Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 January
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** देशात बनवलेली कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस देशाच्या आत्मनिर्भरतेचं प्रतिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
**राज्यात पाच वर्षांत
एक लाख सूक्ष्म आणि लघूउद्योग प्रस्थापित करण्याचं उदिष्ट - उपमुख्यमंत्री अजित पवार
यांचं प्रतिपादन
**जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे
नवे २९ रुग्ण तर औरंगाबादमध्ये एका रुग्णाचा मृत्यू
आणि
**गझलकार इलाही जमादार यांचं निधन
****
देशात बनवलेली कोरोना विषाणू
संसर्ग प्रतिबंधक लस आज देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे तसंच देशाच्या आत्मसन्मानाचंही
प्रतिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या
`मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या
भागामध्ये देशवासियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. आता आपला लसीकरण कार्यक्रम
जगात एक उदाहरण ठरत आहे. आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक
वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती
निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली
असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी विविध उदाहरणं दिली. `माय गोव्ह` या
संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा
आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महिन्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी
दरम्यान रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात असल्याचं आणि देशात रस्ते सुरक्षेसाठी
सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी
सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी सूचनांचा उल्लेख केल्याबद्दल डॉक्टर मंत्री यांनी पंतप्रधानांचं
आभार मानलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या
‘मन की बात’ साठी मी रस्त्याची सुरक्षा एवंम ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ संबंधी मी काही
सूचना व स्लोगन पाठविले होते. आजच्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांनी रस्त्याच्या
सुरक्षेसंबंधी माझ्या सूचनांचे सर्व नागरिकांना आवाहन केले. त्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान
श्री नरेंद्र मोदीजी यांचे आभार एवंम धन्यवाद व्यक्त करतो. आज ‘मन की बात’ मध्ये माझ्या
सारख्या सामान्य नागरिकाच्या सूचनांचा उल्लेख करुन माननीय पंतप्रधानांनी मन की बातला
‘जन जन की बात’ करुन दाखवले. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. आणि मी त्यांना पुनश्च
एकदा धन्यवाद देतो.
****
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम
असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म आणि लघूउद्योग प्रस्थापित करण्याचं उदिष्ट असल्याचं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान इथं
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत 'माझा व्यवसाय, माझा हक्क' या उपक्रमाची
सुरुवात पवार यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलंत होते. या योजनेसाठी अर्थसंकल्पात
भरीव तरतुद करण्यात येईल, रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला
गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय
आढावा आणि समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक
व्यवसायांमध्ये युवकांना आणि युवतींना संधी मिळतील असं उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितलं.
****
नाशिक इथं २६ ते २८ मार्च दरम्यान होणाऱ्या
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाला ज्ञानपीठ विजेते कवी आणि साहित्यिक कुसुमाग्रज यांचं नाव देण्यात आलं आहे. संमेलन स्थळाला
कुसुमाग्रज नगरी असं संबोधलं जाणार आहे. आज नाशिक शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटी
इथं नाशिकचे पालकमंत्री तसंच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी आढावा
बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आपण नव्हे तर समस्त नाशिककर स्वागताध्यक्ष
असल्याचं समजून संमेलन यशस्वी करावं असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी संमेलनासाठी ५० लाख रुपयांचं अनुदान दिल्याबद्दल भुजबळ आणि आयोजक लोकहितवादी
मंडळानं मुख्यमंत्री ठाकरे
यांचं आभार मानलं आहे. संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि
घोषवाक्याचं प्रकाशनही आज करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात २९ नवीन
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १३ हजार ७४९
झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या २ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.
आजपर्यंत जिल्ह्यातले
१३ हजार १५९ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या बाधित असलेल्या २२३ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात या संसर्गानं झालेल्या एकूण मृतांची संख्या आता ३६७ झाली आहे.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शहरातल्या एन आठ इथल्या एका ६३ वर्षीय कोरोना विषाणू बाधित
महिलेचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या
आता एक हजार २३८ झाली आहे. जिल्ह्यातल्या एकूण कोराना बाधितांची संख्या ४६ हजार ९५५
झाली आहे.
****
औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचा आज राष्ट्रीय
महिला आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात
आला. त्यांनी कोरोना विषाणू संसर्ग काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल माहिती आणि
प्रसारण मंत्री प्रकाश जावेडकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
****
देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवण्यात
आली. औरंगाबाद महापालिकेतर्फे सिडको एन - आठ रुग्णालय इथं या मोहिमेचा प्रारंभ करण्यात
आला. आरोग्य उप संचालक डॉ. जी. एम. गायकवाड यावेळी प्रमुख उपस्थित होते. परभणी शहर महानगरपालिकेच्यावतीनं उपमहापौर भगवान वाघमारे, स्थायी
समितीचे सभापती गुलमीर खान आणि उपायुक्त प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते पोलिओची लस देत
या उपक्रमाचा प्रारंभ झाला. नांदेड तालुक्यात धनेगाव परिसरातल्या विटभट्टी कामगारांच्या
लहान बालकाला जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा
मंगाराणी आंबुलगेकर यांच्या हस्ते लस देऊन मोहिम सुरू करण्यात आली.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ या तालुक्यांतल्या
४० गावांमध्ये काल मध्यरात्रीच्या
सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता तीन पुर्णांक दोन रिश्टर स्केल होती. हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत, औंढा नागनाथ तालुक्यात मागील काही दिवसापासून भूगर्भातून
मोठा आवाज येत होता. दरम्यान,
काल मध्यरात्रीच्या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली नसल्याचं
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षानं म्हटलं आहे. या भागामध्ये तातडीनं पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर
करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.
****
मराठी गझलेला शिखरावर नेणारे सुप्रसिद्ध गझलकार
इलाही जमादार यांचं आज सांगलीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते.
सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव इथं जमादार यांचा १ मार्च १९४६ रोजी जन्म झाला झाला होता.
जमादार यांनी १९६४ पासून काव्यलेखन सुरू केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी कार्यक्रम
केले. मराठी, हिंदी, उर्दू आदी दैनिकं आणि मासिकांसाठी इलाही जमादार यांनी कविता आणि
गझल लिहिल्या. ते नवोदित कवींसाठी `इलाही गझल क्लिनिक` नावाची गझल कार्यशाळाही घ्यायचे.`वाचलेली
ऐकलेली माणसे गेली कुठे`, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे’ `घर वाळूचे बांधायाचे,
स्वप्न नसे हे दिवान्याचे` या त्यांच्या गझला चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरल्या.
****
कष्टकरी, शेतकरी आणि सत्ताधारी यांच्यात संवाद उरलेला
नसून याचं चित्रण निर्भीडपणे
साहित्यातून आलं पाहिजे, अशी अपेक्षा नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या सिंधी
या गावी आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
भगवान अंजनीकर यांनी आज
संमेलन उदघाटनावेळी व्यक्त केली. संमेलनाचे
उद्घाटन राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केलं. या साहित्य संमेलनात विरभद्र मिरेवाड यांच्या
"माती शाबूत राहावी म्हणून" या कविता संग्रहाचं तर माधव चुकेवाड यांच्या
गोडधोड या बालकाव्य संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं.
****
नवे
कृषी कायदे म्हणजे केंद्र सरकारनं शेतमाल बाजार सुधारणा आणि खुलीकरणाच्या दिशेनं टाकलेलं
पहिलं पाऊल असल्याचं शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी, ललित बहाळे, गुणवंत
हंगरगेकर, दिनेश शर्मा यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत सांगितलं. खासगी खरेदीदारावर
आधारभूत किंमतीनं शेतमाल खरेदी करण्याचं कायदेशीर बंधन घालण्याची तरतूद व्यवहारात निरुपयोगी
ठरत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. देशात यावर सुरू आंदोलकांनी याचा पुनर्विचार
करावा, असं ते म्हणाले.
//************//
No comments:
Post a Comment