Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 January 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
देशात कोरोना
विषाणू संसर्गावरील प्रतिबंधक लस आतापर्यंत पंधरा लाख ८२ हजार २०१ जणांना देण्यात आली
असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या
चोवीस तासांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे १४ हजार ८४९ नवे रुग्ण आढळले असून १५५ रुग्णांचा
या काळात मृत्यू झाला आहे तर १५ हजार ९४८ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंतच्या
एकूण रुग्णांची संख्या एक कोटी सहा लाख ५४ हजार ५३३ झाली आहे. सध्या एक लाख ८४ हजार
४०८ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एक कोटी तीन लाख १६ हजार ७८६ रुग्ण बरे झाले
आहेत. या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख ५३ हजार ३३९
झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं काल एका
दिवसात या संसर्गाच्या तपासणीसाठी सात लाख ८१ हजार ७५२ चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत
१९ कोटी १७ लाख ६६ हजार ८७१ चाचण्या करण्यात आल्याची माहिती परिषदेनं दिली आहे.
****
राज्यात काल
२९० केंद्रांवर २४ हजार २८२ म्हणजे उद्दिष्टाच्या ८३ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना
विषाणू संसर्ग प्रतिबंधक लस देण्यात आली. राज्यात काल सर्वात जास्त गोंदिया जिल्ह्यात
१४३ टक्के लसीकरण झालं आहे. पाठोपाठ गडचिरोली, वर्धा, अमरावती, जालना, बीड, धुळे, हिंगोली,
नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झालं. सोमवारपासून
मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण सत्र घेण्यात येणार आहे. येत्या ३१ तारखेला पोलिओ लसीकरण
असल्यानं येत्या ३० तारखेला कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरण सत्र होणार नसल्याची
माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
****
राज्यात काल
कोरोना विषाणू संसर्गाचे दोन हजार ६९७ नवे रुग्ण आढळल्यानं आतापर्यंतच्या रुग्णांची
संख्या २० लाख सहा हजार ३५४ झाली आहे. या संसर्गावर उपचार घेऊन तीन हजार ६९४ रुग्ण
काल बरे झाल्यानं बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १९ लाख दहा हजार ५२१ झाली आहे.
राज्यात सध्या ४३ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचं राज्यातलं
प्रमाण आता ९५ पूर्णांक २२ शतांश टक्के झालं आहे. राज्यात या संसर्गाच्या चाचण्यांमध्ये
रुग्ण आढळण्याच्या प्रमाणातली घट कायम असून हे प्रमाण आता १४ पूर्णांक १८ शतांश टक्के
आहे. राज्यात या संसर्गामुळे काल ५६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत
५० हजार ७४० रुग्ण या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यातला मृत्यूदर दोन पूर्णांक
५३ शतांश टक्क्यांवर कायम आहे. काल राज्यात सर्वाधिक २३ मृत्यूंची नोंद मुंबई - ठाणे
विभागात झाली. पुणे विभागात काल २० मृत्यू नोंदवले गेले. नाशिक विभागात सहा, नागपूर
विभागात चार, औरंगाबाद विभागात दोन, आणि लातूर विभागात एका मृत्यूची नोंद झाली. कोल्हापूर
आणि अकोला विभागात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
आज राष्ट्रीय
कन्या दिवस साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि
सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशातल्या सर्व मुलींना कन्या दिवसाच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. केंद्र सरकारनं मुलींचं सशक्तीकरण, त्यांचं शिक्षण आणि उत्तम आरोग्य तसंच
स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीनं पाऊल उचललं असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भातल्या
आपल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त औरंगाबाद मुख्य टपाल कार्यालयात
एक जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान ‘सुकन्या समृध्दी’ योजनेत खातं उघडलेल्या पालकांचा
आज सम्मान करण्यात आला.
****
जालना शहरात
आज इतर मागासवर्गीय प्रवर्ग संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गाची
जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
****
नांदेड-मुंबई
तपोवन एक्स्प्रेस येत्या बुधवार पासून पुन्हा सुरू होणार आहे. आरक्षित तिकीट असण्याऱ्यांनाच
या गाडीतून प्रवास करता येणार आहे. आदिलाबाद-तिरुपती-आदिलाबाद विशेष गाडीही येत्या
बुधवारपासून सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी पूर्ण आरक्षित असेल, अनारक्षित तिकीटधारक
प्रवाशांना या गाडीत प्रवेश करता येणार नाही.
****
नाशिक जिल्ह्यात
सर्व गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शासनाच्या जल जीवन अभियाना अंतर्गत
प्रत्येक गावातल्या पाच महिलांना जबाबदारी देण्यात आली आहे. या महिलांना पाण्याची गुणवत्ता
तपासण्यासाठी साधनसामुग्री पुरवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment