Sunday, 24 January 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 January 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 January 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** नाशिक इथं होणाऱ्या चौऱ्यान्नवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड

** कोरोना विषाणू संसर्ग संपुष्टात येत नाही तोपर्यंत महाविद्यालयीन परिक्षा `ऑनलाईन`च - उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

** राज्य सरकार लवकरच पुनर्वसन धोरण आणणार - मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

आणि

** नांदेड जिल्हा परिषदेच्या सावित्रीबाई फुले आणि नरहर कुरुंदकर पुरस्कारांची घोषणा

****

चौऱ्यान्नवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत खगोलशास्त्रज्ज्ञ णि विज्ञान कथा लेखक जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. अखील भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महामंडळाची कालपासून या संदर्भातली बैठक सुरू होती, त्यात आज त्यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. नारळीकर यांना `पद्मभूषण` आणि `पद्मविभूषण` या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या `यक्षाची देणगी` या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या `चार नगरातले माझे विश्र्व` या आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असून अमेरिकेतील प्रतिष्ठाननंही साहित्य विषयक जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान नाशिक इथं होणार आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग जोपर्यंत पुर्णपणे संपुष्टात येत नाही आणि विद्यापीठ, प्राध्यापक आणि सर्व घटकांची मानसिकता होत नाही तोपर्यंत विद्यापीठांच्या परिक्षा `ऑन लाईन`च होणार असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात असून जात प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांनाही अर्ज दाखल केल्याची पावती सादर करुन प्रवेश दिला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्यात कोणाला आरक्षण देताना कोणाचंही आरक्षण काढून घेणार नाही, ही भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली असल्यामुळे यावरून राज्य मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचं मंत्री सामंत यांनी यावेळी नमुद केलं.  

****

राज्यात लवकरच पूनर्वसन धोरण आणणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. पूनर्वसित गावांचे प्रश्न कायमचे निकाली काढण्यासाठी धोरण तयार करण्यात आलं असून, ते आठवडाभरात मंत्रीमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. यामध्ये जमीन खरेदीपासून गावांच्या नागरी सुविधापर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्यानं पूनर्वसित गावांचे प्रश्न सुटणार असल्याचं मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितलं.

****

देशात आतापर्यंत पंधरा लाख ८२ हजार २०१ जणांना कोरोना विषाणू संसर्गावरील प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देशात कोरोना विषाणू संसर्गाचे १४ हजार ८४९ नवे रुग्ण आढळले असून १५५ रुग्णांचा या काळात मृत्यू झाला आहे तर १५ हजार ९४८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या एक कोटी सहा लाख ५४ हजार ५३३ झाली आहे. सध्या एक लाख ८४ हजार ४०८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एक कोटी तीन लाख १६ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ५३ हजार ३३९ झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे दहा नवे रूग्ण आज आढळले. यामुळे जिल्ह्यातल्या एकुण  रुग्णांची संख्या २२ हजार २६४ झाली आहे. आज बरे झालेल्या २० रूग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार १५९ रुग्ण या आजारावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त देशभरातील मुलींना आणि त्यांच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वाला अभिवादन केलं आहे. केंद्र सरकारनं अनेक उपक्रम हाती घेतले असून त्याद्वारे मुलींचं शिक्षण, सहभाग, आरोग्य सेवा आणि लैंगिक संवेदनशीलता सुधारण्यासह मुलींच्या सबलीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. मुलींचं सबलीकरण आणि त्यांना प्रतिष्ठापूर्वक जीवन जगण्यासाठी, त्यांना संधी प्राप्त करून देण्याकरता काम करत असलेल्या सर्वांचं विशेष कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त औरंगाबादमधे मुख्य टपाल कार्यालयात एक जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान `सुकन्या समृध्दी` योजनेत खातं उघडलेल्या पालकांचा आज सम्मान करण्यात आला. टपाल कार्यालयाचे अधिकारी सिवानागराजू, सुनिल कोळी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

****

कोरोना विषाणू संसर्ग काळात नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अंडी तसंच कोंबडीचं निर्धास्तपणे सेवन करावं असं पशुसंवर्धन आणि मत्स्य विकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. या दोन्हींमध्ये प्रथिनांचा मोठा स्त्रोत असून ती खाल्ल्यामुळे `बर्ड फ्ल्यू` होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. विदर्भ कुकुट पालन संघटना आणि पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे या संदर्भात आयोजित महोत्सवात ते आज बोलत होते. पशुसंवर्धन विभाग `बर्ड फ्ल्यू`वर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, समाजमाध्यमांवर मात्र अफवा पसरवल्या जात असून त्या या संसर्गापेक्षाही जास्त घातक असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं. कुक्कुटपालन हा ग्रामीण भागात केला जाणारा व्यवसाय असून, अशा प्रकारांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला सर्वाधिक फटका बसत आहे. आता हा व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे, असंही केदार यावेळी म्हणाले.

****

देशभरात उद्या राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. देशातला मतदार सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक करणं हा यावर्षीच्या मतदार दिनाचा विषय आहे.

****

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- `इफ्फी` चा समारोप सोहळा प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या उपस्थीतीत आज गोव्यात होत आहे. या कार्यक्रमात विश्वजीत चॅटर्जी यांना `पर्सनॅलिटी ऑफ द इ` या पुरस्कारान सन्मानित करण्यात आलं असून सुवर्ण, मयूर आणि अन्य पुरस्कारांची घोषणा करण्यात ये आहे. समारोप समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वन आणि पर्यारवणमंत्री बाबुल सुप्रितो आदी मान्यवर सहभागी झाले आहेत.

****

नीती आयोगाच्या नाविन्यपूर्ण निर्देशांकामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आलं असल्याची माहिती माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. निती आयोगानं नुकतीच याची घोषणा केली. कौशल्य विकासासाठी राबवलेले विविध उपक्रम, नव उद्योगांना दिलेली चालना, वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम तसंच संकल्पनांचा विकास आदींसाठीच्या या क्रमवारीमध्ये राज्यानं तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली असल्याची माहितीही मंत्री मलिक यांनी यावेळी दिली.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीन दिला जाणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार सामाजिक कार्यकत्या संध्या बारगजे आणि बेबीसुरेखा शिंदे यांना तर कै. नरहर कुरुंदकर पुरस्कार ज्येष्ठ लेखक डॉ. सुरेश सावंत आणि कवयित्री आशा पैठणे यांना जाहीर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी २०१९-२०२० या वर्षांसाठीच्या पुरस्कारांची आज घोषणा केली.  नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अत्युच्च योगदान असणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्कारा सन्मानित करण्यात येतं. परवा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला हे पुरस्कार संमारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.

****

२०२१ च्या जनगणनेत इतर मागासवर्ग प्रवर्गची जातनिहाय जनगणना करावी, इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी जालना इथं आज मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात आंदोलक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. अंबड चौफुली परिसरात मोर्चाच्या समारोप प्रसंगी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. इतर मागासवर्ग प्रवर्ग समाजाचा कार्यकर्ता म्हणून आपण या मोर्चात सहभागी झालो असल्याचंही वडेट्टीवर यावेळी म्हणाले.

****

परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळ सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मान्यता दिली जाईल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी दिली आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परभणीकर संघर्ष समितीच्यावतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधतांना मलिक बोलत होते. हे सरकार परभणीचा प्रस्ताव तातडीनं मंजुर करेल, आणि त्यापाठोपाठ चंद्रपूर तसंच नाशीकचा सुध्दा प्रस्ताव मान्य केला जाईल, असंही मलीक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

 

No comments: