Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२८ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
** कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून
बाहेर पडण्याचा भारतीय किसान युनियन तसंच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचा निर्णय
** न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत कर्नाटक व्याप्त मराठी भाषिक
भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
** राज्यात अनेक जिल्ह्यात कोविड नियमांचं पालन करत
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू
** राज्याभरात काल दोन हजार १७१ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार बाधितांचा मृत्यू
** डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी
कुलसचिव आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉ मानवेंद्र काचोळे तसंच हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्यसैनिक ॲडव्होकेट प्रभाकरराव
देशमुख यांचं निधन
** हिंगोली जिल्ह्यात कृष्णापूर इथं बर्ड फ्लूच्या साथीमुळेच
कोंबड्या मृत पावल्याचं निष्पन्न
आणि
** मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागांत आज पावसाची
शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
****
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातून, भारतीय
किसान युनियन तसंच राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंसाचाराचा मार्ग ज्यांनी स्वीकारला आहे, त्यांच्यासोबत आम्ही आंदोलनात सहभागी होणार
नसल्याचं, भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष ठाकूर भानुप्रताप सिंह यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे राष्ट्रीय संयोजक व्ही एम सिंह यांनी हा निर्णय जाहीर
करताना, ज्यांचा विरोधाचा मार्गच वेगळा आहे, अशा लोकांना समर्थन देणार नसल्याचं स्पष्ट
केलं.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा हा प्रयत्न
असून, हिंसाचारामागे घुसखोर आहेत, अशी भूमिका ४० शेतकरी संघटनेच्या संयुक्त किसान मोर्चानं
जाहीर केली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच, शांततापूर्ण
मार्गाने आंदोलन सुरुच राहील, असं किसान मोर्चानं म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनात फूट
पडल्यामुळे एक फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारा पायी मोर्चा रद्द करण्यात आला
आहे.
****
दरम्यान, या हिंसक घटनांना जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार
नाही, असं दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे. या हिंसक कारवायांमध्ये
३९४ पोलीस जखमी झाले, यापैकी अनेकांवर विविध रुग्णालयांच्या अतिदक्षता कक्षात उपचार
सुरू आहेत. पोलिसांच्या ३० वाहनांची नासधुस करण्यात आली, इतरही सार्वजनिक मालमत्तेचं
मोठं नुकसान झाल्याचं, पोलीस आयुक्तांनी सांगितलं. या प्रकरणी शेतकरी नेते राकेश टिकैत,
योगेंद्र यादव, मेधा पाटकर यांच्यासह ३७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, २००
जणांना पकडण्यात आलं आहे.
****
केंद्रीय गृहमंत्रालयानं काल कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचना
जारी केल्या. गेल्या चार महिन्यांपासून पाळल्या जात असलेल्या सूचनाच, फेब्रुवारी महिन्यातही
लागू असतील. आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांना
छोट्या प्रमाणावर सावधगिरी बाळगून प्रतिबंधित क्षेत्र निर्धारित करता येतील, असं यात
म्हटलं आहे. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन, क्रीडा, तसंच धार्मिक कार्यक्रम,
क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत पूर्ण करण्याची परवानगी कायम आहे, मात्र आता राज्य सरकार
अशा कार्यक्रमातली उपस्थितांची संख्या निर्धारित करू शकणार आहे. चित्रपटगृहं तसंच नाट्यगृहांना
पूर्ण प्रेक्षक क्षमतेनं खेळ दाखवण्याची तसंच जलतरण तलाव सुरू करण्याची परवानगी, संबंधित
मंत्रालयांच्या समन्वयानंतर मिळेल, असंही या निर्देशांमध्ये नमूद आहे.
****
कर्नाटक व्याप्त मराठी भाषिकांच्या प्रदेशासंदर्भात जोपर्यंत
न्यायालयात निकाल लागत नाही, तोपर्यंत सरकारनं हा भूभाग केंद्रशासित प्रदेश करावा,
अशी मागणी न्यायालयात केली पाहिजे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; संघर्ष आणि संकल्प’
या पुस्तकाचं प्रकाशन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री
अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांच्यासह सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते
मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी भाषिक प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम
निर्धार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयातला लढा हे सीमावादातलं
शेवटचं शस्त्र असून, आता न्यायालयात राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल, असं मत
पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
कोविड संकटामुळे ऑनलाईन सुरू असलेल्या पाचवी ते आठवीच्या अनेक
शाळा कालपासून प्रत्यक्ष सुरू झाल्या. राज्यातल्या बहुतांशी जिल्ह्यात कोविड नियमांचं
पालन करत पाचवी ते आठवीचे वर्ग भरल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. गेल्या काही
दिवसांपासूनच शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
काल सकाळी मुलांचा ताप मोजून, सॅनिटायझरने हात स्वच्छ करून, आणि मास्क घालून शाळेत
प्रवेश देण्यात आला. सुरक्षित अंतर पाळून हे वर्ग सुरू झाले. जवळपास दहा महिन्यांच्या
खंडानंतर शाळा सुरू झाल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करून, रांगोळ्या काढून, पुष्पगुच्छ
देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.
परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे
वर्ग कालपासून सुरू झाले.
लातूर जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळा सुरु झाल्या असल्याची
माहिती उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत यांनी दिली.
हिंगोली जिल्ह्यात मात्र एकाही शाळेमध्ये काल पाचवी ते आठवीचे
वर्ग सुरू झाले नाहीत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तो
अहवाल, पालकांचं संमतीपत्र, शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण आधिकाऱ्यांकडे
पाठवण्याचं काम सुरु असून, लेखी परवानगी नंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. पाचवी
ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी एकाही शाळेचा प्रस्ताव अद्याप आला नसल्याचं हिंगोलीच्या
शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव सामान्य रुग्णालयातले निवासी वैद्यकीय
अधिकारी डॉ नीलेश टापरे यांनी, कोविड लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून,
कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचं, डॉ टापरे यांनी सांगितलं.
ही लस मी स्वत:
टोचून घेतली आहे. कुठलाही दुष्परिणाम झालेला
नाही.कारण की आज अठरा दिवस होत आलेले आहेत.अत्यंत सुरक्षित आहे.कुठलाही साईड इफेक्ट
नाही. आतापर्यंत आपल्या इथं साडे चारशेच्यावर लोकांनी ही लस टोचून घेतली आहे.त्यात
शंभरच्या वर खासगी व गर्व्हनमेंटचे डॉक्टर, नामांकित डॉक्टर्स यांनीपण लस टोचून घेतली
आहे. आणि कोणालाही ॲडर्व्हसिपेटचं काही रिपोर्ट झालेला नाही.सर्वजण सुरक्षित आहेत.तर
मी नागरिकांना हेच आव्हान करेल की सर्वांनी हे जे सोशल मिडियावर व इतर कुठे अफवा होत
आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. ही लस सुरक्षित आहे.
****
राज्यात काल दोन हजार १७१ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण
संख्या २० लाख १५ हजार ५२४ झाली आहे. काल ३२ रुग्णांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ८९४ झाली असून, मृत्यूदर २
पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला
आहे. तर काल २ हजार ५५६ रुग्ण या संसर्गातून
मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत
१९ लाख २० हजार सहा रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २६ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४३ हजार ३९३ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद इथं दोन तर नांदेड आणि जालना जिल्ह्यात
प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या २०५ रुग्णांची
नोंद झाली.
नांदेड जिल्ह्यात काल ४८ नवे रुग्ण आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात
३२, बीड ४५, लातूर ३५, जालना २३, परभणी दहा, उस्मानाबाद नऊ, तर हिंगोली जिल्ह्यात काल
तीन नवे रुग्ण आढळून आले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रसिद्ध
शास्त्रज्ञ आणि शेतकरी संघटनेचे नेते डॉ मानवेंद्र काचोळे यांचं काल औरंगाबाद इथं निधन
झालं, ते ६८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात
उपचार सुरू होते. २०१४ साली सेवानिवृत्त झालेले काचोळे यांनी, शेतकरी संघटनेचे संस्थापक
शरद जोशी यांच्यासोबत अखेरपर्यंत काम केलं. सध्या ते शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर
होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांनी २००४ मध्ये
परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. सध्या ते एमजीएम अभिमत विद्यापीठात,
जैव तंत्रज्ञान विभागात संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते.
****
मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले पहिले वरीष्ठ
वकील आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातले स्वातंत्र्यसैनिक प्रभाकरराव देशमुख यांचं काल
औरंगाबाद इथं निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. कायद्यावर अचूक अभ्यास करणारे आणि कायद्याचं
मार्मिक अर्थविवरण करणारे कायदे पंडित म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर इथं बर्ड
फ्लूची साथ असल्याचं, प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी १२० कोंबड्या
मरण पावल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाच्या पथकानं काल या भागातल्या कोंबड्या नष्ट
केल्या. हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बर्ड फ्लू ची साथ वाढत असल्यानं, पशुपालकांनी
काळजी घेण्याचं आवाहन, पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.
****
नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषी विभागाच्या वतीनं
विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत, संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत, शेतकरी
ते थेट ग्राहक माल विक्री मेळावा सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या
हस्ते या बाजाराचं उद्घाटन झालं, शेतमालाच्या विक्रीचे कसब शेतकऱ्यांनी अंगिकारल्यास
त्यांना निश्चितच अधिकचा लाभ होईल, असं चव्हाण म्हणाले. हा ग्राहक बाजार उद्या २९ जानेवारी
पर्यंत चालणार असून, नागरिकांनी या बाजाराला भेट देऊन खरेदी करण्याचं आवाहन, नांदेड
जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केलं आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यात महाराष्ट्र शेतकरी शुगरकडील
शेअर्सपोटी असलेली रक्कम परत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन
विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी, काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना
सादर केलं. शेतकऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा केला जात असल्याचं, जिल्हा प्रशासनाकडून
सांगण्यात आलं.
****
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत पुण्याच्या रिजनल आऊटरीच ब्यूरो विभागाच्यावतीनं काल औरंगाबाद इथं नोंदणीकृत सांस्कृतिक गीत आणि नाटक कलापथकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. रिजनल आउटरिच ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा यांनी
या कार्यशाळेचं
उदघाटन केलं. आत्मनिर्भर भारत आणि कोविड - १९ लसीकरणावर रिजनल
आऊटरीच ब्यूरो एक अभियान राबवणार असून या अभियानाचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
लातूर इथल्या पोतदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी सृष्टी
सुधीर जगताप हिनं सलग २४ तास लावणी नृत्याचा विक्रम केला आहे. आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
या विक्रमाची नोंद झाली. या संस्थेच्या निरीक्षक श्रीलता मल्हारी यांनी सृष्टीला याबाबतचं
प्रमाणपत्र बहाल केलं. प्रजासत्ताक दिनी दुपारी साडे चार वाजता सृष्टीनं लावणी नृत्याला
प्रारंभ केला, विविध १०० लावण्यांवर नाच करत, काल दुपारी साडे चार वाजता तिनं पदन्यास
थांबवला.
****
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर या रेल्वेमार्गाच्या खर्चापैकी
५० टक्के हिस्सा राज्य सरकारनं रेल्वे मंडळाला देणं आवश्यक आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, आणि तसं संमतीपत्र केंद्र
सरकारला पाठवण्याची मागणी, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे. या मागणीचं पत्र
पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सादर केलं. या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण
२००९ साली करण्यात आलं आहे.
****
परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे
यांनी केलेल्या प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या आवाहनाला, जिंतूर तालुक्यात भोगाव देवी
इथल्या नागरिकांनी प्रतिसाद दिला. उमेद अंतर्गत परिवर्तन महिला बचत गट आणि ग्रामपंचायतीच्या
सदस्यांनी गावातील प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छता मोहीम राबवली.
****
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या दिवाणी तसंच फौजदारी न्यायालयात
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. औंढा न्यायालयाचे न्यायाधीश
प्रदीपसिंह ठाकूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात विधीज्ञ.एस.एस.कदम,
पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी रस्ता वाहतुकीचे नियम तसंच कायदे याविषयी मार्गदर्शन
केलं.
****
कुशल अभियंते निर्माण करणं ही तंत्र शिक्षण पदविका संस्थांची
जबाबदारी असल्याचं, राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, डॉ अभय वाघ यांनी म्हटलं
आहे. ते नांदेड इथं शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात काल एका कार्यक्रमात बोलत होते.
कोरोना काळात वर्क फ्रॉम होम मुळे कामाची गुणवत्ता वाढली असल्याचं ते म्हणाले.
****
नांदेड - जम्मू तावी - नांदेड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी
उद्या २९ जानेवरीपासून धावणार आहे. ही रेल्वे दर शुक्रवारी नांदेड इथून सकाळी ११ वाजता
सुटणार असून पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, जालंधर मार्गे जम्मू तावी
इथं दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी
दर रविवारी सकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी
तीन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. १९ डब्ब्यांची ही गाडी पूर्णत: आरक्षित असेल, अनारक्षित
तिकीट धारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं
आहे.
****
हवामान
मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत आज गुरुवारी पावसाची शक्यता
हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, चार आठवड्यांच्या अंदाजानुसार ५ फेब्रुवारीपासून
राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये
तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल, असं हवामान विभागानं कळवलं आहे.
****///****
No comments:
Post a Comment