Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
January 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराबरोबरच नियम
-कायद्यांचं तेवढ्याच निष्ठेनं पालनं करण्याची नागरिकांकडून
अपेक्षा - राष्ट्रपती
रामनाथ कोविंद
** येत्या आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादनाचा विकास
दर ११ टक्के राहण्याची शक्यता
** येत्या १ फेब्रुवारीपासून
मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांचे निर्देश
आणि
** नाशिकच्या
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांचं अनुदान देण्याची राज्य
सरकारची घोषणा
****
आपली
राज्य घटना सर्व नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते, त्याचवेळी त्यांच्याकडून
नियम -कायद्यांचं तेवढ्याच निष्ठेनं पालनं करण्याची अपेक्षा करते, असं मत राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी दोन्ही सदनातील सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित
करतांना ते बोलत होते. अलिकडेच राष्ट्रध्वजाचा अपमान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनादराची
घडलेली घटना दुर्भाग्यपूर्ण असल्याचं ते म्हणाले. देशातील शेतकऱ्यांना अधिक अधिकार
देणे आणि त्यांना आणखी मजबूत करण्याच्या उद्देशानं गेल्या अधिवेशनात संसदेनं तीन कृषी
विषयक कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांच्या माध्यमातून शेती क्षेत्रात करण्यात आलेल्या
सुधारणांमुळे देशातील १० कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास सुरूवात झाली असल्याचं ते यावेळी
म्हणाले. शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी या कृषी
सुधारणांना पाठिंबा दिला आहे. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांच्या अंमलबजावणीला
स्थगिती दिली असून सरकार यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करील, असं राष्ट्रपती
म्हणाले. कोविड-१९ साथीपासून जनतेचं रक्षण
करण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रयत्नांचीही राष्ट्रपतींनी प्रशंसा
केली.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत २०२०-२१ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण सादर केलं. या आर्थिक सर्वेक्षणानुसार पुढील आर्थिक वर्षात सकल देशातंर्गत उत्पादन-
जीडीपीचा विकास दर ११ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली
आहे. यामध्ये सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेचा विकास दर सुधारण्याचे संकेत देण्यात आले आहेत. निर्यात आणि सरकारी खर्चात वाढ झाल्यानं अर्थव्यवस्थेची घसरण थांबण्यास मदत होणार असल्याचं या
सर्वेक्षणात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपीचा
विकास दर ७ पूर्णांक ७ दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे. येत्या
आर्थिक वर्षात विकास दर १५ पूर्णांक ४ शतांश टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा प्राथमिक अंदाजही
या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू साथीनंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा
पूर्वपदावर येत असल्याची सविस्तर माहिती सर्वेक्षणात देण्यात
आली असून देशात सुरू करण्यात आलेली लसीकरणाची मोहिम ही अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, असं या सर्वेक्षणात
स्पष्ट करण्यात आलं आहे. जीडीपीचा विकास दर वाढवण्यात कृषी क्षेत्रानं महत्त्वाची भूमिका बजावली
आहे. मात्र कोविड संकटामुळे सेवा, उत्पादन
आणि बांधकाम क्षेत्रात मोठी घट झाल्याचं
सर्वेक्षणात म्हटलं आहे.
अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अधिक सक्रिय धोरण आखणं आणि त्यांची पूर्ण आर्थिक जबाबदारी घेऊन अंमलबजावणी करणं आवश्यक असल्याचं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.
राज्यसभेत
अर्थमंत्री आर्थिक सर्वेक्षण सादर करत असताना कॉंग्रेस, डावे पक्ष आणि द्रमुक पक्षाच्या सदस्यांनी तीन कृषी
कायद्यास विरोध करत आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याची
मागणी केली.
तत्पूर्वी
लोकसभे पाठोपाठ राज्यसभेतही आजी- माजी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
करण्यात आलं.
****
येत्या
१ फेब्रुवारीपासून मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य
प्रवाशांसाठी सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले
आहेत. प्रवाशांची गर्दी होणार नाही
यापद्धतीनं वेळेचं नियोजन करावं. यासाठी मुंबई आणि उपनगरातील
विविध कार्यालयं तसंच आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये
सुधारणा करावी. असं आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागानं दिलेल्या
प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ आणि
दुपारी चार ते रात्री नऊ
या वेळेत प्रवास करता येणार
नसल्याचंही या पत्रकात म्हंटलं आहे.
मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातली दुकानं आणि आस्थापना रात्री ११
वाजेपर्यंत तर उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देशही
प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
****
नाशिक इथं होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख
रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी केली आहे. दरवर्षी डिसेंबर- जानेवारीत होणारं हे
संमेलन २६ मार्चपासून सुरू होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विज्ञान
लेखक जयंत नारळीकर यांची एकमतानं निवड झाली आहे. हे साहित्य संमेलन आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन पार पाडले जाईल तसंच या संमेलनामुळे मराठी साहित्य विश्वात परत एकदा उत्साहाचं वातावरण निर्माण होईल अशी आशाही
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं बांबर्डे इथलं
मायरिस्टीका स्वम्प्स हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. बांबर्डे गावात जवळपास अडीच हेक्टर क्षेत्रात मायरिस्टीका या दुर्मिळ
प्रजातीचे वृक्ष असून स्थानिक लोक या वृक्ष प्रजातीला देवराई
संबोधतात. मायरिस्टीका स्वम्प्स या प्रजातीकरिता जैविक वारसा क्षेत्र घोषित करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. राज्य सरकारनं याआधी ग्लोरी अल्लापली, लांडोरखोरी जळगाव आणि
गणेशखिंड पुणे हे क्षेत्र जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. जैविक
विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित होणारं हे राज्यातलं चौथं स्थळ आहे.
****
अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या
नागपूर खंडपीठानं दिलेल्या निर्णयाचा लातूर इथल्या भारतीय स्त्री
शक्तीच्या शाखेच्यावतीनं निषेध करण्यात आला अशी माहिती लातूर शाखेच्या अध्यक्षा
अर्चना सोमाणी, यांनी दिली. या निर्णयाच्या विरोधात संघटनेनं
सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात
पहिल्यांदाच खरसुंडी सिद्धनाथ यात्रा भरवण्यात आली. जनावरांच्या या यात्रेला
प्रशासनानं परवानगी दिल्यामुळे खिलार पशुधन घेऊन शेतकरी या यात्रेत सहभागी झाले
होते. सांगली, सातारा, सोलापूर बरोबरच कर्नाटक,
आंध्रप्रदेश, गुजरात या राज्यातूनही मोठ्या
संख्येनं व्यापारी यात्रेसाठी आले होते. दोन हजारांपेक्षा जास्त जनावरं बाजारात विक्रीसाठी आली
होती.
****
औरंगाबाद इथं ८ फेब्रुवारीला विभागीय स्तरावरील लोकशाही दिन आणि विभागीय महिला
लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हास्तरावरील
लोकशाही दिन कार्यक्रमात ज्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकली
नाही किंवा ज्या प्रश्नाबाबत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रारदाराचं समाधान झालं नाही असे सर्व प्रश्न विभागीय
स्तरावरील लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार असल्याचं विभागीय आयुक्त कार्यालयानं
जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे. तक्रारदारानं अर्जाच्या दोन प्रती विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा कराव्यात. तसंच विभागीय महिला लोकशाही दिनासाठी पिडीत महिलांनी विहीत नमुन्यातील मुदत
पुर्व अर्ज विभागीय उपायुक्त, महिला
आणि बाल विकास कार्यालयात सादर कराव्यात, असं या पत्रकात म्हटलं आहे.
****
धुळे जिल्ह्यातल्या बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविषयी आलेल्या तक्रारींचा
महिनाभरात निपटारा करावा असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. यासंदर्भात घेण्यात आलेल्या एका बैठकीत ते बोलत होते. केलेल्या कारवाईचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देशही त्यांनी
यावेळी दिले. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली.
****
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे
आयोजन करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातल्या गोविंदलाल कन्हैयालाल जोशी वाणिज्य
महाविद्यालयात दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काव्यसंध्या हा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नाशिकच्या प्राध्यापिका डॉ. प्रतिभा जाधव
यांनी कविता आणि एकपात्री सादरीकरण केलं.
सोलापूर जिल्ह्यात हत्तरसंग कुडल इथं सोलापूर सामाजिक संस्थेच्या वतीनं मराठी
भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कुडल
तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळाच्या विकासाची चर्चा करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment