Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त देशभर त्यांना अभिवादन करण्यात येत
आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येत आहे. दिल्लीतल्या राजघाट या महात्मा
गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. याठिकाणी राष्ट्रपती
रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह
मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
देशाच्या
स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं स्मरण करण्यासाठी, देशात दोन मिनिटं
मौन पाळण्यात आलं.
धुळे
इथं महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधी चौकात आज अखिल भारतीय समता परिषदेच्या
वतीनं गरजू दिव्यांग बांधवांना कपडे आणि शिव भोजन वाटप करण्यात आलं.
****
जम्मू
काश्मीर इथल्या पूलवामा जिल्ह्यातल्या लेलहार इथं हिजबूल मूजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या
दोन दहशतवाद्यांनी आज सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केलं. काल रात्री उशीरा सूरक्षा दलानं
केलेल्या नाकेबंदी दरम्यान हे दोन दहशतवादी अडकले होते. यावेळी झालेल्या चकमकीत एक
दहशतवादी जखमी झाला तर दोघांनी आत्मसमर्पण केलं. या दहशतवाद्यांकडून दोन एके -४७ रायफल
जप्त करण्यात आल्या आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
देशभरात काल १३ हजार ८३ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची
नोंद झाली, तर १३७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण कोविड बाधितांची
संख्या एक कोटी सात लाख ३१ हजार १३३ झाली असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख
५४ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल १४ हजार ८०८ रुग्ण बरे झाले. देशात
आतापर्यंत एक कोटी चार लाख नऊ हजार १६० रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या
एक लाख ६९ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ****
राज्यात काल ५३९ केंद्रांच्या माध्यमातून ४० हजार ५३९ आरोग्य
कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत दोन लाख ६१ हजार ३१९ कर्मचाऱ्यांना
लसीकरण झालं असल्याची माहिती, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सहा ठिकाणी को-वॅक्सीन लस देण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात राज्यात बीड जिल्हा आघाडीवर
असून, काल सर्वात जास्त ११३ टक्के लसीकरण झालं. आरोग्य मंत्र्यांनी बीड चे जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ आर बी पवार यांचं याबद्दल विशेष कौतुक केलं आहे.
****
मुंबई विद्यापीठ अंतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय
संगीत महाविद्यालय सुरु करण्यासाठी, अभ्यास समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती,
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त, शासनानं हे महाविद्यालय सुरु
करण्याचा निर्णय घेतला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या संकल्पनेतील या महाविद्यालयात,
भारतीय आणि पाश्चिमात्य शैलीतील शास्त्रीय, सुगम आणि इतर शैलीतील संगीत, विविध वाद्यांचा
अभ्यास, ध्वनिमुद्रण, संगीत निर्मिती करता यावं, यासाठी अत्याधुनिक सोयी आणि अद्यावत
अभ्यासक्रम तयार केले जाणार आहेत. याशिवाय भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या,
सात दशकांहून अधिक काळ चाललेल्या, सांगीतिक कारकीर्दीचा मागोवा घेणारं संग्रहालय, विविध
सांगीतिक कार्यक्रमांसाठी सभागृहे, वर्तुळाकार प्रेक्षागृहे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह,
संगीत प्रशिक्षणासाठी खुले रंगमंच, या संकल्पनेचा समावेश देखील, या संगीत महाविद्यालयात
करण्यात येणार आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १४३ पिडित महिलांना आणि त्यांच्यावर
अवलंबून असलेल्या ५९ अपत्यांना, जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी
कोविड-१९ अंतर्गत, २४ लाख ४० हजार रूपयांची रक्कम थेट बँक खात्यात, कोणत्याही कागदपत्राची
विचारणा न करता जमा करण्यात आली आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय,
जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणक पथक, तसंच जिल्हा रूग्णालयाच्या मदतीनं हे कार्य
करण्यात आलं.
****
नांदेड - बंगळूरु - नांदेड उत्सव विशेष गाडी आणि ओखा - रामेश्वर - ओखा उत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ
देण्यात आली आहे. बंगळूरु - नांदेड गाडीला ३१ मार्च पर्यंत, नांदेड - बंगळूरु
गाडीला एक एप्रिलपर्यंत, रामेश्वर - ओखा साप्ताहिक गाडीला २६ मार्च पर्यंत, तर ओखा
- रामेश्वार गाडीला ३० मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य
रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्यानं नाशिक
जिल्ह्यातले ११ कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर कोविड हेल्थ सेंटरच्या
खाटा कमी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी
घेतला आहे.
****///****
No comments:
Post a Comment