Wednesday, 27 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

राज्यात अनेक ठिकाणी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या. कोविड प्रतिबंधाचे सर्व नियम पाळून आणि पालकांच्या संमतीपत्रानेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यातल्या अनेक शाळा आज सुरु झाल्या. शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचं थर्मलगननं तापमान तपासण्यात आलं, त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात एकाही शाळेमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत. शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तो अहवाल, पालकांचं संमतीपत्र, शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्याचं काम सुरु असून, लेखी परवानगीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत. आजपर्यंत एकाही शाळेचा प्रस्ताव परवानगीसाठी दाखल झाला नसल्याचं शिक्षणाधिकारी सोनटक्के यांनी सांगितलं.

वाशिम इथं कोरोना प्रतिबंधात्मक त्रिसूत्रीचं पालन करत विद्यार्थ्यांचं स्वागत पुष्प गुच्छ देऊन करण्यात आलं.

धुळे जिल्ह्यातल्या ५३३ शाळा आजपासून सुरु झाल्या. शाळांमध्ये वर्गात ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून देण्यात आली.

मुंबईत अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंदच राहतील, असे आदेश महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच दिले होते.

****

कोविड महामारीच्या जागतिक संकटाविरुद्धच्या लढ्यात भारतानं आता निर्णायक यश मिळवत, महत्वाचा टप्पा गाठला आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घट होत असल्याचं, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. तसंच या संसर्गानं होणाऱ्या मृत्यूंची संख्याही अतिशय कमी होत असून, काल देशात गेल्या आठ महिन्यातल्या सर्वात कमी, म्हणजेच १२० रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ५३ हजार ७२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात १२ हजार ६८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ३२० रुग्ण बरे झाले. देशातल्या एकूण कोविडबाधितांची संख्या एक कोटी सहा लाख ८९ हजार ५२७ झाली असून, आतापर्यंत एक कोटी तीन लाख ५९ हजार ३०५ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ७७ हजार २६६ रुग्णांवर उपचार सुरु असून, हे प्रमाण एकंदर रुग्णांच्या केवळ एक पूर्णांक ६६ शतांश टक्के इतकं आहे. काल पाच लाख ५० हजार ४२६ कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत १९ कोटी ३६ लाख १३ हजार १२० चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत २० लाख २९ हजाराहून अधिक नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आलं. काल प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये कमी वेळ लसीकरण सत्र चालवण्यात आलं.

****

पर्यावरण रक्षणाच्या दृष्टिकोनातून देशभरातल्या १५ वर्षांपेक्षा जुन्या खासगी गाड्यांवर आणि आठ वर्षांहून जुन्या अन्य प्रवासी गाड्यांवर यापुढील काळात स्वतंत्र हरित कर आकारला जाण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला केंद्रीय परिवहन मंत्रालयानं मान्यता दिली असून, आता पुढील चर्चेसाठी हा प्रस्ताव राज्य शासनांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती परिवहन विभागातील सूत्रांनी काल दिली. प्रदूषणाची वाढती पातळी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, या कराच्या माध्यमातून जमा होणारा निधी प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाय योजनांवरच खर्च केला जाणार आहे. 

****

२०२१ मध्ये भारताचा आर्थिक विकासाचा दर साडेअकरा टक्के राहील, असा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणे निधीनं व्यक्त केला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, दोन आकडी आर्थिक विकास दर गाठू शकणारा भारत, हा जगातला एकमेव देश ठरण्याची शक्यताही नाणेनिधीनं वर्तवली आहे. यामुळे जगात सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून जगात भारताची ओळख पुन्हा निर्माण होऊ शकते.

****

नांदेड - जम्मू तावी विशेष एक्सप्रेस २९ जानेवारीपासून सुरु होणार आहे. दर शुक्रवारी ही गाडी नांदेड इथून सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी सुटेल, आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, न्यू दिल्ली, जालंधर मार्गे जम्मू तावी इथं दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी जम्मू तावी इथून दर रविवारी सकाळी पाच वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि नांदेड इथं दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.

****

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोव्यात कोविड लसीकरणाबाबत चित्ररथातून जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी आज औरंगाबाद इथं लॉर्ड्स पॅराडाईज इथं एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे.

****

उद्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार पाच फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...