Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२५ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
आज राष्ट्रीय मतदार
दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन.
·
प्रजासत्ताक दिनाच्या
पूर्वसंध्येला राष्ट्रपती देशाला संबोधित करणार.
·
देशाचा सामाजिक-सांस्कृतिक
वारसा आणि संविधानाला प्रजासत्ताक दिनाच्या पथ संचलनातून अभिवादन - पंतप्रधान नरेंद्र
मोदी.
·
कोरोना विषाणू संसर्ग
पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा ‘ऑनलाईन’च -उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री उदय सामंत.
·
राज्यात नवे दोन हजार
७५२ कोविडबाधित; मराठवाड्यात नव्या १४४ रुग्णांची नोंद.
·
९४ व्या अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विज्ञान कथा लेखक जयंत नारळीकर यांची निवड.
·
मागासवर्ग प्रवर्गाची
जातनिहाय जनगणना करावी - जालना इथल्या ओबीसी मोर्चात मागणी.
आणि
·
परभणी इथं शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाबाबत राज्य मंत्रिमंडळ सकारात्मक - पालकमंत्री नवाब मलीक यांची
ग्वाही.
****
राष्ट्रीय मतदार दिन आज देशभर साजरा केला जात आहे. भारतीय
निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. देशातला मतदार
सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरूक करणं हा यावर्षीच्या मतदार दिनाचा विषय आहे. मतदार
दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम होणार
आहे. या कार्यक्रमात २०२० - २१ राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले
जाणार आहेत. निवडणुकीशी संबंधित सर्वोत्कृष्ट कार्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना
पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. निवडणूक आयोगाचा वेब रेडिओ ‘हॅलो वोटर्स’ चं यावेळी
लोकार्पण केलं जाईल. नव मतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिलं जाणार आहे.
देशभरातही जिल्हा तसंच तालुका पातळीवर मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या रुख्मिणी सभागृहात आज सायंकाळी
चार वाजता मतदार दिनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्व नागरिक, मतदार, दिव्यांग मतदार,
नवमतदार तसंच विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय तसंच मतदान केंद्राच्या ठिकाणी
होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
यांनी केलं आहे.
दरम्यान, आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती
रामनाथ कोविंद राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी, दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातून देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक
वारशाला, तसंच जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या संविधानाला आपण अभिवादन करतो, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उद्या साजऱ्या होत असलेल्या ७२ व्या प्रजासत्ताक
दिनाच्या पथसंचलनात सहभागी होत असलेले, एनसीसी आणि एनएसएस कॅडेट्स, तसंच चित्ररथ कलाकारांसोबत
पंतप्रधानांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, पंतप्रधान आज दुपारी १२ वाजता राष्ट्रीय बाल पुरस्कार
विजेत्यांशी, दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. नवनिर्मिती,
विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा तसंच शौर्य, या क्षेत्रांमधे उल्लेखनीय
कामगिरी केलेल्या मुलांना हे पुरस्कार दिले जातात. २०२१ या वर्षाच्या पुरस्कारासाठी
विविध क्षेत्रातल्या ३२ मुलांची निवड करण्यात आली आहे. नागपूरच्या श्रीनाथ अग्रवाल
याची नावीन्यपूर्ण श्रेणीत या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. नागपूरचे पालकमंत्री डॉ.
नितीन राऊत यांनी श्रीनाथचं कौतुक केलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग जोपर्यंत पूर्णपणे संपुष्टात येत नाही,
आणि विद्यापीठ, प्राध्यापक आणि सर्व घटकांची मानसिकता होत नाही, तोपर्यंत विद्यापीठांच्या
परीक्षा `ऑनलाईन`च होणार असल्याचं, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट
केलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे
प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी योग्य ते निर्णय घेतले जात असून, जात प्रमाणपत्र
नसलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याची पावती दाखवल्यास,
प्रवेश दिला जात असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली. ते म्हणाले –
कोविड पूर्णतः जात नाही आणि
विद्यापीठांचे, प्राध्यापकांचे आणि सगळ्याच घटकांची मानसिकता फिजीकली एक्झाम द्यायची
होत नाही, तोपर्यंत ऑनलाईन एक्झामच घेतल्या जातील. जात पडताळणी प्रमाणपत्र जर सबमिट
केलेलं असेल आणि त्याची पावती त्या विद्यार्थ्याकडे असेल ते देखील ॲडमिशनला ग्राह्य
धरलं जाणार आहे. आणि काही कालावधीनंतर त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावं लागेल.
****
राज्यात लवकरच पुनर्वसन धोरण आणणार असल्याचं, मदत आणि पुनर्वसन
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात,
मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. पुनर्वसित गावांचे प्रश्न
कायमचे निकाली काढण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं असून, ते आठवडाभरात मंत्रिमंडळासमोर
मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती, वडेट्टीवार यांनी दिली. यामध्ये जमीन खरेदीपासून
गावांच्या नागरी सुविधांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत, त्यामुळे
पुनर्वसित गावांचे प्रश्न सुटणार असल्याचं, वडेट्टीवार यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा
मोर्चा, मुंबईत आझाद मैदानात दाखल होत आहे. राज्यातल्या २१ जिल्ह्यातले ३० हजार शेतकरी
या मोर्चात सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी
या मोर्चाला पाठिंबा दिला असून, ते यात सहभागी होणार असल्याचं, शेतकरी नेते अजित नवले
यांनी सांगितलं. या मोर्चेकऱ्यांचं शिष्टमंडळ आज राजभवनावर जाऊन, राज्यपाल भगतसिंह
कोशारी यांची भेट घेणार आहे.
दरम्यान, या ट्रॅक्टर मोर्चाचा भाग म्हणून जिल्हा, तालुका
तसंच गाव पातळीवरही ट्रॅक्टर फेरी काढण्याचा प्रयत्न संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं
होत आहे. औरंगाबाद इथं उद्या दुपारी एक वाजता दिल्ली दरवाजापासून, किले अर्क, सिटी
चौक मार्गे भडकल दरवाजापर्यंत ट्रॅक्टर फेरी काढणार असल्याचं संघटनेकडून सांगण्यात
आलं आहे.
****
राष्ट्रीय पर्यटन दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं औरंगाबाद
जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात नांद्राबाद इथं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं
आहे. ‘कोरोना के बाद विश्व पर्यटन’ विषयावर आज सकाळी ११ वाजता होणाऱ्या या चर्चासत्रात
पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक डॉ.श्रीमंत हारकर यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी
होणार आहेत.
****
राज्यात काल दोन हजार ७५२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख नऊ हजार १०६ झाली आहे. काल
५६ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५० हजार ७८५ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे.
तर काल १ हजार ७४३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख १२ हजार
२६४ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक १८ शतांश टक्के
झाला आहे. सध्या राज्यभरात ४४ हजार ८३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल परभणी आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका कोरोना
विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १४४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल २४ नवे रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात
३८, बीड ३०, परभणी १४, उस्मानाबाद १३, नांदेड दहा, हिंगोली नऊ, तर जालना जिल्ह्यात
काल सहा नवे रुग्ण आढळून आले.
****
कोविड संकटकाळात बाधित रुग्णांवर योग्य पद्धतीनं तसंच सामाजिक
भान राखत उपचार केल्याबद्दल, लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, लातूर इथल्या विवेकानंद
रुग्णालयाचा, गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या रुग्णालयानं आतापर्यंत साडे सातशे
पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्णांवर उपचार केले आहेत, या रुग्णांवर उपचार करताना त्यांना
विविध शासकीय योजनांचा लाभही मिळवून देण्यात आला. १०० पेक्षा अधिक कोविडबाधित रुग्णांनी
या योजनांचा लाभ घेतला आहे. सध्या या रुग्णालयात १० कोविडरुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या सर्व कार्याची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनानं रुग्णालयाचा गौरव केला आहे.
****
कोविड लसीकरणामुळे आपल्याबरोबर इतरांचंही संरक्षण होईल, असं
मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.राणी बंग यांनी व्यक्त केलं आहे. डॉ.राणी बंग यांनी
त्यांचे पती डॉ.अभय बंग यांच्यासह गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड
लस घेतली. कोविड लसीसंदर्भात कोणतीही शंका न बाळगता लस घेण्याचं आवाहन डॉ बंग यांनी
यावेळी केलं.
डॉ.अभय बंग माझे पती आणि
मी आम्ही दोघांनीही कोविडची लस घेतलेली आहे. आमचा अनुभव फार छान आहे. आणि त्यामुळे
काहीही घाबरण्याचं कारण नाही. अफवांवरती विश्वास ठेवू नका. कोविडची लस आपण घेतलीच पाहिजे.
तर आपण आपलं स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करू शकू. सुदैवान ही लस आपल्याला भारतामधे फार
लवकर मिळतेय. आपण फार भाग्यवान आहोत. त्यामुळे या संधीचा आपण सर्वांनी फायदा घेतला
पाहिजे तरच आपण ही साथ नियंत्रणामधे आणू शकू.
****
९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी,
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ज्ञ आणि विज्ञान कथा लेखक जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी, काल नाशिक इथं
पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पद्मविभूषण` सन्मानप्राप्त नारळीकर यांच्या ‘यक्षाची
देणगी’ या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘चार नगरातले माझे विश्र्व’
या आत्मचरित्राला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. येत्या २६ ते २८ मार्च दरम्यान
हे ९४ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक इथं होणार आहे
****
नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीनं दिला जाणारा सावित्रीबाई फुले
पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्या संध्या बारगजे आणि बेबीसुरेखा शिंदे यांना, तर नरहर
कुरुंदकर पुरस्कार, ज्येष्ठ लेखक डॉ.सुरेश सावंत आणि कवयित्री आशा पैठणे यांना जाहीर
झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी, २०१९ आणि २०२० या वर्षांसाठीचे पुरस्कार काल जाहीर केले. उद्या
प्रजासत्ताक दिनी हे पुरस्कार संमारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा इथं रोटरी क्लब आणि उपजिल्हा
रुग्णालयाच्या वतीनं, स्त्री जन्माचं स्वागत करून, राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमांना
प्रारंभ करण्यात आला. उद्यापर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात शालेय मुलींसाठी आरोग्यविषयक
प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह, अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
परभणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप
अभियंता गंगाधर यंबडवार यांना, सर विश्वेश्वरय्या उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्रदान
करण्यात आला. बंगळुरू इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट यांच्यावतीनं,
दरवर्षी उत्कृष्ट अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो.
****
अयोध्येत श्रीराम मंदीर उभारण्यासाठी उस्मानाबादचे माजी खासदार
माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी, एक लाख रुपयांचा निधी, श्रीराम मंदीर निधी
संकलन समितीकडे सुपूर्द केला आहे. या समितीच्या वतीनं काल उस्मानाबाद शहरातून शोभायात्रा
काढण्यात आली, या शोभायात्रेत अनेक नागरिक सहभागी झाले होते.
****
२०२१ च्या जनगणनेत इतर मागासवर्ग प्रवर्गाची जातनिहाय जनगणना
करावी, इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी,
जालना इथं काल ओबीसी मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून
निघालेल्या या मोर्चात, ओबीसी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. अंबड चौफुली
परिसरात मोर्चाच्या समारोप प्रसंगी, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
यांनी, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारलं. ओबीसी समाजाचा कार्यकर्ता
म्हणून आपण या मोर्चात सहभागी झाल्याचंही, वडेट्टीवर यावेळी म्हणाले.
****
परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत राज्य मंत्रिमंडळ
सकारात्मक असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या महाविद्यालयाला मान्यता दिली जाईल,
अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी दिली. परभणीकर संघर्ष समितीच्या
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी धरणे आंदोलन करण्यात
आलं, या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधतांना मलिक बोलत होते. हे सरकार हा प्रस्ताव तातडीनं
मंजूर करेल, आणि त्यापाठोपाठ चंद्रपूर तसंच नाशिकचा सुध्दा प्रस्ताव मान्य केला जाईल,
असंही मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
बलशाली भारताच्या निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची
असल्याचं, आमदार अभिमन्यू पवार यांनी म्हटलं आहे. काल लातूर इथं, राज्य प्राथमिक शिक्षक
संघाचा ‘सन्मान सावित्री आणि जिजाऊ यांच्या लेकींचा’ या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत
होते. यावेळी औसा तालुक्यातल्या शिक्षिकांचा प्रमाणपत्र तसंच ग्रंथ देवून सन्मान करण्यात
आला. संघटनेच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी आपण कायम एक पाऊल पुढे असू, अशी ग्वाही
आमदार पवार यांनी दिली.
****
“हर घर - नल से जल” या योजनेपासून एकही गाव वंचित राहणार
नाही, अशी ग्वाही परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. जल जीवन मिशन
प्रस्तावित आराखड्याची बैठक काल परभणी इथं पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी
ते बोलत होते. प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी किमान ५५ लीटर शुद्ध पाणी मिळालं पाहिजे,
पाण्याचा काटेकोर वापर व्हावा, अपव्यय रोखता यावा, यासाठी ही योजना असून, खेड्यापाड्यात
याबद्दल जागरुकता बाळगावी, असं आवाहन पालकमंत्री मलिक यांनी केलं.
****
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातले उद्योजक मोरोतराव कवळे
यांनी काल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात
प्रवेश केला. मारोतराव कवळे यांनी २०१९ मध्ये नायगांव विधानसभा मतदार संघातून वंचित
बहूजन आघाडी कडून निवडणूक लढवली होती.
****
भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा,
माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी काल केली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कळंब
इथल्या जनकल्याण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उमेश कुलकर्णी यांची औरंगाबाद विभागाच्या
सहसंयोजक पदी निवड करण्यात आली आहे.
****
नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस आणि आदिलाबाद-तिरुपती-आदिलाबाद
विशेष गाडी येत्या बुधवार पासून पुन्हा सुरू होणार आहे. या दोन्ही गाड्या पूर्ण आरक्षित
असतील, अनारक्षित तिकीटधारक प्रवाशांना या गाडीत प्रवेश करता येणार नाही.
****
No comments:
Post a Comment