Friday, 29 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.01.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार प्रत्येक आंदोलनाचा आदर करते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं सुरु झालं, त्यावेळी ते बोलत होते. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना दुर्दैवी असून, जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, त्याच संविधानानुसार आपल्याला कायदा आणि नियमांचं गंभीरपणे पालन केलं पाहिजे, असं राष्ट्रपती म्हणाले. या कृषी सुधारणा कायद्यांच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अधिकारही दिले आहेत, कृषी क्षेत्राला अधिक लाभ देण्यासाठी सरकार कृषी क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधांवर काम करत आहे, असं राष्ट्रपतींनी अभिभाषणातून स्पष्ट केलं. कोविड काळात सरकारकडून करण्यात आलेली मदत, कृषी कायद्यांना दिलेली मंजुरी, आत्मनिर्भर भारत, विविध योजना त्यांचे फायदे, यावर राष्ट्रपतींनी भाष्य केलं. भारतानं कोरोना महामारीचा एकजुटीनं सामना केला असून, लस निर्मितीतही भारत पुढे असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारनं योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे लाखो लोकांचे प्राण वाचले, असं राष्ट्रपती म्हणाले.

****

आजपासून सुरु झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन या दशकातलं पहिलं अधिवेशन असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते महत्वाचं असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनात वेळेचा पूर्ण उपयोग व्हावा, आणि संसद सदस्यांनी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान द्यावं, असं पंतप्रधान म्हणाले.

****

प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवसांच्या सोहळ्याचा समारोप आज नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक विजय चौकात बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमानं होणार आहे. भारतीय धून ही यंदाच्या बीटिंग द रिट्रीट सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे. या सोहळ्यात नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २६ पेक्षा जास्त तुकड्या पारंपारिक बँडवर संचलन करणार आहेत. बीटिंग द रिट्रीट सोहळ्यातली पहिली धून ही सुवर्णमहोत्सवी विजय धून म्हणून सादर केली जाईल. “सारे जहां से अच्छा” या लोकप्रिय गीताच्या धून प्रस्तुतीनं सोहळ्याचा शेवट होणार आहे.

****

देशात आतापर्यंत २३ लाख ५५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे. राज्यात काल ५३८ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार १८७ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. बीड आणि नांदेड जिल्ह्यांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत दोन लाख १९ हजार ६९६ कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी काल दिली.

दरम्यान, देशभरात कोविड-19 च्या बाधितांची संख्या सातत्यानं घटत असून, गेल्या सात दिवसांत १४६ जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

****

राज्य सरकारनं कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, गेल्या चार महिन्यांपासून पाळल्या जात असलेल्या सूचनाच, २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत लागू राहणार आहेत. यासंदर्भातला आदेश आज जारी करण्यात आला.

****

नाशिक इथं होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून, परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा होत आहे, या पार्श्वभूमीवर हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडलं जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, अशी आशा व्यक्त करून त्यांनी, या संमेलनाच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या. डॉ जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसंच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. २६ मार्चपासून हे संमेलन नाशिक इथं गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार आणि जिल्हा परिषद सदस्या पुनम पवार यांच्या उपस्थितीत काल करण्यात आला. पहिल्याच दिवशी आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका अशा १०३ व्यक्तींचं लसीकरण करण्यात आलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी नगर परिषदेअंतर्गत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान घरकुल योजनेत एक हजार तीनशे चार घरांच्या बांधकामास मान्यता मिळाली असून ३६७ घरकुलांना बांधकाम परवानगी मिळाली आहे. यापैकी १२० घरकुलांच बांधकाम पूर्ण झालं आहे, तर २४७ घरकुलांची काम प्रगती पथावर आहेत. या बांधकामासाठी केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या चौथ्या टप्प्यातल्या निधीच्या धनादेशाचे वाटप नगराध्यक्ष सुरेखा जिठावार यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...