Monday, 25 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या पाचजणांची निवड

** राष्ट्रपती पोलिस पदक, अग्निशमन सेवा पदक तसंच जीवन रक्षा पदकं जाहीर

** कृषी कायद्यांविरोधात किसान सभेचा मोर्चा मुंबईत आझाद मैदानावर दाखल

** काही पक्षांकडून जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

आणि

** औरंगाबाद स्मार्ट सिटीझन मोहिमेचं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते  उद्घाटन

****

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी राज्यातल्या पाच बालकांची निवड झाली आहे. यामध्ये नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याची शौर्य पुरस्कारासाठी, तर मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. संशोधन क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावची अर्चिता पाटिल, सोनित सिसोलेकर, आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल या तिघांची निवड झाली आहे.

नांदेडच्या कामेश्वर वाघमारेनं आकाशवाणीशी बोलताना या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. 

तीन मुले पोहत होते. बुडत होते. तिघांपैकी दोन मुलांना जिवंत वाचवल्याबद्दल सार्थ अभिमान आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार दिल्यामुळे मी कोटी कोटी आभारी आहे.

 

नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल यानं या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

मेरा मुख्य नवाचार किलोमोझॅक व्हायरस नामक एक ‍भिंडी में होनेवाली घातक बिमारी का एक नैसर्गिक उपाय है. इस उपाय को आजमाते हुये करीब पचास हजार किसानों और उनके परिवारों को इससे सीधा सीधा लाभ मिला है. मै प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन ॲण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट का और पुरे देश का आभारी हु.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांनी या बालकांशी संवाद साधताना, कोविडच्या काळातही अद्धूत क्षमतांचा वापर केल्याबद्दल त्यांचं कौतुक केल.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिनंदन संदेशात, महाराष्ट्राला या बालकांचा अभिमान असल्याचं, म्हटलं आहे.

****

राष्ट्रपती पोलिस पदकांची आज घोषणा झाली. यात महाराष्ट्रातल्या ५७ पोलिसांना पदकं मिळाली आहेत. पदक मिळवणाऱ्या ४ पोलिस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. २०७ पोलिस शौर्य पदकं तसंच ७३९ पोलिस सेवा पदकंही आज जाहीर झाली, यामध्ये महाराष्ट्रातल्या १३ पोलिसांचा समावेश आहे. ७३ अग्निशमन सेवा पदकं तसंच ५४ गृहरक्षक दल तसंच नागरी सुरक्षा पदकंही आज जाहीर करण्यात आली. अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या चार जणांचा समावेश आहे. ४० जीवन रक्षा पदकंही आज राष्ट्रपतींनी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन जणांचा समावेश आहे.

दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोंविद राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे.

****

नीति आयोगामार्फत दिल्या जाणाऱ्या इंडिया इनोव्हेशन इंडेक्सअहवालात महाराष्ट्र राज्याला दुसरं स्थान प्राप्त झालं आहे, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम, स्टार्टअप्सला चालना, तसंच संकल्पनांचा विकास आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे महाराष्ट्रानं हे यश मिळवलं, असं मलिक म्हणाले. २०१९ मध्ये या अहवालात राज्य तिसऱ्या क्रमांकावर होतं, यंदा राज्यानं दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या अहवालात कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे.

****

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं काढलेला मोर्चा मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाला असून, या मोर्चात राज्यभरातून हजारो आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण, अखिल भारतीय किसान सभेचे अजित नवले, यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी झाले.

कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्याचा आंदोलकांचा मानस आहे. मात्र, राज्यपालांकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. आज २५ जानेवारीला गोवा विधानसभेच्या प्रथम सत्राला राज्यपाल संबोधित करणार असल्यानं, ते आज शेतकरी शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत, असं राजभवनातून यापूर्वीच सांगण्यात आल्याचं, राजभवनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. संयुक्त शेतकरी मोर्चाचे नेते धनजंय शिंदे तसंच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना कालच ही माहिती देण्यात आली होती. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊनही भेट घेतली नाही, हे वृत्त चुकीचं असल्याचं, राज भवनातून सांगण्यात आलं आहे. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार हे या शिष्टमंडळाकडून आज सायंकाळी निवेदन स्वीकारतील, असा निरोपही धनंजय शिंदे यांना कळवण्यात आला होता, त्यांनी हे स्वीकृत केल्याचंही संदेशाव्दारे कळवलं असल्याचं, राज भवनातून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काही पक्ष जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात कंत्राटी शेतीला मान्यता दिली होती, तेव्हापासून राज्यात कंत्राटी शेती सुरु आहे. राज्यात स्वतः केलेला कंत्राटी शेतीचा कायदा चालतो आणि केंद्राने केलेला कायदा चालत नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

****

औरंगाबाद स्मार्ट सिटीझन मोहिमेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी तसंच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, महात्मा गांधी मिशन रुग्णालय आणि औरंगाबाद फर्स्ट या संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम सुरू केली आहे. रहिवाशांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित करणं, हा या मोहिमेचा उद्देश आहे. मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी बोलताना, प्रत्येक नागरिक जबाबदारीने वागल्याशिवाय शहर स्मार्ट बनू शकत नसल्याचं नमूद केलं. शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने शहरातल्या उद्योग, स्वयंसेवी संस्था, नागरिक गट, शैक्षणिक संस्थांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

****

औरंगाबाद इथल्या विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळांच्या सरावासाठी खेळाडूंना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. अटी आणि शर्तींच्या अधीन राहून हे संकुल आज जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून खुलं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पोलिस तसंच सैन्य भरतीतल्या प्रशिक्षणार्थी खेळाडूंसाठी विशेष साधनसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

****

ग्रामीण भागात स्वच्छता आणि शिक्षणाची लोकचळवळ उभी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं, परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी म्हटलं आहे. मानवत तालुक्यात ताडबोरगाव या ग्रामपंचायतीमध्ये आज पहाटे पाच वाजता टाकसाळे यांच्यासह गुडमॉर्निंग पथकाने भेट देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना शौचालयाचा नियमित वापर करण्याचं आवाहन केलं. यावेळी गावातल्या शाळेचे मुख्याध्यापक अनिल सावळे तसंच त्यांच्या सहकारी शिक्षकांनी गावातली एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना त्याच्याकडून शौचालयाचा नियमित वापर करत असल्याचा दाखला घेणार असल्याचं मुख्याध्यापक सावळे यांनी सांगितलं.

****

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नवमतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याचं आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केलं आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नवमतदारांना ओळख पत्र वाटप, मतदान प्रक्रियेसंदर्भात घेण्यात आलेल्या वादविवाद, चित्रकला, निबंध, तसंच वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना तसंच उत्कृष्ट काम केलेले अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

****

मतदार दिनानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेत शपथ घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने यांनी शपथेचं वाचन केलं

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात साष्टपिंपळगाव इथं सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांसह पंचक्रोशीतल्या गावांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातले अनेक बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी आज आंदोलनस्थळी सरकारच्या नावानं जागरण-गोंधळ घालण्यात आला.

****

राज्यात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. बंगालच्या उपसागरातल्या वादळामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पुढच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

 

 

No comments: