Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
January 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२९ जानेवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
·
संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं आजपासून प्रारंभ.
·
प्राविण्य प्राप्त
खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी किमान ६० टक्के सहभागाची अट शिथिल करणार-क्रीडा आणि युवक
कल्याण मंत्री सुनिल केदार.
·
राज्य सरकारचे २०१९चे
यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार घोषित.
·
सुधारित कृषी कायदे
आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचे उद्यापासून राळेगणसिद्धीत
उपोषण.
·
राज्यात काल दोन हजार
८८९ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात चार रुग्णांचा मृत्यू.
·
ज्येष्ठ समीक्षक आणि
लेखक शंकर सारडा यांचं निधन.
आणि
·
स्वच्छ भारत मिशन
अंतर्गत तपासणीत, परभणी महानगरपालिका हागणदारीमुक्त घोषित.
****
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांना सकाळी संबोधित करतील. सोमवारी एक फेब्रुवारी
रोजी २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. देशाच्या इतिहासात प्रथमच
कागद-रहित अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
दरम्यान, सुधारीत कृषी कायद्यांच्या मुद्यावर काँग्रेससह
१८ पक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते
गुलाम नबी आझाद यांनी काल ही घोषणा केली.
कोविड संसर्गाची साथ लक्षात घेता राज्यसभेचं कामकाज सकाळी
नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत, तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार वाजेपासून
रात्री नऊ वाजेपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचं प्रथम सत्र १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार
आहे. या काळात १२ बैठका होतील. दुसरं सत्र आठ मार्चला सुरू होईल आणि ते आठ एप्रिलपर्यंत
चालेल. यादरम्यान २१ बैठका होतील. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज निश्चित करण्यासाठी
तसंच ते सुरळीत पार पडावं यासाठी सरकारनं उद्या शनिवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक
बोलावली आहे. राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी वरिष्ठ सभागृहातल्या
सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे.
****
राज्यातल्या प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय
आणि इतर क्षेत्रात नोकरीसाठी पाच टक्के आरक्षणाकरता, राष्ट्रीय, राज्य अजिंक्यपद स्पर्धेत
किमान ६० टक्के सहभागाची अट शिथील केली जाणार असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री
सुनिल केदार यांनी काल मुंबईत सांगितलं. खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी
आणि शैक्षणिक अर्हता मिळवण्याचा कालावधी एकच असल्यानं, त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच
प्रमाणात लक्ष देता येत नाही. बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होते आणि
त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत,
ही बाब विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचं, केदार यांनी सांगितलं. या बैठकीला क्रीडा
राज्यमंत्री आदिती तटकरे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी मान्यवर उपस्थित होते.
****
राज्याच्या मागास भागासाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देतांनाच,
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक - नाबार्डनं, पतपुरवठ्याच्या उद्दिष्टपूर्तीची
माहिती देणारा अहवाल तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
नाबार्डने तयार केलेल्या २०२१-२२ राज्य पतपुरवठा आराखडा उद्दिष्ट पत्राचे प्रकाशन,
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. पतपुरवठा आराखड्याच्या
अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत मार्ग काढण्यासाठीही, दर तीन महिन्यांनी आढावा
बैठक घ्यावी, आणि अमंलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
राज्य सरकारच्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजनेअंतर्गत
२०१९ च्या पुरस्कार विजेत्यांची नाव काल जाहीर झाली. यात मराठवाड्यातल्या पाच जणांचा
समावेश आहे. औरंगाबाद इथल्या सुनंदा गोरे यांच्या ‘नवी प्रतिज्ञा’ या बालवांङमयासाठी
भा रा भागवत पुरस्कार, पैठण इथल्या संदीप जगदाळे यांच्या ‘असो आता चाड’ या काव्यसंग्रहाला
बहीणाबाई चौधरी पुरस्कार, कवी मंगेश नारायण काळे यांच्या मायावीचे तहरीरला कवी केशवसुत
पुरस्कार, रमेश जाधव यांच्या पोशिंद्याचे आख्यानः एक प्रश्नोपनिषदला वसंतराव नाईक पुरस्कार
तर नांदेड इथल्या मनोज बोरगावकर यांच्या ‘नदीष्ट’ या कादंबरीला हरी नारायण आपटे पुरस्कार
जाहीर झाला आहे. पुरस्कात प्राप्त इतर मान्यवरांमध्ये नाटककार शफाअत खान, धर्मराज निमसरकर,
अशोक राणे, हमीद दाभोळकर, श्री के क्षीरसागर यांच्यासह ३४ जणांचा समावेश आहे. पुरस्काराचं
स्वरूप कमीत कमी ५० पन्नास हजार रुपये, तर जास्तीत जास्त एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह
आणि प्रमाणपत्र असे आहे. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे माजी सहायक संचालक
गोपाळ चिपलकट्टी, यांचाही या मानकऱ्यांमधे समावेश आहे. सदामंगल प्रकाशनानं प्रकाशित
केलेल्या त्यांच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात’, या ग्रंथाला एक
लाख रुपयांचा शाहू महाराज पुरस्कार मिळाला आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या काल झालेल्या
सांगता समारंभात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष
देसाई यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतांनाच, या साहित्यिकांकडून मराठी भाषा
संवर्धन आणि वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली.
****
सुधारित कृषी कायदे आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी जेष्ठ
समाज सेवक अण्णा हजारे, उद्यापासून राळेगणसिद्धी इथं उपोषण करणार आहेत. त्यांनी काल
एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. गेल्या तीन महिन्यांत आपण पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना
पाच वेळा पत्र लिहिले, परंतू त्यावर योग्य तोडगा निघालेला नाही, असं त्यांनी म्हटलं
आहे. ज्या कार्यकर्त्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे, त्यांनी शांतता आणि अहिंसक
मार्गाने, त्यांचं गाव, तहसील आणि जिल्हा दंडाधिकारी कार्यालय इथं आंदोलन करावं, असं
अण्णांनी या पत्रकात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवी
मुंबईतल्या बेलापूर न्यायालयानं काल समन्स बजावलं. २६ जानेवारी २०१४ रोजी वाशी टोलनाक्यावर
झालेल्या तोडफोड प्रकरणी, ठाकरे यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याची
सुनावणी न्यायालयात सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असतानाही ठाकरे
गैरहजर राहिले, अखेर काल त्यांना समन्स बजावण्यात आलं. येत्या सहा फेब्रुवारी रोजी
हजर राहण्याचे आदेश त्यात दिले आहेत.
****
नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातल्या कातरणी ग्रामपंचायतीच्या
निवडणुकीत, सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याचं आढळून आल्यामुळे, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया
रद्द करण्यात आली असल्याचं, राज्य निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी सांगितलं.
कातरणी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीसंदर्भात,
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदींकडून अहवाल
मागवण्यात आले होते, या अहवालांमध्ये तक्रारीबाबत तथ्य आढळून आल्यामुळे, निवडणूक प्रक्रिया
रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, आयुक्त मदान यांनी सांगितलं.
****
राज्यात काल दोन हजार ८८९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख १८ हजार ४१३ झाली आहे. काल
५० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने मृत पावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या ५० हजार ९४४ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे.
तर काल ३ हजार १८१ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख २३ हजार
१८७ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २८ शतांश टक्के
झाला आहे.
****
मराठवाड्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू
झाला, तर नव्या २०१ रुग्णांची नोंद झाली. मृतांमध्ये जालना इथल्या दोन, तर औरंगाबाद
आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ४४ नवे रुग्ण आढळून
आले. नांदेड जिल्ह्यात ३८, बीड ३२, हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३,
जालना नऊ, तर परभणी जिल्ह्यात आठ नवे रुग्ण आढळून आले.
****
जालना जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ४७४ तसंच २०२५ मध्ये
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी, काल आठही तहसील कार्यालयात आरक्षण
सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात
आलेल्या जागा कायम ठेवण्यात आल्या असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी,
चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. दरम्यान, आठही तालुक्यातल्या एकूण जागांपैकी,
५० टक्के महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या सरपंच पदाच्या जागांसाठी, येत्या एक फेब्रुवारी
रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड इथल्या रेणुका माता मंदिरात,
५० टक्के पुजारी तसंच विश्वस्त मंडळात ५० टक्के महिला सदस्यांची नियुक्ती करावी, अशी
मागणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी काल नांदेड इथं पत्रकार परिषदेत
केली. यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भूमाता ब्रिगेडच्या वतीनं
निराधार मुलींच्या विवाहासाठी अर्थिक मदत देण्यात येणार असून, काल नांदेड इथं सहा मुलींना
अर्थिक मदतीच्या धनादेशाचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक शंकर सारडा यांचं काल पुण्यात निधन
झालं, ते ८३ वर्षांचे होते. महाबळेश्वर इथं जन्मलेले सारडा यांनी पत्रकारिता, समिक्षा,
बालसाहित्य, अशा क्षेत्रात यश संपादन केलं. बालसन्मित्र बाललेखांचं संपादन, साधना साप्ताहिकाचे
सहसंपादक, तसंच विविध दैनिकांमध्ये वगेगवेळ्या पदांवर त्यांनी काम केलं. त्यांच्या
इच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांचं नेत्रदान करण्यात आलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीच्या
दर्शनासाठी देण्यात येणाऱ्या दैनंदिन पासच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी
मंदिर संस्थानच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी मोफत पासची
संख्या १२ हजार इतकी होती, ती वाढवून २० हजार करण्यात आली आहे, तर पेड पास ची संख्या
दोन हजार वरुन दोन हजार ५०० करण्यात आली आहे. तसंच रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी ३०
हजार भाविकांना दर्शन घेता येईल.
****
नांदेडच्या दक्षिण मध्य रेल्वे विभागातून आतापर्यंत २५ किसान
रेल्वे सोडण्यात आल्याची माहिती, रेल्वे विभागानं दिली आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत
आणखी १०० किसान रेल्वे सोडण्याचं उद्दिष्ट असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. या किसान
रेल्वे मालवाहतूक दरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या भाडे सवलतीमूळे कृषी क्षेत्राला
मुक्त बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचं, रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या ३१ जानेवारी रोजी राष्ट्रीय
पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेअंतर्गत, एक लाख ७३ हजार बालकांना पोलिओची लस दिली जाणार असल्याचं,
जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत शुन्य ते पाच वर्षे
वयोगटातल्या बालकांना, पोलीओ लस देण्यात येणार आहे. यावेळी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या,
फिरत्या कामगारांच्या वस्त्या, बांधकामं या ठिकाणी असलेली बालकं लसीकरणापासून वंचित
राहू नयेत यासाठी विशेष लक्ष देण्याचं आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या सिंधी इथं परवा रविवारी
होणाऱ्या, १५ व्या राज्यस्तरीय लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, ज्येष्ठ साहित्यिक
डॉक्टर भगवान अंजनीकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते, या संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याचं
संयोजक दिगंबर कदम यांनी कळवलं आहे.
****
केंद्र शासनाच्या पथकाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करण्यात
आलेल्या तपासणीत, परभणी शहर महानगरपालिकेस उत्तम गुण मिळाले असून, शहर ओडीएफ प्लसप्लस,
म्हणजेच हागणदारी मुक्त म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त देविदास पवार
आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२१ चे व्यवस्थापक तन्वीर मिर्झा बेग यांनी ही माहिती दिली.
केंद्र शासनाने कालच याची घोषणा केल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं.
****
परळी-बीड-अहमदनगर या रेल्वे मार्गाचं काम राज्य शासनानं द्यावयाचा
निधी अद्याप न दिल्यानं रखडलं असल्याचं, बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांनी म्हटलं
आहे. बीड इथं काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. राज्य शासनाकडे याबाबत
आपल्या स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करावा, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
यावेळी केली.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झालेल्या नांदेड जिल्ह्याच्या
देगलूर तालुक्यातले पोलिस शिपाई रामलू आलूरे, यांच्या कुटुंबियांना काल ६० लाख रूपयांची
आर्थिक मदत, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात
आली. आठ ऑक्टोबर २०२० रोजी आलूरे यांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या
राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पाचच्या अहवालात, माता आणि बाल आरोग्य, पोषण,
प्रजनन, स्वास्थ्य या प्रमुख निर्देशांकांमध्ये, जिल्ह्यानं लक्षणीय प्रगती केली आहे.
जिल्ह्याची एकूण ५२ निर्देशांकांमध्ये सुधारणा झाल्याचं दिसून आलं असून, राज्याच्या
आकडेवारी सोबत तुलना केल्यास, जिल्हा ५९ निर्देशांकामध्ये राज्यापेक्षा पुढे आहे. याविषयी
अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर -
प्रसुतीपूर्व
आरोग्यसेवा, संस्थागत प्रसुती पूर्ण लसीकरण झालेली बालकं, लिंग गुणोत्तर प्रमाण यामधे
जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे. प्रसुतीपूर्व किमान चार तपासण्या पाच वर्षांखालील
वयाने वजन कमी असणाऱ्या बालकांचं प्रमाण कमी असणं आणि पाच वर्षांखालील बालकांची जन्मनोंदणी
करणं या निर्देशांकात उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. केंद्र सरकारच्या
नीती आयोगाकडून आकांक्षित जिल्हा परिवर्तन कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या आढावा
बैठकीत नीती आयोगाचे कार्यकारी अधिकारी श्री अमिताभ कांत यांनी याबद्दल उस्मानाबाद
जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचं अभिनंदन केलं आहे.
देविदास पाठक,
आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
नांदेड जिल्ह्यात भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात कालपासून कोविड
लसीकरणाला, तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी भोकर आणि भोसी
इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या १०५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली.
****
नांदेड तालुक्यातल्या फतेपूर गावातल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत
सदस्यांनी पुढाकार घेऊन, शाळेस ९० हजार रुपये रोख लोकवर्गणी जमा करून दिली आहे. या
लोकवर्गणीतून शाळेला रंग देणं, हातपंपावर मोटार, नळ जोडणी, हात धुण्याची जागा, शौचालयास
नळ जोडणी ही काम करण्यात आली आहेत, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी
यांनी दिली.
****
महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचं राज्यस्तरीय पक्षी मित्र
संमेलन, येत्या १० आणि ११ एप्रिल रोजी सोलापूरमध्ये होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने
राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील पक्षी मित्र, अभ्यासकांना भेटणं, त्यांचे शोध प्रबंध,
व्याख्यान ऐकण्याची संधी, सोलापूरकरांना मिळणार आहे.
****
पुणे, मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या भागावर असलेलं चक्रीवादळ
आता मराठवाड्यालगतच्या भागाकडे सरकलं आहे. येत्या चोवीस तासात हवामान कोरडं राहण्याची
शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment