Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
राज्यात
प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकानयन तसंच पर्यटन स्थळी मनोरंजनाच्या इनडोअर
कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज याबाबतचे
आदेश जारी केले. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडांना परवानगी देतानाच यासंदर्भातली
आदर्श मानक प्रणाली गृह विभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचं, या आदेशात सांगण्यात
आलं आहे. तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी पर्यटन विभागाकडून मानक
प्रणाली जारी करण्यात येणार आहे. याठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारनं यापूर्वी जारी
केलेल्या कोविड प्रतिबंधाच्या नियामंचं पालन करणं बंधनकारक असल्याचं, या आदेशात म्हटलं
आहे.
****
देशात
कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं असून, ते ९५ पूर्णांक ६९ शतांश
टक्के झालं आहे. काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.
देशात आतापर्यंत ९६ लाख ६३ हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या २३
हजार ९५० रुग्णांची नोंद झाली, तर ३३३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे
देशातली एकूण रुग्णसंख्या एक कोटी ९९ हजार ५६० इतकी झाली आहे. देशात या विषाणू संसर्गानं
आतापर्यंत एक लाख ४६ हजार ४४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर एक पूर्णांक ४५
शतांश टक्के इतका आहे. देशात सध्या दोन लाख ८९ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल
जवळपास ९८ हजार कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशभरात आतापर्यंत १६ कोटी ४२ लाख चाचण्या
करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
नव्या
कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असं केंद्रीय
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी
चर्चा करताना ते बोलत होते. या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक
बदल केले असून, भारतीय कृषी क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला जाईल, असं ते म्हणाले. या
कायद्यामुळे शेतकर्यांना आपला माल विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल, उद्योगांना चालना मिळेल,
असं त्यांनी नमूद केलं. या कायद्यानंतरही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळत राहील,
असं आश्वासन देतानाच तोमर यांनी, सरकार विविध मुद्यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास
तयार असल्याचा पुनरुच्चार केला.
****
मराठा
आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षण उपसमितीची काल समितीचे अध्यक्ष मंत्री अशोक चव्हाण यांच्या
उपस्थितीत बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयात २५ जानेवारीला यासंदर्भात सुनावणी असून,
राज्य सरकारची रणनिती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर
याप्रकरणी सुनावणी सुरु आहे.
****
अहमदनगर
इथल्या नगर अर्बन बँकेत तीन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, माजी खासदार तथा
बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह, तत्कालीन शाखाधिकारी, संचालक आणि कर्जदारावर
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाखा अधिकारी मारूती औटी यांनी
याबाबतची फिर्याद दिली आहे. दिलीप गांधी यांच्यासह मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी
घनश्याम बल्लाळ, कर्जदार आशुतोष लांडगे आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी कट रचून, बँकेस
खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार केला. हे तीन कोटी
रुपये दुसऱ्यांच्या खात्यात वर्ग करुन, ते नंतर काढून घेण्यात आले, असं या फिर्यादीत
म्हटलं आहे.
****
बीड
जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड इथं महसूल विभाग वगळून जिल्ह्यात रखडलेल्या
विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. विकास कामांचा वेग वाढण्याची गरज असून, ही
प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्कतेनं आणि गांभीर्यानं प्रयत्न
करण्याची गरज आहे, यामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई
करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
अहमदनगर
जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातल्या बेलवंडीजवळ दौंडकडून मनमाडकडे जाणाऱ्या मालगाडीचे
१२ डबे आज पहाटे रुळावरुन घसरले. या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दौंड
– मनमाड रेल्वे मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. या अपघातानंतर या मार्गावरच्या
सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत. अपघाताचं कारण मात्र अद्याप
समजू शकलं नाही.
****
निष्पाप
प्राण्यांचा छळ थांबवण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी नाशिक मध्ये जिल्हा प्रशासनानं
‘प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती’ स्थापन केली आहे. या समितीची बैठक निवासी जिल्हाधिकारी
भागवत डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. प्राण्यांच्या क्रूरते विरोधात नागरिकांना
तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाईन आणि मोबाइल एप सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.
****
परभणी
शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट तिसऱ्या दिवशीही कायम असून, आज पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली. थंडीचा जोर चांगलाच वाढू लागल्यानं सर्वत्र शुकशुकाट दिसून येत
आहे.
****
No comments:
Post a Comment