आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ जानेवारी २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
नवी
दिल्लीत २६ जानेवारीला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी
झालेल्या पोलिसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भेट घेणार आहेत. शहा आज दिल्लीतल्या
दोन रुग्णालयांचा दौरा करणार आहेत. या हिंसक कारवायांमध्ये ३९४ पोलीस जखमी झाले आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काल प्रगती बैठकीच्या माध्यमातून महाराष्ट्रासह १५ राज्यांतल्या
नऊ प्रकल्पांचा आढावा घेतला. पायाभूत प्रकल्पांच्या कामात अडथळे आणणाऱ्या समस्यांचं
त्वरित निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी सर्व अधिकाऱ्यांना दिले. प्रधानमंत्री
भारतीय जन औषधी परियोजनेचा व्यापक प्रसार सुनिश्चित करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाची परिणामकारकता
वाढवण्यासाठी पंतप्रधानांनी औषधनिर्माण विभाग आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना
यावेळी प्रोत्साहन दिलं. प्रगती बैठकीच्या आतापर्यंतच्या एकूण ३४ सत्रात एकूण १३ लाख
कोटी रुपये खर्चाच्या २८३ प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.
****
राज्यातली भूजल पातळी वाढवण्यासाठी जनता आणि स्वयंसेवी संस्थांच्या
सहभागाची आवश्यकता, राज्याचे पाणीपुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 'भूजल वार्ता' या ई-बुलेटीनचं प्रकाशन काल मुंबईत पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत
होते. राज्यात पावसाची अनियमितता, वाढती लोकसंख्या, नगदी पिकांकडे असलेला कल आणि भूजल प्रदूषण, यासारख्या आव्हानांचा आपल्याला सामना करायचा आहे,
या पार्श्वभूमीवर ही ई पुस्तिका प्रकाशित करत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं.
****
सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात
येणाऱ्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत, शासन सकारात्मक असल्याची माहिती, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री
धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख
उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असून, शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी आता दर महिन्यात एका क्रिकेटपटूला
महिन्यातला सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार देणार आहे. काल दुबईत आयसीसीकडून ही माहिती
देण्यात आली. विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष
तसंच महिला क्रिकेटरांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment