Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
January 2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
७२ व्या प्रजासत्ताक
दिनाच्या आमच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा
****
** ७२ वा प्रजासत्ताक दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा
** सर्व जिल्हा
मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
** कृषी कायद्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची जबाबदारी
केंद्र सरकारनं पार पाडली नाही - खासदार शरद पवार यांची टीका
आणि
** पुण्यातल्या येरवाडा कारागृहातून
तुरुंग पर्यटन सेवेला प्रारंभ
****
७२ वा प्रजासत्ताक
दिन मराठवाड्यात उत्साहात साजरा झाला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
औरंगाबाद इथं
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात देसाई
यांनी, औरंगाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सातत्यानं वाढवत नेऊन एक आघाडीवरचा
जिल्हा म्हणून स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं सांगितलं. जिल्ह्याच्या औद्योगिक
विकासाचा त्यांनी आढावा घेतला....
ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका
रशियन स्टील कंपनीला स्टील उत्पादनासाठी ४४ एकर जागेचे वाटप करण्यात आलेले आहे. या कंपनीत एक हजार कोटींची गुंतवणूक
होवून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. डीएमआयसी शेंद्रा येथे २०२० मध्ये
६२ एकरचे वीस भुखंड देखिल वाटण्यात आले आहेत.माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत
जे सामंज्यस्य करार करण्यात आले.त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात नवीन येणाऱ्या उद्योगांचा
देखिल समावेश आहे.
नांदेड इथं छत्रपती
शिवाजी महाराज पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण
झालं. यावेळी पथसंचलनाची पाहणी करुन, नागरिकांना शुभेच्छा देताना चव्हाण यांनी, नांदेड
शहर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली
राज्यातील नागपूर - मुंबई
समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावं यादृष्टीनं मी शासनाकडे प्रस्ताव मांडला.
सन्मानीय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्याला होकार दिला.नांदेड ते जालना साधरणत: १९४ किमी
स्वतंत्र समृद्धी मार्ग हा निश्चित तयार केला
जाईल.यासंपूर्ण कामाला जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे
नांदेड ते मुंबईला जाण्याचा मार्ग अधिक सुकर आणि नजिकचा होणार आहे.त्यात वेळेची देखिल
बचत होणार आहे.
जालना इथं पोलीस
मुख्यालयाच्या मैदानावर आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या
हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. कोविड योध्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना,
टोपे यांनी, प्रत्येकानं लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
आज आपल्या राज्यामध्ये आठवड्यातून
जवळजवळ पाच दिवस आपण व्हॅक्सीनेशनचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय
घेतला.दररोज २८ हजार लार्भार्थ्यांना व्हॅक्सीन मिळावं अशा स्वरुपाचं आपलं नियोजन आज
आपण करत आहोत.मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेन विनंती करेन की हा महत्वपूर्ण कार्यक्रम
यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.आणि आप आपला टर्न ज्या ज्यावेळेस येईल त्या त्यावेळी
जरुर व्हॅक्सीनेशन करुन घ्यावं.स्वत:ला सुरक्षित करा आणि इतरांना सुरक्षित ठेवा.
लातूर इथं पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते, ध्वजारोहण झालं. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या
व्यक्ती आणि संस्थांचा तसंच वीरपत्नी - वीरमातांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात देशमुख यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला,
ते म्हणाले..
विकासाच्या दृष्टीनं वाटचाल
करणारा लातूर जिल्हा सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती
करत आहे.ही आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून सर्वोत्तोपरी
सहकार्य केलं जाईल.अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो.लातूरची गौरवशाली पंरपरा राखत दमदार
पावलं टाकत या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपला नावलौकिक मिळवत राहिल.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या
वतीनं आयोजित हिरकणी हाटचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अदिती देशमुख यांच्या
हस्ते झालं, ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचं हे प्रदर्शन
आणि विक्री येत्या ३१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.
उस्मानाबाद इथं
पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. कृषी क्षेत्रात
केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यानं नीति आयोगाचं तीन कोटी रुपयांचं पारितोषिक
पटकावलं, त्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं. केंद्र आणि राज्य
सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी
तसंच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची गडाख
यांनी माहिती दिली. उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांना उत्कृष्ट तपासाबाबत
केंद्रीय गृहमंत्री यांचं पदक मिळाल्याबद्दल, त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
बीड इथं पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी
यांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात
आला.
परभणी इथं पालकमंत्री
नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सशक्त राज्यघटनेमुळे देशात गेली ७१ वर्ष लोकशाही
अबाधित राहिली, असं प्रतिपादन मलिक यांनी केलं. आरोग्य सुविधा आणि शासकीय रुग्णालय
अद्ययावत करणार असल्याची ग्वाही मलिक यांनी यावेळी दिली.
हिंगोली इथं
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात
आणण्यासाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी कामगिरीमुळे हिंगोली
जिल्ह्याने राज्यात एक वेगळा पॅटर्न निर्माण केल्याचं, गायकवाड यांनी नमूद केलं. गायकवाड
यांच्या हस्ते वीरमाता तसंच वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. प्रशासकीय सेवेत उत्तम काम
करणारे अधिकारी कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, क्रीडापटू तसंच प्रशिक्षकांचा पालकमंत्री
गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
****
कृषी कायद्यांसंदर्भात
सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारनं पार पाडली नाही, अशी टीका माजी
केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली
आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी
बोलत होते. केंद्र सरकारने टोकाची भूमिका सोडावी, आणि शेतकऱ्यांशी संवाद तुटू देऊ नये,
असं आवाहन पवार यांनी केलं.
दरम्यान, दिल्ली इथल्या शेतकरी ट्रॅक्टर
रॅलीला पाठिंबा देण्यासाठी किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन आणि डाव्या संघटनांच्या
वतीनं औरंगाबाद इथं ट्रॅक्टर आणि दुचाकी फेरी काढण्यात आली. शेतीमालाला हमीभावाबद्दल
केंद्र सरकारनं कायदेशीर संरक्षण देण्याच्या मागणीचा आंदोलकांचे नेते सुभाष लोमटे यांनी
पुनरुच्चार केला.
****
पुण्यातल्या
येरवाडा कारागृहात आज तुरुंग पर्यटन सेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते
प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीतले अनेक क्रांतिकारक तसंच कार्यकर्ते येरवाडा
तुरुंगात बंदिस्त होते, त्यांच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला. कारागृहात
बंदीस्त मनुष्यबळाचा सकारात्मक वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
मुंबईत पाच विभागीय
सायबर पोलिस ठाण्यांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं. ९४ पोलिस
ठाण्यातल्या स्वागत कक्षांचंही यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. सायबर क्राईम करणाऱ्या
न दिसणाऱ्या शत्रूसोबत आपलं युद्ध आता अधिक सक्षमतेने सुरू झालं असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं.
****
धुळे इथले ज्येष्ठ
स्वातंत्र्यसैनिक महादू मोतीलाल चौधरी यांचं आज ध्वजारोहण सोहळ्यात हृदयविकाराच्या
तीव्र धक्क्याने निधन झालं. ते ९६ वर्षांचे होते. औद्योगिक वसाहतीत चौधरी यांच्या हस्ते
भारत माता पूजन करुन ध्वजारोहण करण्यात आलं, त्यानंतर भाषण करत असताना चौधरी यांना
हृदय विकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्री अब्दुल सत्तार
यांनी रुग्णालयात जाऊन चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
//***********//
No comments:
Post a Comment