Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 January 2021
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जानेवारी २०२१ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय मतदार
दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ
कोविंद सहभागी झाले होते. यावेळी डिजिटल मतदार ओळखपत्राचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय
कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी, नवमतदारांना डिजिटल मतदार ओळखपत्र प्रदान केले.
२०२०-२१ चे राष्ट्रीय पुरस्कार, त्याचबरोबर निवडणुकीशी संबंधित सर्वोत्कृष्ट कार्यासाठी
जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांना पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात
आले. निवडणूक आयोगाचा वेब रेडिओ 'हॅलो वोटर्स' चं यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
झालं.
****
दरम्यान, राष्ट्रीय
मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला शुभेच्छा दिल्या आहेत.
निवडणूक आयोगानं आपल्या लोकशाही मूल्यांना सुदृढ केलं, तसंच उत्तम प्रकारे निवडणुकांचं
आयोजन देखील केलं, मतदार नोंदणी विषयी विशेषतः युवकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा
हा दिवस असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
देशातली लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने
निवडणूक मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
जगात देशाचं
नाव उंचावण्याची जबाबदारी युवकांवर असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधानांनी आज राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी, दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या
माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या मुलांनी कोविड महामारीचा
सामना करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावली असल्याचं त्यांनी नमूद केलं. तुम्हाला पुढील
आयुष्यात अनेक यश संपादन करायचं आहे, ही केवळ एक सुरुवात असल्याचं, पंतप्रधान या मुलांना
म्हणाले.
२०२१ या वर्षाच्या
पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातल्या ३२ मुलांची निवड करण्यात आली आहे. नांदेडच्या कामेश्वर
वाघमारेची शौर्य श्रेणीत, जळगावचा अचित पाटील आणि नागपूरच्या श्रीनभ अग्रवाल याची नावीन्यपूर्ण
श्रेणीत, पुण्याच्या सोनित सिसोलेकरची ज्ञानार्जन श्रेणीत आणि मुंबईच्या काम्या कार्तिकेयनची
क्रीडा श्रेणीत राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
****
७२वा प्रजासत्ताक
दिन उद्या साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोंविद
राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे.
****
देशात काल नव्या
१३ हजार २०३ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, तर १३१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू
झाला. देशभरातल्या एकूण कोविड बाधितांची संख्या, एक कोटी सहा लाख ६७ हजार ७३६ झाली
असून, आतापर्यंत या विषाणू संसर्गानं, एक लाख ५३ हजार ४७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल १३ हजार २९८ रुग्ण बरे झाले असून, देशात आतापर्यंत एक कोटी तीन लाख ३० हजार ८४
रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. देशात सध्या एक लाख ८४ हजार १८२ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत. देशात आतापर्यंत १६ लाख १५ हजार ५०४ नागरिकांचं कोविड लसीकरण करण्यात आल्याची
माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.
****
इतर मागासवर्गीय
समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आरक्षणाचा पेच सोडवणं आवश्यक असून, त्यासाठी
आवश्यकता भासल्यास विधानसभेचं कामकाज बंद पाडू, असा इशारा माजी मंत्री आमदार बबनराव
लोणीकर यांनी दिला आहे. २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत एसीएसटी प्रवर्गाची जनगणना ज्याप्रमाणे
होते त्याचप्रमाणे ओबीसी प्रवर्गाची जनगणना देखील व्हावी, लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच
क्षेत्रातलं प्रतिनिधित्व त्यांना मिळावं या न्याय मागणीला लोकप्रतिनिधी म्हणून आपला
पाठिंबा असल्याचं लोणीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यात
बिलखेडा इथं सिमेंटचा ट्रक आणि कंटेनर मध्ये झालेल्या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा
जागीच मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला.
बुलडाणा जिल्ह्यात
नांदूरा-वडनेर मार्गावर काळी पिवळी आणि कंटेनरच्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू
झाला, तर नऊ जण जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.
****
बुलडाणा जिल्ह्याच्या
चिखली तालुक्यातल्या भानखेड इथं २०० गावरान कोंबड्यांचा मृत्यू झाला. तालुका पशुधन
अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत्युमुखी पडलेल्या तीन कोंबड्यांचे नमुने अकोला
इथं तपासणीसाठी पाठवले आहेत. खबरदारीच्या उपाययोजना पोल्ट्री व्यावसायिकांना कळवण्यात
येत असून, पक्षीपालकांनी कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात
कळवावं, असं आवाहन पशु वैद्यकीय अधिकार्यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी येत्या ३१ जानेवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. हा या मालिकेचा ७३वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व
वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
नाशिक जिल्ह्यात
थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. आज दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment