Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
३१ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
सुधारित कृषी कायदे स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव कायम; पंतप्रधानांचं
प्रतिपादन.
·
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार.
·
आज पोलिओ रविवार; शून्य ते पाच वर्षाच्या बालकांसाठी पोलिओ
लसीकरण अभियान.
·
राज्यात ९५ पूर्णांक २३ शतांश टक्के रुग्ण कोविडमुक्त; मराठवाड्यात
नव्या १७३ रुग्णांची नोंद.
·
पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला प्राधान्य देणार - उपमुख्यमंत्री
अजित पवार.
·
मराठवाडा वॉटरग्रीड योजनेला स्थगिती देऊ नये - माजी पाणीपुरवठा
मंत्री बबनराव लोणीकर यांची मागणी.
आणि
·
जालना जिल्ह्यात महिला सरपंच पदासाठी उद्याची नियोजित आरक्षण
सोडत लांबणीवर.
****
सुधारित
कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव
अजूनही कायम असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. कृषी कायद्यांसंदर्भात
आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत, त्यासाठी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांना फक्त
एक फोन करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. प्रजासत्ताक दिनी झालेल्या दुर्दैवी
घटनांबाबत कायदा आपलं काम करेल, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. विविध पक्षांनी उपस्थित
केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे, मात्र त्यासाठी सदनाचं कामकाज सुरळीत
चालण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय
आल्यानं, छोट्या पक्षांना आपली मतं मांडता येत नसल्याकडे त्यांनी या बैठकीत लक्ष वेधलं.
गांधीजींची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी
यावेळी केलं.
****
उपराष्ट्रपती
तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज राज्यसभेतल्या सभागृह नेत्यांची
बैठक बोलावली आहे. उपराष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच
संबंधीत विधेयकं आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद
जोशी यांनी काल ही माहिती दिली. यापैकी चार विधेयकं अध्यादेशांना कायदेशीर रुप देण्यासाठी
असतील, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्प उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता लोकसभेत
सादर होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत
चालणार असून, दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान होणार आहे.
****
या
अर्थसंकल्पात आरोग्य सेवांसाठीच्या तरतुदीत वाढ करावी, अशी अपेक्षा मुंबईतील कूपर रुग्णालयातल्या
भूलतज्ज्ञ डॉ. नयना दळवी यांनी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या –
कमीत कमी तीन ते चार टक्के
एवढा भागतरी हेल्थ केअर सेक्टरला देण्यात यावा. वाढत्या लोकसंख्येकरता वैद्यकीय महाविद्यालये
आणि सर्वसाधारण रुग्णालये यांची संख्या वाढवण्यात आली पाहिजे. जीवनावश्यक वैद्यकीय
उपकरणांना जीएसटी मधून सुट मिळावी. आयुष्यमान भारत सारख्या विमा योजना तळागळातल्या
जन सामान्यांपर्यंत पोहचल्या पाहिजेत जेणेकरुन प्रत्येक नागरिकासाठी वैद्यकीय सेवा
सहज उपलब्ध होईल. आरोग्य विमा योजनेला प्रोत्साहन देण्याकरता त्याची मर्यादा वाढवली
पाहिजे. त्याचप्रमाणे मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन मिळाल्यास प्रायव्हेट हॉस्पिटल्स
आपलं योगदान व्यवस्थितरित्या देऊ शकतील.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभर त्यांना अभिवादन करण्यात
आलं. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. मुंबईत राजभवनात राज्यपाल भगत सिंह
कोश्यारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी
महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
गांधीजींच्या
पुण्यतिथीच्या अनुषंगानं औरंगाबाद इथं, काँग्रेस सेवादलाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाच्या
समर्थनार्थ, एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
या उपोषणात सहभागी झाले. मराठवाड्यात सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयं तसंच शैक्षणिक संस्थांमधून
गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
****
आज
पोलिओ रविवार. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांना आज पोलिओ डोस दिला जाणार
आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल राष्ट्रपती भवनात काही बालकांना पोलिओ
लसीचे डोस देऊन या मोहिमेचा प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात आला. देशाच्या प्रथम महिला
सविता कोविंद, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार
चौबे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पोलिओ लसीकरण मोहीम आधी १७ जानेवारीला
राबवली जाणार होती, मात्र १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यानं, आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरण
मोहीम दोन आठवडे उशीरा घेण्याचा निर्णय घेतला.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं या पल्स पोलिओ लसीकरणासाठी सुक्ष्म नियोजन केलं आहे.
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातल्या एक लाख ९८ हजार २३९ बालकांना पोलिओ डोस दिला जाणार
असल्याचं अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी सांगितलं. ते म्हणाले –
एकूण ६७८ पल्स पोलिओ बुथ
ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुन्य ते पाच
वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजवले जाणार आहेत. यापूर्वी कितीही डोस पाजले
किंवा बाळ नुकतेच जन्माला आले असले किंवा बाळ किरकोळ आजारी असेल तरीही पोलिओ डोस देणं
गरजेचं आहे. जी मुले ३१ जानेवरी २०२१ रोजी पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहतील त्यांना
पुढील पाच दिवस गृह भेटीद्वारे पोलिओ डोस पाजवण्यात येणार आहेत.
लातूर
जिल्ह्यात २ लाख ७७ हजार २२० बालकांना पोलिओ डोस दिले जाणार आहेत. ही मोहीम १००% यशस्वी
करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राज्यात
काल १ हजार ५३५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख
२७ हजार ३३५ रुग्ण या संसर्गातून बरे झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक २३
शतांश टक्के झाला आहे. काल राज्यभरात २ हजार ६३० नव्या बधितांची नोंद झाली, त्यामुळे
राज्यातल्या बाधितांची एकूण संख्या २० लाख २३ हजार ८१४ झाली आहे. राज्यात काल ४२ रुग्णांचा
या संसर्गानं मृत्यू झाला. या आजारामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ५१ हजार
४२ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के एवढा आहे. राज्यात सध्या ४४ हजार
१९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात
काल औरंगाबाद आणि नांदेड इथं प्रत्येकी एका कोविडबाधितांचा मृत्यू झाला, तर विभागात
नव्या १७३ रुग्णांची नोंद झाली.
नांदेड
जिल्ह्यात काल ३९ रुग्ण आढळले. लातूर ३८, जालना ३२, औरंगाबाद ३०, बीड २६, हिंगोली पाच,
तर परभणी जिल्ह्यात काल तीन नवे रुग्ण आढळले.
****
राज्यात
पर्यावरणपूरक सौर ऊर्जेला प्राधान्य देणार असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
म्हटलं आहे. ते काल अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं विद्युत रोहित्राच्या लोकार्पण कार्यक्रमात
बोलत होते. सौर उर्जेमुळे हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही, तसंच
शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याचं पवार म्हणाले. यावेळी उर्जा राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तनपुरे यांनी यावेळी केलेल्या
भाषणात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना
महामंडळाकडून भाडे अदा करण्यात येणार असल्याची माहिती दिली. शेती पंपाच्या थकित देयकावरील
दंड माफ करुन, व्याजात सवलत देण्यात आली असल्यानं वीज देयक भरण्याचं आवाहन त्यांनी
शेतकऱ्यांना केलं.
****
मराठवाड्याची
एकात्मिक पाणी पुरवठा योजना - वॉटरग्रीडला स्थगिती न देण्याची मागणी माजी पाणीपुरवठा
मंत्री बबनराव लोणीकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केली आहे. मराठवाड्याचे
सर्व जिल्हे आणि तालुक्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य दूर होऊन, सर्वांना मुबलक पाणी मिळावं,
यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मंजूर केली होती. ही योजना
तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही अशा वल्गना विद्यमान महाविकास आघाडी सरकार करत आहे. मात्र,
कोणतीही शहानिशा न करता, फक्त राजकीय द्वेषापोटी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला
असल्याचं लोणीकर यांनी या निवेदनात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुने वैभव परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार
असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण
महोत्सवी वर्षानिमित्त तसंच प्राध्यापक वामन चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रिंट
मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत भरवण्यात आलं, या प्रदर्शनाच्या
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, यांच्यासह अनेक
मान्यवर उपस्थित होते. आमदार दानवे यांनी यावेळी बोलताना, महाविद्यालयाच्या रुपातला
ऐतिहासिक ठेवा पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त
केली.
****
जालना
जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी
उद्या एक फेब्रुवारीला नियोजित आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासकीय
कारणास्तव आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात येत असून, पुढील तारीख कळवण्यात येईल, असं उपजिल्हाधिकारी
अंकुश पिनाटे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील
कार्यालयात नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय
आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
****
मराठी
भाषेच्या जडणघडणीत संत साहित्याचं भरीव योगदान असल्याचं, संत साहित्याचे अभ्यासक डॉ.
विद्यासागर पाटंगणकर यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य
महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या, मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या समारोप
सत्रात ते ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंधलेखन स्पर्धेसह
कविता वाचन, सामान्य ज्ञान चाचणी या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात मनाठा इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत
शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, ज्योती कदम सुनेगावकर यांच्यावतीने शिक्षिका
आणि विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी त्यांनी कोविडपासून सावध राहण्यासाठी
सॅनिटायझर किंवा साबणानं हात धुणं, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत विद्यार्थ्यांना
मार्गदर्शन केलं.
****
मराठवाड्यात
आंतरराष्ट्रीय हवामान संशोधन केंद्र होण्याची गरज ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर
यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार
वितरण कार्यक्रमात ते काल बोलत होते. पत्रकार चंद्रसेन देशमुख, सतीश टोणगे, निळकंठ
कांबळे यांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे.
****
बीड
जिल्ह्यात केज इथल्या आदर्श पत्रकार समितीचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार अंबाजोगाई इथले
ज्येष्ठ पत्रकार विजय हमीने यांना जाहीर झाला आहे. हमीने यांनी गेल्या ४२ वर्षांच्या
बातमीदारीतून विविध प्रश्नांना वाचा फोडली असून, वेगवेगळे विषय बातमीच्या माध्यमातून
सर्वसामान्यांसमोर आणले आहेत.
दरम्यान,
मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई तालुका शाखेच्या अध्यक्षपदी गजानन मुडेगावकर यांची,
सचिवपदी विरेंद्र गुप्ता यांची तर कार्याध्यक्षपदी नागेश औताडे यांची निवड झाली आहे.
ही कार्यकारणी ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी, हनुमंत पोखरकर आणि एम एम कुलकर्णी यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्य करेल.
****
मराठवाडा
वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात
उदगीर इथं काल मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. नांदेड इथंही
या मागणीसाठी परिषदेच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली. यासंदर्भात विविध मागण्यांचं
निवेदन विभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
बीड
जिल्ह्यात माजलगाव परभणी मार्गावर दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच
ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल सायंकाळी सात वाजता हा अपघात घडला.
****
नामांकित
विडीच्या नावावर बनावट विडी विकणाऱ्या आरोपीला बुलडाणा जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या
पथकाने गोंदिया इथून अटक केली आहे. सुनील गुप्ता असं या आरोपीचं नाव असून, न्यायालयानं
त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण राज्यभरात ही बनावट विडी विकली
जात असल्याप्रकरणी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
परभणी
जिल्ह्यातल्या युवकांची कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी आमदार राहुल पाटील यांच्या
पुढाकारातून काल बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह बँकेचे व्यवस्थापक
आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्य क्षमतेनुसार त्याला
कुठलीही अट न लावता तत्काळ कर्ज देण्यात यावं, परभणी जिल्ह्यासाठी निर्धारित कर्जवाटपाचं
उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्याची सूचना यावेळी करण्यात आली. युवकांनी केलेले अर्ज, तसंच
बँकांनी केलेल्या कर्ज पुरवठ्याचा यावेळी आढावा घेण्यात आला.
****
No comments:
Post a Comment