणार आहे.
****
No comments:
Post a Comment