Thursday, 28 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 January 2021 Time 1.00pm to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या मेळाव्यात सहभागी झाले आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्य दलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला आणि एनसीसी छात्रांच्या संचलनाची पाहणी केली.

****

देशभरात काल सुमारे तीन लाख लोकांना कोविडची लस टोचण्यात आली. आतापर्यंत पहिल्या फळीतल्या २३ लाख २८ हजार ७७९ नागरिकांचं लसीकरण झालं आहे. या नागरिकांना आतापर्यंत कोणतेही दुष्परिणाम जाणवले नसल्याचं, आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान, कोव्हॅक्सीन ही लस ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या अवतारावरही प्रभावी असल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था - आयसीएमआरने सांगितलं आहे. राज्यात आतापर्यंत एक लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांना लसीकरण झालं आहे.

****

दरम्यान, देशात काल नव्या ११ हजार ६६६ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १२३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी सात लाख एक हजार १९३ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल १४ हजार ३०१ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी तीन लाख ५९ हजार ३०५ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ७३ हजार ७४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यासाठी अर्थ मंत्रालयानं महाराष्ट्रासह १८ राज्यांना १२ हजार ३५१ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत. २०२० - २१ या आर्थिक वर्षात सरकारनं दुसऱ्यांदा अनुदानाची रक्कम राज्यांना दिली आहे.

****

कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी धाडसी पाऊल उचललं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल कृषीपंप वीज जोडणी धोरण - २०२० चं लोकार्पण करताना ते बोलत होते. शेतकरी कर्जमाफीनंतर आता कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीनं वीजजोडणी देणं, वीजबिलातील थकबाकीवरील व्याज आणि विलंब शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी राज्य शासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद द्यावा,  असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

भारतीय स्टेट बँकेनं नोव्हेंबर २०२० पासून कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या ॠण समाधान योजनेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून, कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ केलं जात असून, उचललेल्या कर्जातल्या मुद्दलापैकी १० ते २० टक्के रक्कम बँकेत भरणा करून कर्ज मुक्त होता येणार आहे. यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी याआधी ३१ जानेवारी ही मुदत होती, ती आता ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अधिकाधिक थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावं, असं आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातल्या वाठोडा इथं घरगुती पाळीव कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या भागातल्या एक किलोमीटर क्षेत्रातल्या बाराशे कोंबड्या शास्त्रीय पद्धतीनं नष्ट करण्यात आल्या आहेत. तसंच हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 

अकोला जिल्ह्याच्या पिंपळगाव चांभारे इथही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे. बाधित क्षेत्रातल्या सर्व कोंबड्यांची तसंच निगडित खाद्य आणि अंडी यांचीही शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातला वनपाल भगवान मगर याला, एक हजार रुपयांची लाच घेतांना काल अटक करण्यात आली. मगर यानं रोपांचं आणि खताचं देयक मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती एक हजार रुपये घेतांना त्याला पकडण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या सिंधी इथं होणाऱ्या १५ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भगवान अंजनीकर यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे संयोजक दिगंबर कदम यांनी आज ही माहिती दिली. येत्या ३१ तारखेला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

****

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या एक फेब्रुवारीला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात, सर्व संबधितांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

***///***

No comments: