Wednesday, 27 January 2021

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** कोविड संकटामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या बहुतांश शाळा आजपासून सुरू

** कर्नाटक व्याप्त मराठी प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

** अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

आणि

** भूजल पातळी वाढवण्यासाठी जनता आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची आवश्यकता

*****

कोविड संकटामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. राज्यात नाशिक, नागपूर, चंद्रपूर, रायगड, ठाणे, धुळे, वाशिम तसंच परभणी जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये आज कोविड नियमांचं पालन करत पाचवी ते आठवीचे वर्ग भरल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच शाळांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. आज सकाळी मुलांचा ताप मोजून आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ करून, मास्क घालून शाळेत प्रवेश देण्यात आला. सुरक्षित अंतर पाळून हे वर्ग सुरू झाले. जवळपास दहा महिन्यांच्या खंडानंतर शाळा सुरू झाल्याने अनेक शाळांमध्ये सजावट करून, रांगोळ्या काढून, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरू झाले. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचं थर्मलगननं तापमान तपासण्यात आलं, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात एकाही शाळेमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तो अहवाल, पालकांचं संमतीपत्र,शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण आधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु असून, लेखी परवानगी नंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी आजपर्यंत एकाही शाळेचा प्रस्ताव आला नसल्याचं हिंगोलीचे शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव सामान्य रुग्णालयातले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ नीलेश टापरे यांनी, कोविड लस घेतली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचं, डॉ टापरे यांनी सांगितलं.

 

ही लस मी स्वत: टोचून घेतली  आहे. कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही.कारण की आज अठरा दिवस होत आलेले आहेत.अत्यंत सुरक्षित आहे.कुठलाही साईड इफेक्ट नाही. आतापर्यंत आपल्या इथं साडे चारशेच्यावर लोकांनी ही लस टोचून घेतली आहे.त्यात शंभरच्या वर खासगी व गर्व्हनमेंटचे डॉक्टर, नामांकित डॉक्टर्स यांनीपण लस टोचून घेतली आहे. आणि कोणालाही ॲडर्व्हसिपेटचं काही रिपोर्ट झालेला नाही.सर्वजण सुरक्षित आहेत.तर मी नागरिकांना हेच आव्हान करेल की सर्वांनी हे जे सोशल मिडियावर व इतर कुठे अफवा होत आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नये. ही लस सुरक्षित आहे.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या रिजनल आउटरिच ब्यूरो कार्यालयाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. महाराष्ट्र आणि गोव्यात आत्मनिर्भर भारत आणि कोविड लसीकरणाबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी केलेल्या कलापथकांना या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं.

****

कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा प्रदेश पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. दीपक पवार यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद; संघर्ष‍ आणि संकल्प’ या पुस्तकाचं प्रकाशन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयातला लढा हे सीमावादातलं शेवटचं शस्त्र असून आता न्यायालयात राज्याची भूमिका ठामपणे मांडावी लागेल, असं मत पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत मुंडे बोलत होते. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असून, शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली       

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात कृष्णापूर इथं बर्ड फ्लूची साथ असल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी १२० कोंबड्या मरण पावल्या होत्या. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने आज या भागातल्या कोंबड्या नष्ट केल्या. हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये बर्ड फ्लू ची साथ वाढत असल्यानं, पशुपालकांनी काळजी घेण्याचं आवाहन, पशुसंवर्धन विभागानं केलं आहे.

 

****

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कृषी विभागाच्या वतीने विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक माल विक्री मेळावा सुरू करण्यात आला आहे. हा ग्राहक बाजार २९ जानेवारी पर्यंत चालणार असून या बाजारास नागरिकांनी भेट देऊन खरेदी करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केलं आहे.

****

राज्यातील भूजल पातळी वाढवण्यासाठी जनता आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची आवश्यकता राज्याचे पाणीपुरवठा तसंच स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 'भूजल वार्ता' या ई-बुलेटीनचं प्रकाशन आज मुंबईत मंत्रालयात पाटील यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकाशनामुळे भूजलाविषयी व्यापक स्वरूपात  माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात पर्जन्यमानाची दोलायमानता, वाढती लोकसंख्या, नगदी पिकांकडे असलेला कल आणि भूजल प्रदूषण यासारख्या आव्हानांचा आपल्याला सामना करायचा आहे, या पार्श्वभूमीवर ही पुस्तिका प्रकाशित करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

****

परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलेल्या प्लास्टिक कचरा गोळा करण्याच्या आवाहनाला जिंतूर तालुक्यात भोगाव देवी इथल्या नागरिकांना प्रतिसाद दिला. उमेद अंतर्गत परिवर्तन महिला बचत गट आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी गावातील प्लास्टिक कचरा गोळा केला.

****

हिंगोली जिल्ह्या औंढा नागनाथ इथल्या दिवाणी तसंच फौजदारी न्यायालयात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. औंढा न्यायालयाचे न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात विधीज्ञ.एस.एस.कदम, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी रस्ता वाहतुकीचे नियम तसंच कायदे याविषयी मार्गदर्शन केलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड इथल्या सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातला वनपाल भगवान मगर याला एक हजार रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज अटक केली. मगर यानं रोपांचं आणि खताचं देयक मंजूर करण्यासाठी म्हणून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती एक हजार रुपये घेतांना त्याला पकडण्यात आलं.

****

बीड, जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या एक फेब्रुवारीला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सर्व संबधितांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

****

नांदेड - जम्मू तावी - नांदेड विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी परवा २९ जानेवरीपासून धावणार आहे. ही रेल्वे दर शुक्रवारी नांदेड इथून सकाळी ११ वाजता सुटणार असून पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, नवी दिल्ली, जालंधर मार्गे जम्मू तावी इथं दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी दर रविवारी सकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. १९ डब्ब्यांची ही गाडी पूर्णत: आरक्षित असेल, अनारक्षित तिकीट धारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही, असं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज परत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर गांगुली यांची अँजिओग्राफी करण्यात आली. गेल्या दोन तारखेला गांगुली यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी आता दर महिन्यात एका क्रिकेटपटूला महिन्यातला सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कार देणार आहे. आज दुबईत आयसीसीकडून ही माहिती देण्यात आली. विविध आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष तसंच महिला क्रिकेटरना हा पुरस्कार दिला जाणार आहे.

****

हवामान -

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत उद्या गुरुवारी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, चार आठवड्यांच्या अंदाजानुसार ५ फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होईल, असं हवामान विभागानं कळवलं आहे.

//***********//

 

No comments: