Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३० जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
** राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
** आर्थिक
सर्वेक्षण अहवाल सादर; आगामी वर्षात विकास
दर ११ टक्के राहण्याची शक्यता
** ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं आजपासूनचं नियोजित आंदोलन स्थगित
** उच्च
शिक्षण संस्था तसंच महाविद्यालयं
प्रत्यक्ष सुरु करण्याची सर्व कुलगुरूंची मागणी
** शक्ती कायद्यांतर्गत प्रकरणांच्या
जलद सुनावणीसाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र न्यायालयं स्थापन करणार - गृहमंत्री
अनिल देशमुख
** राज्याचा कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के; मराठवाड्यात नव्या २१४ रुग्णांची नोंद
आणि
** विकेल ते पिकेल
धोरणानुसार नांदेड इथल्या रयत
बाजारात सुमारे २५ लाख रुपयांची उलाढाल
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. प्रारंभी राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांच्या
संयुक्त बैठकीपुढं अभिभाषण केलं. राज्य घटनेनं आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
अधिकार दिला आहे, मात्र तितक्याच गांभिर्यानं आपण कायद्याचं पालन करणंही घटनेला
अपेक्षित आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या
भाषणात सांगितलं. अलिकडेच दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणं, ही दुर्दैवी घटना असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना जास्त
अधिकार आणि ताकद देण्यासाठी तीन कृषी कायदे संसदेनं गेल्या अधिवेशनात मंजूर केले.
कृषी क्षेत्रातल्या या सुधारणांचा लाभ दहा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होऊ लागला
आहे. हे लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी या सुधारणांना पूर्ण पाठिंबा दिला आहे.
या कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा
जो काही निर्णय असेल, त्याचा
सरकार आदरच करेल, असं
ते म्हणाले. कृषी क्षेत्राबाबत एम एस स्वामिनाथन समितींच्या शिफारशींची अंमलबजावणी
आणि इतर अनेक पावलं देशातल्या शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार उचलत आहे, असं राष्ट्रपतींनी सांगितलं.
कोविड १९ ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी
सरकारनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अशा संकट काळातही भारत
जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे, असं ते म्हणाले. देशाच्या हितरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे.
गलवान खोऱ्यातल्या घटनेचा निर्देश करुन त्यांनी सांगितलं की, भारताची सार्वभौमता जपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर
अतिरिक्त बळ तैनात केलं आहे. देशाच्या या प्रगतीच्या प्रवासात महिलांचा सहभाग वाढत
असून, त्यादृष्टीनंही सरकारनं
अनेक निर्णय घेतले आहेत, असं
कोविंद म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर उभारणीला
सुरुवात झाली आहे. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ सुरु
होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पार्टी, डावे आणि इतर पक्षांनी कृषी कायद्यांच्या निषेधार्थ
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला होता.
या अधिवेशनात येत्या सोमवारी केंद्रीय
अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी काल
लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक
सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन- जीडीपीचा विकास दर, ११ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये
सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेचा विकास दर सुधारण्याचे संकेत देण्यात
आले आहेत. निर्यात आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेची घसरण थांबण्यास
मदत होणार असल्याचं,
या सर्वेक्षणात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपीचा विकास दर सात पूर्णांक सात
दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. येत्या आर्थिक वर्षात विकास दर १५ पूर्णांक चार शतांश टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा प्राथमिक अंदाजही या
सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू साथीनंतर भारतीय
अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असल्याची सविस्तर माहिती सर्वेक्षणात देण्यात
आली असून, देशात सुरू करण्यात आलेली लसीकरणाची
मोहिम, ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचं एक
महत्त्वाचं कारण आहे, असं
या सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आलं आहे. जीडीपीचा विकास दर वाढवण्यात कृषी
क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र कोविड संकटामुळे सेवा, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात मोठी घट झाल्याचं सर्वेक्षणात
म्हटलं आहे.
****
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आजपासूनचं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा
हजारे यांनी घेतला आहे. काल त्यांनी पत्रकार परीषदेत याबाबत घोषणा केली.
नव्या कृषी कायद्यांविरोधात तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाला
स्वायत्ता यासह अन्य मागण्यांसाठी समाजसेवक हजारे यांनी
आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांनी केलेल्या विविध मागण्यांवर
निर्णय घेण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली
असून, या समितीमध्ये हजारे यांना
निमंत्रित सदस्य म्हणून विशेष स्थान दिलं जाणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये ही
समिती निर्णय घेऊन कार्यवाही करणार आहे. याबरोबरच लोकपाल आणि लोकायुक्त तसंच
निवडणुक पद्धतींमध्ये सुचवलेल्या सुधारणांबाबत केलेल्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली असून, त्या मागण्याही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत. केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनांवर आपण समाधानी असल्याचं हजारे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या सर्व उच्च शिक्षण संस्था तसंच महाविद्यालयातले प्रत्यक्ष वर्ग त्वरित सुरु करण्याची, आणि
विद्यापीठातली संवैधानिक
पदं भरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी, राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी,
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली. कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची, काल
दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे बैठक घेतली. शासनानं
विद्यापीठांना संवैधानिक
पदं भरण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण
विभागाला केली. विद्यार्थ्यांची वसतीगृहं सुरु करण्याबाबत देखील लवकर निर्णय घ्यावा असंही राज्यपालांनी सांगितलं. बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता
उपस्थित होते.
****
दिल्लीत इस्त्रायलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटानंतर उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश
उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील जनतेनंही सतर्क राहून आपल्या आजुबाजूला
संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
शक्ती कायद्यांतर्गत प्रकरणांच्या
जलद सुनावणीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यात ३६ न्यायालयं स्थापन करणार असल्याचं, गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं शक्ती कायद्यासंदर्भात झालेल्या
बैठकीत बोलत होते. या न्यायालयांमध्ये या कायद्याशी निगडित प्रकरणांची जलद सुनावणी
होऊन ४५ दिवसांत निकाल लागेल, असं देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या हस्ते काल औरंगाबाद पोलिस
आयुक्तालयाच्या कमांड कंट्रोल सेंटर, ज्येष्ठ नागरिक मदत कक्ष आणि एसएसएमएस क्यू आर
स्कॅन प्रणालीचा शुभारंभ झाला, मुंबईच्या धर्तीवर सेल्फ बॅलन्सिंग स्कूटर प्रकल्प औरंगाबादेतही
लवकरच राबवण्यात यावा, त्यादृष्टीनं कार्यवाहीच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. गृह
विभागामार्फत पोलिसांसाठी घरे उभारण्याबाबतही विविध प्रस्ताव आणि पर्यांयावर विचार
सुरू असल्याचंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची
आज ७३ पुण्यतिथी. हा दिवस देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. दिल्लीतल्या
राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधास्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ७१वा भाग असेल. आकाशवाणी आणि
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर तसंच तुळजापूर शहराच्या विकासासाठी नागरिकांनी ई-मेलद्वारे सूचना पाठण्याचं आवाहन आमदार राणाजगजितसिंह
पाटील यांनी केलं आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात आमदार पाटील यांनी काल वार्ताहर परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तुळजापूर
इथं अद्ययावत नाट्यग्रह, क्रीडा संकुल तसंच उद्यानं विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तुळजापूर -उस्मानाबाद-
सोलापूर या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेण्याची मागणीही
त्यांनी यावेळी केली.
****
दुचाकी चालवतांना स्वत:च्या सुरक्षेसाठी
नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असं आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केलं
आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या हेल्मेट सेल्फी पॉईंट संकल्पनेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. वाहतुकीच्या इतर आवश्यक नियमांबाबत कामत यांनी मार्गदर्शन केलं.
****
राज्यात काल
२ हजार ६१३ रुग्ण कोरोना विषाणू
संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २५ हजार ८०० रुग्ण या संसर्गातून बरे झाले
असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के झाला आहे. काल राज्यभरात २ हजार ७७१ नव्या बधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातल्या बाधितांची एकूण संख्या २० लाख २१ हजार १८४ झाली आहे. राज्यात काल ५६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५१ हजार झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा
आहे. राज्यात सध्या ४३ हजार १४७ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल चार कोविडबाधितांचा
मृत्यू झाला, तर नव्या २१४ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या दोन,
तर नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात काल ४७ रुग्ण
आढळले. बीड आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी ४३, औरंगाबाद जिल्ह्यात ३२, लातूर २५, उस्मानाबाद
१७, परभणी पाच, तर हिंगोली जिल्ह्यात काल दोन नवे रुग्ण आढळले.
****
वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्वांनी कोविड संसर्ग
प्रतिबंधक लस टोचून घेण्याचं आवाहन औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर
नीता पाडळकर यांनी केलं आहे. ही लस सुरक्षित असल्याचं सांगताना त्या म्हणाल्या…
आपण आतापर्यंत जवळजवळ ४७०० लोकांच लसीकरण शहरात केलं आहे. मी देखील
ही लस घेतलेली आहे. लस पुर्ण सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. प्रथम
फेज मध्ये सगळे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्सच सुरु आहे. जे कोणी आहेत राहीलेत त्यांनी
लवकर येऊन लसीकरण पुर्ण करुन घ्या. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्सच आपण करणार आहोत सेकंड
फेज मध्ये आणि थर्ड फेज मध्ये जे नागरिक आहेत पन्नासच्या वरचे त्यांच लसीकरण करणार
आहोत.
****
लातूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एटीएम मोबाईल कॅश व्हॅन
सेवा सुरू करत असून यासाठी बँकेनं दोन
फिरत्या व्हॅन खरेदी केल्या आहेत. या व्हॅन लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी दिली. बँकेची शाखा नसलेल्या गावांना प्रामुख्यानं या एटीएम
मोबाईल कॅश व्हॅन सेवेचा उपयोग होईल, असं ते म्हणाले.
****
कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या धोरणानुसार नांदेड शहरात भरवलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा काल माजी मंत्री डी पी सावंत, आमदार
मोहनराव हंबर्डे आणि कृषी
मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या रयत बाजारात २० ते २५ लाख रुपयांची
उलाढाल झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी
दिली.
या बाजारातून आपल्याला चांगला भाव मिळाल्याची
भावना अर्धापूर तालुक्यातल्या मालेगावचे शेतकरी सतीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले…..
महाराष्ट्र शासनाच्या विकेल ते पिकेल शेतकरी ते थेट ग्राहक या
उपक्रमाअंतर्गत गेली चार दिवस आम्ही या उपक्रमात सहभागी आहोत. जनतेने जो आम्हाला प्रतिसाद
दिला. त्यामुळे आम्ही खरोखर शेतकरी भारावून गेलो आहोत. कारण यात दोन गोष्टी झाल्या
आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला. आणि ग्राहकांना विषमुक्त उत्पादन देण्यात आम्ही
यशस्वी ठरलो.
नांदेड तालुक्यातल्या वाडी बुद्रुकच्या महिला शेतकरी सविता
पावडे यांनी, वर्षातून दोन ते तीन वेळा असे उपक्रम राबवण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या……
मी एक शेतकरी उत्पादक म्हणून मला असे वाटते वर्षातून
फक्त एकदा असे पदर्शन न भरवता किमान दोन ते तीन वेळेस तरी व्हावे. या उपक्रमातून एक
नवा मार्ग मिळून नवीन कृषी व्यावसायिक तयार होतील. शेतीत नवं चैतन्य येईल यासाठी मी
ग्राहक, शासन, कृषी विभाग यांचे मनपूर्वक धन्यवाद.
****
लातूर शहरात गंजगोलाई परिसरातील एका
दुकानाला काल आग लागली. बांधकाम आणि शेतीशी संबंधित वस्तूच्या या दुकानाचं या आगीत मोठं नुकसानं झालं. आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलं
नाही.
****
प्रशासन आपल्या गावी या उपक्रमाचा
काल नांदेड जिल्ह्यात अर्धापूर महसूल मंडळात तसंच कंधार तालुक्यातल्या पांगरा महसूल
मंडळात प्रारंभ झाला. या उपक्रमाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर, तसंच जनावरांचं लसीकरण
शिबीर भरवण्यात यावं, जात तसंच उत्पन्न आदी प्रमाण पत्र, शिधापत्रिका, आधार कार्ड,
पॅन कार्ड तात्काळ तयार करून वाटप करावं, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी
यावेळी केल्या.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी
कायद्यातल्या किचकट तरतुदी आणि केंद्र शासनाच्या धरसोड धोरणाविरोधात काल परभणीत जीएसटी
भवनसमोर कर सल्लागार आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलन केलं. अनेक तरतुदीमुळे
हा कायदा किचकट ठरला आहे, एक सुटसुटीत आणि साधा कायदा यावा, अशी अपेक्षा होती, मात्र
ती फोल ठरल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कसबे तडवळे
इथल्या जिल्हा परिषद शाळेत प्रस्तावित असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरु करावं, या मागणीसाठी भीम सैनिकांच्या वतीनं काल लातूर-बार्शी
मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. १९४१ साली कसबे तडवळे इथं बाबासाहेब आंबेडकर यांनी
पहिली महार-मांग-वतनदार परिषद घेतली होती. या शाळेस शासनानं पर्यटन स्थळ आणि स्मारक
घोषित केलं असून, यासाठी ८५ लाख ३१ हजार इतका निधी मंजूर केला आहे. हा निधी वितरीत
करुन काम सुरु करण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी केली.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर
खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या एका निकालाविरोधात भारतीय स्त्री शक्तीच्या लातूर
शाखेनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. अल्पवयीन मुलीला विवस्त्र न करता, तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावणं म्हणजे लैंगिक शोषण
नाही असा निकाल नागपूर खंडपीठानं नुकताच दिला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालायात केलेल्या दाव्यासाठी ॲड. प्रतिमा एन. लाकरा
युक्तिवाद करतील अशी माहितीही संस्थेनं दिली आहे.
****
औरंगाबाद इथं ८ फेब्रुवारीला विभागीय
स्तरावरील लोकशाही दिन आणि विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
जिल्हास्तरावरील लोकशाही दिन कार्यक्रमात निराकरण
न झालेल्या किंवा तक्रारदाराचं समाधान न झालेल्या
प्रश्नांवर विभागीय लोकशाही दिनात सुनावणी घेण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment