आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ जानेवारी २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
संसदेचं अर्थसंकल्पीय
अधिवेशन आजपासून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरु होत आहे. सोमवारी
एक फेब्रुवारी रोजी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशाच्या इतिहासात
प्रथमच कागद-रहित अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
दरम्यान, सुधारीत
कृषी कायद्यांच्या मुद्यावर काँग्रेससह १८ पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार
टाकला आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल ही घोषणा केली.
कोविड संसर्गाची
साथ लक्षात घेता राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत, तर लोकसभेचं
कामकाज संध्याकाळी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचं प्रथम
सत्र १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात १२ बैठका होतील. दुसरं सत्र आठ मार्चला
सुरू होईल आणि ते आठ एप्रिलपर्यंत चालेल. यादरम्यान २१ बैठका होतील. लोकसभा आणि राज्यसभेचं
कामकाज निश्चित करण्यासाठी तसंच ते सुरळीत पार पडावं यासाठी सरकारनं उद्या शनिवारी
सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनीही
रविवारी वरिष्ठ सभागृहातल्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.
****
जगातल्या कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये भारताने मोठी भूमिका बजावावी असं आवाहन, संयुक्त राष्ट्राचे
सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. भारताची लस उत्पादन क्षमता ही जगातील सर्वात
जमेची बाजू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक
सर्व यंत्रणा भारताकडे उपलब्ध आहे असा विश्वासही गुटेरस यांनी व्यक्त केला. कोविड लसीच्या
५५ लाख मात्रा भारताने आपल्या शेजारच्या देशांना दिल्या असून ओमान, कॅरिबियन देश, निकारगुवा
आणि प्रशांत क्षेत्रातील देशांना लस भेट म्हणून देण्याचीही भारताची योजना असल्याचं
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर भारत आफ्रिकेला एक कोटी मात्रा आणि
संयुक्त राष्ट्राच्या सर्व कर्मचाऱ्यांना १० लाख मात्रा देण्याची योजना आखत असल्याचंही
श्रीवास्तव यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात कालपासून कोविड लसीकरणाला, तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या
हस्ते प्रारंभ झाला. यावेळी भोकर आणि भोसी इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या १०५ आरोग्य
कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली.
****
No comments:
Post a Comment