Wednesday, 27 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ जानेवारी २०२१ सकाळी ११.०० वाजता

****

दिल्लीत काल शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल रात्री तातडीची बैठक घेऊन, परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून, शांतता राखावी असं आवाहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी केल आहे. काल झालेल्या हिंसाचारात दिल्लीतल्या सार्वजनिक मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर केलेल्या हिंसक हल्ल्यात ८६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी कालच्या हिंसाचारादरम्यान, कायद्याचं उल्लंघन करणं, दंगे भडकावणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं आणि हत्त्यारांचा उपयोग करून सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, या कलमांखाली सुमारे २४ गुन्हे दाखल केले आहेत. ट्रॅक्टर रॅली संदर्भात शेतकरी संघटना आणि पोलीस यांच्यात झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्याचा मार्ग आणि वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र अटींच पालन न करता शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला असल्याचंही, पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री अमरेंद्र सिंह यांनी दिल्लीतल्या हिंसाचाराची निंदा केली असून, काही समाजविरोधी शक्तींचा या हिंसाचारामागे हात असल्याचं म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीतून बाहेर पडून आपल्या मूळ आंदोलन ठिकाणी दिल्लीच्या सीमेवर जावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातल्या वाठोडा गावात घरगुती पाळीव कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूची लागण दिसून आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी इथला एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात भानखेड इथंही कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. बाधित क्षेत्रापासून दहा किलोमीटरचा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून, या भागातल्या कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

****

राज्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार असून, प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लीटर पाणीपुरवठा करणार असल्याचं, राज्याचे पाणीपुरवठा तसंच स्वच्छता राज्यमंत्री, संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. काल लातूर जिल्ह्यात उदगीर इथं, जलजीवन अभियानाबाबत जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.

****

No comments: