Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 January
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय
खुले- पंतप्रधानांचं चर्चेचं आवाहन
** संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं
सादर होणार
** पोलिओ लसीकरण मोहिमेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ;
उद्या देशभरात लसीकरण अभियान
आणि
** औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुनं वैभव
परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत- जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
****
कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलकांशी चर्चेचे सर्व पर्याय खुले असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या
सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत कृषी मंत्र्यांनी
दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असून, त्यावर चर्चेचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. प्रजासत्ताक
दिनी झालेल्या दुर्दैवी घटनांबाबत कायदा आपलं काम करेल, असं पंतप्रधान म्हणाले. विविध
पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सदनात चर्चेला सरकार तयार आहे, मात्र त्यासाठी
सदनाचं कामकाज सुरळीत चालण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी व्यक्त केली. सदनाच्या कामकाजात
वारंवार व्यत्यय आल्यानं, छोट्या पक्षांना आपली मतं मांडता येत नसल्याकडे त्यांनी या
बैठकीत लक्ष वेधलं. गांधीजींची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेने सर्वांनी मार्गक्रमण
करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
उपराष्ट्रपती
तथा राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी उद्या राज्यसभेतल्या सभागृह नेत्यांची बैठक बोलावली आहे. उपराष्ट्रपती भवनात होणाऱ्या या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन तसंच संबंधीत विधेयकं,
आणि अन्य महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यंदा ३३ विधेयकं सादर होणार आहेत. संसदीय
कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली. यापैकी चार विधेयकं अध्यादेशांना
कायदेशीर रुप देण्यासाठी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. अर्थसंकल्प परवा सोमवारी
सकाळी ११ वाजता लोकसभेत सादर होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या अधिवेशनाचा पहिला
टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान होणार
आहे.
****
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम
उद्या देशभरात राबवली जाणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती
भवनात काही बालकांना पोलिओ लसीचे डोस देऊन या मोहिमेचं प्रतिकात्मक शुभारंभ करण्यात
आला. यावेळी देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद, केंद्रीय आरोग्य
मंत्री डॉ हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह अनेक
मान्यवर यावेळी उपस्थित होते. पोलिओ लसीकरण मोहीम आधी १७ जानेवारीला
राबवली जाणार होती, मात्र १६ जानेवारीला कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यानं, आरोग्य
आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ
लसीकरण मोहीम दोन आठवडे उशीरा घेण्याचा निर्णय घेतला. शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या
सर्व बालकांना उद्या पोलिओ लस देऊन या रोगाचं समूळ उच्चाटन करण्यात सहभागी होण्याचं
आवाहन सर्व देशवासियांना करण्यात येत आहे.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर त्यांना
अभिवादन करण्यात आलं. हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून पाळण्यात येतो. मुंबईत राजभवनात
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन
केलं.
विधिमंडळात पीठासीन अधिकारी तसंच सचिवालयातल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी गांधीजींच्या
स्मृतींना अभिवादन केलं. मंत्रालयाजवळच्या उद्यानातील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याला,
महात्मा गांधी स्मारक समितीतर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
महात्मा गांधी हे फक्त
व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार आहेत. हा विचार अमर असल्याचं उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे.
गांधीजींच्या पुण्यतिथीच्या
अनुषंगानं औरंगाबाद इथं, काँग्रेस सेवादलाच्या वतीनं शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ,
एक दिवसीय उपोषण करण्यात आलं. काँग्रेस सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, प्रदेश
सचिव अनिल मानकापे, यांच्यासह सेवादल पदाधिकारी आणि कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी
आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या
मालिकेचा हा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी
११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचं जुने वैभव
परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी दिली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तसंच प्राध्यापक वामन
चिंचोलकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रिंट मेकिंग कलावृत्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या
जुन्या इमारतीत भरवण्यात आलं, या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत
होते. यावेळी आमदार अंबादास दानवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध कारणामुळे
या ऐतिहासिक इमारतीची जीर्णावस्था झाली आहे. महाविद्यालयाच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार
असून त्यात नवीन सुविधाही पुरविण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
आमदार दानवे यांनी यावेळी बोलताना, महाविद्यालयाच्या
रुपातला ऐतिहासिक ठेवा पुन्हा उभारण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता
व्यक्त केली.
****
यवतमाळ
शहरातल्या रोहिलेबाबा झोपडपट्टी वस्तीत सिलेंडर चा स्फोट झाल्यानं लागलेल्या आगीत ४
घरं खाक झाली आहे. एका घरात चूल पेटविल्यानंतर सिलेंडरमध्ये गॅसची गळती होत असल्यानं
आगीचा भडका उडाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने
रौद्ररूप धारण केले. दरम्यान आगीची सूचना मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने
घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
****
जालना जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या
५० टक्के महिला राखीव सरपंच पदासाठी येत्या एक फेब्रुवारीला नियोजित आरक्षण सोडतीचा
कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात येत
असून, पुढील तारीख कळवण्यात येईल, असं उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितलं
आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातल्या आठही तहसील कार्यालयात नुकत्याच निवडणुका
झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात
आली.
****
नांदेड जिल्ह्यात आज नव्याने ३९ कोरोनाविषाणू बाधित रुग्ण
आढळून आले. जिल्ह्यात कोविड रुग्णांची एकूण संख्या आता २२ हजार ५०२ झाली आहे. दरम्यान
या संसर्गामुळे आज एका रूग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची
संख्या आता ५८६ झाली आहे. दरम्यान, संसर्गमुक्त झालेल्या ४० रुग्णांना आज रुग्णालयातून
सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण २१ हजार ३९४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या
जिल्ह्यात ३१९ रुग्ण उपचार घेत आहेत.
बीड जिल्ह्यातही आज नवे २६ रुग्ण आढळून आले. यामध्ये
बीड तालुक्यातल्या ९, गेवराई ४, आष्टी तसंच केज इथल्या प्रत्येकी २, अंबाजोगाई तसंच
शिरुर प्रत्येकी ३, तर परळी, माजलगाव, आणि धारूर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश
आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात मनाठा इथल्या जिल्हा
परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी, ज्योती कदम
सुनेगावकर यांच्यावतीने शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात आलं. यावेळी
त्यांनी कोविड पासून सावध राहण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाने हात धुणे, मास्क वापरणे,
आणि सुरक्षित अंतर राखण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं
****
१९७१ मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात मिळालेल्या विजयाला
यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं अहमदनगर इथं सैन्य दलाच्या छावणीत
एका विशेष समारंभात, या युद्धातले सैनिक तसंच वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला. यावेळी
अनेक निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी ७१च्या युद्धातले अनुभव कथन केले. वीरयोद्धे आणि त्यांनी
दाखवलेल्या शौर्याचं यावेळी स्मरण करण्यात आलं.
****
परभणीहून वसमतकडे भरधाव जाणाऱ्या कारचं टायर फुटल्याने ती
कार राहटी पुलावरून नदीत कोसळली, आज पहाटेच्या
सुमारास घडलेल्या या घटनेत कारमधील चालकासह अन्य एकजण सुरक्षित असल्याचं समजतं. आज सकाळी कारचा
शोध घेऊन ती पाण्याबाहेर काढण्यात आली.
****
नामांकित विडीच्या नावावर बनावट विडी
विकणाऱ्या आरोपीला बुलडाणा जिल्हा
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंदिया इथून
अटक केली आहे. सुनील गुप्ता असं या आरोपीचं
नाव असून, न्यायालयानं त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संपूर्ण राज्यभरात ही बनावट विडी विकली जात असल्याप्रकरणी संबंधित
कंपनीच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
//*************//
No comments:
Post a Comment