Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.
****
** ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज देशभरात ध्वजारोहणासह
विविध कार्यक्रमांचं आयोजन
** शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूवर अल्पावधीत लस विकसित
करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवला- राष्ट्रपतींचं प्रतिपादन
** राष्ट्रपती पोलिस पदकं, शौर्य
पदकं, सेवा पदकांची घोषणा; औरंगाबाद इथले सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास गाडेकर, बीड
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्यासह, महाराष्ट्रातल्या ८० जणांचा
गौरव
** पद्म पुरस्कार जाहीर; सात पद्मविभुषण, १० पद्मभूषण
तर १०२ मान्यवरांना पद्मश्री सन्मान
** कोविड काळातही अद्भुत क्षमतांचा वापर केल्याबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचं पंतप्रधानांकडून कौतुक
** बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर कराल, तर सामान्य
माणूस आणि शेतकरी पेटून उठेल - खासदार शरद पवार
** काही पक्ष जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत असल्याची
देवेंद्र फडणवीस यांची टीका
** महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी
चर्चा करून घ्यावा लागणार - उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
आणि
** औरंगाबाद स्मार्ट सिटीझन मोहिमेचं जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन
****
देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं
सर्वत्र कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून, ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे. दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मुख्य शासकीय
ध्वजारोहण होईल, यंदा कोविड पार्श्वभूमीवर पथसंचलनाच्या अंतरात कपात करण्यात आली आहे.
या पथसंचलनात महाराष्ट्राची संतपरंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी होत आहे.
****
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. भारतीय शास्त्रज्ञांनी अल्पावधीतच कोरोना विषाणूवर
लस विकसित करून, मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास घडवल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतींनी
यावेळी केलं. विकसित देशांच्या तुलनेत कोविड संसर्ग तसंच मृत्यू दरावर नियंत्रण मिळवण्यात,
देशभरातले डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणा आणि अन्य कोविड योद्ध्यांचं योगदान अमूल्य असल्याचं,
ते म्हणाले. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वांनी कोविड लस घेण्याचं
आवाहन त्यांनी केलं.
आत्मनिर्भर अभियान आता लोकचळवळीचं रूप घेत आहे, या माध्यमातून
आपले अनेक राष्ट्रीय संकल्प स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षापर्यंत पूर्ण होतील, असा
विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीसाठी, शिक्षण, आरोग्य,
वंचित घटकांचं उत्थान आणि महिला कल्याणावर विशेष भर दिला जात असल्याचं सांगतानाच, राष्ट्रपतींनी,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या घटनात्मक नैतिकतेच्या मार्गावर सातत्यानं
चालत राहण्याचं आवाहन केलं. अन्नसुरक्षा, उद्योग, शिक्षण, संरक्षण, परराष्ट्र संबंध,
यासह विविध विषयांवर राष्ट्रपतींनी मार्गदर्शन केलं. संसदेनं संमत केलेले नवे कायदे
शेतकरी तसंच कामगार हिताचे असल्याचं, राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
राष्ट्रपती पोलिस पदकं तसंच शौर्य पदकांची काल घोषणा करण्यात आली. गलवान खोऱ्यात चिनी
सैनिकांशी लढताना वीरमरण आलेले कर्नल संतोष बाबू यांना, मरणोत्तर महावीर चक्र जाहीर
झालं आहे. महाराष्ट्रातल्या ५७ पोलिसांना पदकं तर चार पोलिस अधिकाऱ्यांना, राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक
जाहीर झाली आहे. २०७ पोलिस शौर्य पदकं तसंच ७३९
पोलिस सेवा पदकंही काल जाहीर झाली, यामध्ये औरंगाबाद इथले सहायक पोलिस उपनिरीक्षक रामदास
गाडेकर, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्यासह, महाराष्ट्रातल्या
१३ पोलिसांचा समावेश आहे. ७३ अग्निशमन सेवा पदकं, ५४ गृहरक्षक दल, तसंच नागरी सुरक्षा
पदकंही काल जाहीर करण्यात आली. अग्निशमन सेवा पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या
चार जणांचा समावेश आहे. ४० जीवन रक्षा पदकंही राष्ट्रपतींनी काल जाहीर केली, यामध्ये
महाराष्ट्रातल्या तीन जणांचा समावेश आहे. देशातले ५२ तुरुंग अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना
उल्लेखनीय कार्यासाठी, सुधारात्मक सेवा पदकं काल जाहीर झाले, यात महाराष्ट्रातल्या
तिघांचा समावेश आहे.
****
पद्म पुरस्कार काल जाहीर झाले, यामध्ये सात जणांना पद्मविभुषण,
१० जणांना पद्मभूषण तर १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले. पद्मविभुषण पुरस्कार
प्राप्त मान्यवरांमध्ये, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, तसंच दिवंगत गायक एस पी
बालसुब्रह्मण्यम यांचा समावेश आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, दिवंगत
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई, भाजपचे
दिवंगत नेते केशुभाई पटेल, उद्योजक रजनीकांत श्रॉफ, यांचा पद्मभूषण प्राप्त मान्यवरांमध्ये
समावेश आहे. पद्मश्री सन्मान प्राप्त १०२ जणांमध्ये, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई
सपकाळ, गोव्याच्या माजी राज्यपाल दिवंगत मृदुला सिन्हा, लिज्जत पापडच्या प्रणेत्या जसवंतीबेन पोपट, शिवकालिन
चित्रकथी कलेचे प्रसारक परशुराम गंगावणे, वाशिम इथले साहित्यिक नामदेव कांबळे, सामाजिक
कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, यांचा समावेश आहे.
****
राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्या बालकांनी कोविडच्या काळातही आपल्या अद्भुत क्षमतांचा वापर केल्याबद्दल, पंतप्रधानांनी या बालकांचं कौतुक केलं आहे. या बालकांशी पंतप्रधानांनी
काल संवाद साधला. या पुरस्कार विजेत्या बालकांमध्ये राज्यातल्या पाच बालकांचा समावेश आहे. यामध्ये नांदेडच्या कामेश्वर वाघमारे याला शौर्य पुरस्कार, तर मुंबईच्या काम्या कार्तिकेयनला क्रीडा
पुरस्कार मिळाला आहे. नवोन्मेष संशोधन
क्षेत्रातल्या पुरस्कारासाठी जळगावचा अर्चित पाटिल, पुण्याचा सोनित सिसोलेकर, आणि नागपूरचा श्रीनभ अग्रवाल या तिघांची निवड झाली आहे.
नांदेडच्या कामेश्वर वाघमारेनं आकाशवाणीशी बोलताना या शब्दांत
आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमच्या घोडज गावामध्ये ऋषी महाराज मंदीर आहे. मंदीराजवळ मानार
नदी आहे. त्या नदीमध्ये तीन मुले बुडत होते त्या मुलांचा आरडा ओरड आवाज आला मी पाठीमागे
परतून बघितलो लगेच नदीमध्ये उडी घेतली. तिघांपैकी दोन मुलांना जिवंत नदी बाहेर काढले.
तिसऱ्या मुलाला काढायचा प्रयत्न केलो. त्या दोन मुलांना वाचवल्याबद्दल सार्थ अभिमान
आहे.
नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल यानं या
पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत
मेरा मुख्य नवाचार किलोमोझॅक व्हायरस नामक एक भिंडी में होनेवाली
घातक बिमारी का एक नैसर्गिक उपाय है. इस उपाय को आजमाते हुये करीब पचास हजार किसानों
और उनके परिवारों को इससे सीधा सीधा लाभ मिला है. मै प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का,
मिनिस्ट्री ऑफ ह्युमन ॲण्ड चाईल्ड डेव्हलपमेंट का और पुरे देश का आभारी हु.
जळगाच्या अर्चित
पाटील याने आपल्या संशोधनाबाबत माहिती दिली.
मला हे अवार्ड जे आहे ते इनोवेशन श्रेणीत मिळालेलं आहे. कारण मी
पीपीएच कप डेव्हलप केलेलं आहे. हे यंत्र प्रसुती पश्चात रक्तस्राव तंतोतंत मोजण्यास
मदत करत आणि डॅाक्टरला आईचा जीव वाचवायला मदत करत, माझ्या शाळेने मला जिल्हास्तरीय,
स्टेट लेवल व नॅशनल लेवल पर्यंत हा प्रोजेक्ट घेऊन जायला ही मदत केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्राला या बालकांचा अभिमान असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
संसदीय पद्धत उद्वस्त करून बहुमताच्या जोरावर कृषी कायदे मंजूर
कराल, तर सामान्य माणूस आणि शेतकरी त्याविरुद्ध पेटून उठेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत
सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, किसान सभेनं काढलेला मोर्चा काल
मुंबईत आझाद मैदानावर दाखल झाला, या मोर्चाच्या व्यासपीठावरून पवार काल बोलत होते.
केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कवडीचीही आस्था नसल्याची टीका, पवार यांनी केली. या मोर्चात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, अखिल भारतीय
किसान सभेचे अजित नवले, यांच्यासह राज्यभरातून हजारो आंदोलक शेतकरी सहभागी झाले आहेत.
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करणारं निवेदन राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांना देण्याचा आंदोलकांचा मानस होता. मात्र, राज्यपालांकडे गोवा राज्याच्या
राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. काल २५ जानेवारीला गोवा विधानसभेच्या प्रथम
सत्राला राज्यपाल संबोधित करणार असल्यानं, ते शेतकरी शिष्टमंडळाला भेटू शकणार नाहीत,
असं राजभवनातून यापूर्वीच सांगण्यात आल्याचं, राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं.
दरम्यान, काही पक्ष जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करत असल्याची
टीका, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल नागपुरात पत्रकारांशी
बोलत होते. २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं, राज्यात कंत्राटी
शेतीला मान्यता दिली होती, राज्यात स्वतः केलेला कंत्राटी शेतीचा कायदा या पक्षांना
चालतो आणि केंद्रानं केलेला कायदा चालत नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची
दुटप्पी भूमिका यावरून दिसून येत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.
****
राज्यात काल एक हजार ८४२ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण
संख्या २० लाख १० हजार ९४८ झाली आहे. काल ३० रुग्णांचा या संसर्गानं
मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ८१५ झाली असून, मृत्यूदर २
पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल ३ हजार ८० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत
१९ लाख १५ हजार ३४४ रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २५ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४३ हजार ५६१ रुग्णांवर
उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन
कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर विभागात नव्या १५४ रुग्णांची नोंद झाली.
औरंगाबाद जिल्ह्यात काल ३२ नवे रुग्ण आढळून आले. लातूर जिल्ह्यात
३९, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी २१, बीड २०, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात
प्रत्येकी दहा, तर परभणी जिल्ह्यात काल एक रुग्ण आढळून आला.
****
कोविड पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली महाविद्यालयं सुरू करण्याबाबतचा
निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असं उच्च आणि तंत्रशिक्षण
मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. अनेक महाविद्यालयांची
तसंच विद्यापीठाची वसतीगृहं कोविड केंद्र म्हणून वापरात घेतलेली आहेत, ती परत संस्थांच्या
ताब्यात घ्यावी लागतील, त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार सामाजिक अंतराचे
नियम पाळून महाविद्यालयं सुरू करता येतील, असं सामंत यांनी नमूद केलं. वसतीगृहात विद्यार्थी
क्षमतेसोबतच, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात आणायचं किंवा नाही, तसंच मुंबईतल्या
विद्यार्थ्यांना उपनगरी रेल्वेचा पास द्यायचा किंवा नाही, याबाबतही विचार करावा लागेल,
असं सामंत म्हणाले. राज्यात सर्व विद्यापीठातून प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्रांची
उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही, सामंत यांनी यावेळी दिली.
****
राष्ट्रीय पर्यटन दिन काल साजरा झाला. या पार्श्वभूमीवर, परभणी
जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या पुंगळा इथल्या ग्रामस्थांनी, सर्वांसमोर एक आदर्श
ठेवला आहे. या गावातल्या एका पुरातन बारवेची काल सामुहिक श्रमदानातून स्वच्छता करण्यात
आली. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर,
यादवकालीन हेमाडपंथी शिवमंदिरासमोर भग्न अवस्थेतील या बारवेची
पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि संगोपन अभ्यास गटाच्या
सदस्यांनी केली. पारंपारिक जलस्रोत असणाऱ्या बारवेचे धार्मिक, सामाजिक महत्त्व गावकऱ्यांना
सांगण्यात आले. श्रमदानातून अवघ्या दोन तासात बारवेची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.
ग्रामसेविका कुंदा जावळे यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. पुंगळा वासियांचा आदर्श
अन्य ग्रामस्थांसाठी निश्चितच प्रेरणादायी होईल.
****
विभागात काल विविध जिल्हा नियोजन समितीच्या बैठका पालकमंत्र्यांच्या
उपस्थितीत घेण्यात आल्या, या बैठकांमध्ये जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांना मान्यता
देण्यात आली. औरंगाबाद जिल्हा वार्षिक योजनेच्या ३६० कोटी, हिंगोली २२४ कोटी आठ लाख,
परभणी २१९ कोटी २० लाख, उस्मानाबाद २६० कोटी ८० लाख, नांदेड जिल्हा वार्षिक योजनेच्या
४६२ कोटी ९१ लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली.
****
परभणी इथं जिल्हा नियोजन तसंच विकास समितीच्या बैठकीत, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेच्या शिफारशीचा ठराव एकमुखानं मंजूर केला असल्याची माहिती,
पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. या ठरावाला मूर्तस्वरूप लवकरच येईल असं ते म्हणाले.
जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांकडून काही खासगी रुग्णालयांनी वसूल केलेलं अवास्तव शुल्क
येत्या आठ दिवसात रुग्णालयांकडून परत घेतलं जाईल, असंही मलिक यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटीझन मोहिमेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री
सुभाष देसाई यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात
ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, रोजगार हमी तसंच फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे,
यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रहिवाशांना स्मार्ट सिटीझन म्हणून प्रशिक्षित
करणं, हा या मोहिमेचा उद्देश आहे. मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे
मुख्य कार्यकारी अधिकारी, अस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी बोलताना, प्रत्येक नागरिक
जबाबदारीनं वागल्याशिवाय शहरं स्मार्ट बनू शकत नसल्याचं नमूद केलं. शहरातल्या प्रत्येक
नागरिकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानं उद्योग, स्वयंसेवी संस्था, नागरिक गट, शैक्षणिक
संस्थांना या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राष्ट्रीय मतदार दिन काल साजरा झाला. लातूर तसंच बीड जिल्हा
परिषदेत झालेल्या कार्यक्रमात नवमतदारांना ओळख पत्र वाटप, तसंच मतदान प्रक्रियेसंदर्भात
घेण्यात आलेल्या, विविध स्पर्धेच्या विजेत्यांचा आणि उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी
कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मतदार दिनानिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेत शपथ घेण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने यांनी शपथेचं वाचन केलं.
नांदेड इथं जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल फेरी काढण्यात
आली. जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी यावेळी नवमतदारांना तर पोलिस अधीक्षक कार्यालयात
पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदार दिनाची शपथ
दिली.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात साष्टपिंपळगाव
इथं सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला, विविध सामाजिक संघटनांसह
पंचक्रोशीतल्या गावांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातले अनेक बांधव या आंदोलनात
सहभागी होत आहेत. दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा यासाठी, काल आंदोलनस्थळी
सरकारच्या नावानं जागरण-गोंधळ घालण्यात आला.
***///***
No comments:
Post a Comment