Sunday, 31 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2021

Time 1.00pm to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

देशात बनवलेली कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस आज देशाच्या आत्मनिर्भरतेची प्रतिक आहे तसंच देशाच्या आत्मसन्मानाचंही प्रतिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या ७३व्या भागामध्ये देशवासियांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातल्या आपल्या लढ्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झालं असून ज्याप्रमाणं, आपली ही लढाई एक उदाहरण म्हणून समोर आली, तसंच, आता आपला लसीकरण कार्यक्रम हा ही जगात एक उदाहरण ठरत आहे. आपण सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाबरोबरच जगात सर्वाधिक वेगानं आपल्या नागरिकांचं लसीकरणही करत आहोत. केवळ १५ दिवसांमध्ये, देशानं आपल्या ३० लाखांहून अधिक, ‘कोरोना योद्ध्यांचं’ लसीकरण केलं असून अमेरिकेसारख्या समृद्ध देशातही, या कामासाठी १८ दिवस लागले होते, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. कोरोना विषाणू संसर्गानं जी परिस्थिती निर्माण केली त्याचा सामना करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अशी विलक्षण कामं झाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करताना पंतप्रधानांनी यावेळी विविध उदाहरणं दिली. कृषी क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे विविध प्रयोग सुरू आहेत. हे प्रयोग नवोन्मेषाची उर्मी तर दर्शवतातच, पण त्याच बरोबर हे ही दाखवतात की आपल्या देशातलं कृषिक्षेत्र कसा नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहे. शेतीला आधुनिक बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि अनेक पावलं उचलत आहे. सरकारचे प्रयत्न यापुढेही असेच सुरू राहतील, असं पंतप्रधान म्हणाले. ‘माय गोव्ह’ या संकेतस्थळावर जालन्याचे डॉक्टर स्वप्नील मंत्री यांनी रस्ते सुरक्षे विषयी चर्चा करण्याचा आग्रह केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या महिन्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान रस्ते सुरक्षा महिना साजरा केला जात असल्याचं आणि देशात रस्ते सुरक्षेसाठी सरकारच्या बरोबरीनं वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर अनेक प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला जीव वाचवण्यासाठी असलेल्या या प्रयत्नांमध्ये आपल्याला सर्वांनाच आपलं सक्रिय योगदान दिलं पाहिजे, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. ‘फास्टॅग’ च्या उपयुक्ततेची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचा समारंभ- अमृतमहोत्सव आपण सुरू करत आहोत. अशातच, आपल्या त्या महानायकांशी संबंधित स्थानिक स्थळांचा शोध घेण्याचा हा उत्कृष्ट काळ असल्याचं त्यांनी नमूद केलं. खासकरून युवक मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल, स्वातंत्र्याशी संबंधित घटनांबद्दल लिहावं. आपल्या भागातल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातल्या वीरगाथांबद्दल पुस्तक लिहावं, असं पंतप्रधानांनी सुचवलं. या महिन्यात, क्रिकेटच्या मैदानातूनही खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट संघानं सुरूवातीच्या अडचणींनंतर, शानदार पुनरागमन करत, ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली. आपल्या खेळाडुंची कठोर मेहनत आणि सांघिक वृत्ती ही प्रेरित करणारी असल्याची प्रशंसा पंतप्रधानांनी केली. हे सर्व घडत असताना, दिल्लीत, २६ जानेवारीला तिरंग्याचा अपमान झालेला पाहून, देश, अत्यंत व्यथित झाल्याचं ते म्हणाले. आपल्याला आगामी काळ हा नवीन आशा आणि नाविन्यानं भरून टाकायचा आहे. गेल्या वर्षी आपण असामान्य संयम आणि धाडसाचं प्रदर्शन घडवलं होतं. यावर्षीही आपल्याला कठोर मेहनत करून आपल्या संकल्पांची पूर्तता करायची आहे. आपल्या देशाला आणखी वेगानं पुढं न्यायचं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

****

देशभरातली चित्रपटगृहं फेब्रुवारी महिन्यापासून पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून चित्रपटांच्या तिकिटांच्या ‘ऑनलाईन’ नोंदणीस प्रोत्साहन द्यावं असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. चित्रपटात दोन मध्यांतर असावेत, तसंच कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या निकषांचं पालन करणं आवश्यक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.

****

नाशिक इथं होणाऱ्या नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि घोषवाक्याचं प्रकाशन आज नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आलं आहे. यासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेसाठी ५६ जणांनी पाठवलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्यातून कोल्हापूर इथल्या अनंत गोपाळ खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली.

****

देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. सोलापूर, रायगड, वाशिम, नाशिक, जिल्ह्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांना पोलिओचे डोस दिले जात आहेत.  

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...