Wednesday, 27 January 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.01.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 January 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जानेवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      ७२वा प्रजासत्ताक दिन काल देशभरात हर्षोल्हासात साजरा.

·      मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयी विविध कार्यक्रमांसह ध्वजारोहण उत्साहात.

·      पुण्यातल्या येरवाडा कारागृहातून काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुरुंग पर्यटन सेवेचा प्रारंभ.

·      कृषी कायद्यांसंदर्भात सकारात्मक चर्चेतून तोडगा काढण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं पार पाडली नाही - खासदार शरद पवार यांची टीका.

·      शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी २३ कोटी रुपये निधी मंजूर.

आणि

·      नांदेड जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले तसंच नरहर कुरुंदकर पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान.

****

७२वा प्रजासत्ताक दिन काल देशभरात हर्षोल्हासात साजरा झाला. दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदा कोविड पार्श्वभूमीवर पथसंचलनाच्या अंतरात कपात करण्यात आली होती. या पथसंचलनात महाराष्ट्राची संतपरंपरा दर्शवणारा चित्ररथ सहभागी झाला होता.

****

मुंबईत शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्य शासनानं अतिशय जबाबदारीनं कोविड विरोधातली लढाई लढत, संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न केले, असं सांगून राज्यपालांनी, राज्यातल्या सर्व कोविड योद्ध्यांचं कौतुक केलं. गारपीट, निसर्ग चक्रीवादळ आणि अवकाळी पाऊस, बर्ड फ्ल्यू, अशा संकटाच्या मालिकांशी सामना करत राज्य पुढे वाटचाल करत असल्याचं, ते म्हणाले. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना केल्या असून, संकटातून संधी निर्माण करत, महाराष्ट्राच्या विकासाची परंपरा आपण कायम राखू, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केलं.

औरंगाबाद इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात देसाई यांनी, औरंगाबाद जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सातत्यानं वाढवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचं सांगितलं. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा त्यांनी आढावा घेतला

ऑरिक सिटी शेंद्रा येथे एका रशियन स्टील कंपनीच्या स्टील उत्पादनासाठी ४४ एकर जागेचे वाटप करण्यात आले आहे. या कंपनीत एक हजार कोटींची गुंतवणूक होवून स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. डीएमआयसी शेंद्रा येथे २०२० मध्ये ६२ एकरचे वीस भूखंड देखील वाटण्यात आले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थितीत जे सामंज्यस्य करार करण्यात आले. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात नवीन येणाऱ्या उद्योगांचा देखील समावेश आहे.

 

नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज पोलिस कवायत मैदानावर, पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पथसंचलनाची पाहणी करुन, नागरिकांना शुभेच्छा देताना चव्हाण यांनी, नांदेड शहर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या निर्णयाबाबत माहिती दिली –

राज्यातील नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाशी नांदेडला जोडता यावं यादृष्टीनं मी शासनाकडे प्रस्ताव मांडला. सन्मानीय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्याला होकार दिला. नांदेड ते जालना साधारणत: १९४ किमी स्वतंत्र समृद्धी मार्ग हा निश्चित तयार केला जाईल.यासंपूर्ण कामाला जवळपास साडेसहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे नांदेड ते मुंबईला जाण्याचा मार्ग अधिक सुकर आणि नजिकचा होणार आहे. त्यात वेळेचीसुध्दा बरीच बचत होणार आहे.

 

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दिव्यांगत्व आलेले सैनिक भास्कर गोरठकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ताम्रपत्र देवून गौरव करण्यात आला. कंधार तालुक्यातल्या घोडज इथला कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या शालेय विद्यार्थ्याला राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल, पालकमंत्री चव्हाण यांनी प्रशस्तीपत्र देऊन त्याचा गौरव केला.

 

जालना इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. कोविड योद्ध्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना, टोपे यांनी, प्रत्येकानं लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले –

आज आपल्या राज्यामध्ये आठवड्यातून जवळजवळ पाच दिवस आपण व्हॅक्सीनेशनचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.दररोज २८ हजार लार्भार्थ्यांना व्हॅक्सीन मिळावं अशा स्वरुपाचं आपलं नियोजन आज आपण करत आहोत. मी या निमित्तानं सर्वांना आवाहन करेन विनंती करेन की हा महत्वपूर्ण कार्यक्रम यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. आणि आप आपला टर्न ज्या ज्यावेळेस येईल त्या त्यावेळी जरुर व्हॅक्सीनेशन करुन घ्यावं. स्वत:ला सुरक्षित करा आणि इतरांना सुरक्षित ठेवा.

 

लातूर इथं पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते, ध्वजारोहण झालं. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा तसंच वीरपत्नी - वीरमातांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात देशमुख यांनी, जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला, ते म्हणाले –

विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करणारा लातूर जिल्हा सामाजिक, शैक्षणिक वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे. ही आनंदाची बाब असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वोत्तोपरी सहकार्य केलं जाईल. अशी मी याप्रसंगी ग्वाही देतो. लातूरची गौरवशाली पंरपरा राखत दमदार पावलं टाकत या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आपला नावलौकिक मिळवत राहिल.

 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीनं आयोजित ‘हिरकणी हाट’चं उद्घाटन, पालकमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अदिती देशमुख यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचं हे प्रदर्शन आणि विक्री येत्या ३१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. विकेल ते पिकेल या धोरणांतर्गत थेट ग्राहक भाजीपाला विक्री बाजाराचं देशमुख यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं.

 

उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. कृषी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यानं, नीति आयोगाचं तीन कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं, त्याबद्दल पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी, तसंच जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची, गडाख यांनी माहिती दिली. उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन यांना, उत्कृष्ट तपासाबाबत केंद्रीय गृहमंत्री यांचं पदक मिळाल्याबद्दल, त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. बीडचे पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांना पोलिस शौर्य पदक जाहीर झाल्याबद्दल, त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वच्छता अभियानात पारितोषिक मिळालेल्या चार ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

परभणी इथं पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सशक्त राज्यघटनेमुळे देशात गेली ७१ वर्ष लोकशाही अबाधित राहिली, असं प्रतिपादन मलिक यांनी केलं. आरोग्य सुविधा आणि शासकीय रुग्णालय अद्ययावत करणार असल्याची ग्वाही मलिक यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांना न्याय तसंच सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी नवी पावलं उचलण्याचे संकेतही मलिक यांनी दिले. सोन्ना गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार पालकमंत्री मलिक यांच्या हस्ते करण्यात आला.

 

हिंगोली इथं पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झालं. कोविड प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या यशस्वी कामगिरीमुळे, हिंगोली जिल्ह्याने राज्यात एक वेगळा पॅटर्न निर्माण केल्याचं, गायकवाड यांनी नमूद केलं. गायकवाड यांच्या हस्ते वीरमाता तसंच वीरपत्नींचा गौरव करण्यात आला. प्रशासकीय सेवेत उत्तम काम करणारे अधिकारी कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, क्रीडापटू तसंच प्रशिक्षकांचा पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

****

पुण्यातल्या येरवाडा कारागृहात काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तुरुंग पर्यटन सेवेचा प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीतले अनेक क्रांतिकारक तसंच कार्यकर्ते येरवाडा तुरुंगात बंदिस्त होते, त्यांच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला. कारागृहात बंदीस्त मनुष्यबळाचा सकारात्मक वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारं संस्‍कार केंद्र व्हावं, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मुंबईत पाच विभागीय सायबर पोलिस ठाण्यांचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं. ९४ पोलिस ठाण्यातल्या स्वागत कक्षांचंही, यावेळी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं. सायबर क्राईम करणाऱ्या न दिसणाऱ्या शत्रूसोबत आपलं युद्ध आता अधिक सक्षमतेनं सुरू झालं असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

नागपुरात काटोल मार्गावर विकसित बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या उद्यानात, वन्यप्राणी बचाव केंद्र, इंडियन सफारी, आफ्रिकन सफारी, जैवविविधता उद्यान तसंच नाईट सफारीचा समावेश आहे. वन पर्यटनासोबत विदर्भातली आदिवासी संस्कृतीही जागतिक पर्यटकांना कळावी, यासाठी गोंडवाना थीम पार्क अथवा गोंडवाना थिम विलेज नागपुरातच निर्माण करणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****

कृषी कायद्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्याची जबाबदारी सरकारनं पार पाडली नाही, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाच्या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकारांशी बोलत होते. केंद्र सरकारने टोकाची भूमिका सोडावी, आणि शेतकऱ्यांशी संवाद तुटू देऊ नये, असं आवाहन पवार यांनी केलं. या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी आवश्यकता असल्यास, मध्यस्थी करायला आपण तयार असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत काल झालेल्या काही हिंसक घटनांचं समर्थन होऊ शकत नाही, असंही पवार म्हणाले. 

 

दरम्यान, दिल्लीत काल झालेल्या हिंसक निदर्शनाविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्रांनी हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, यासह नियमांचं उल्लंघन, दंगल केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आले. कालच्या घटनेत सुमारे ८६ पोलिस जखमी झाले आहेत.

 

दिल्ली इथल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीला पाठिंबा देण्यासाठी किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन आणि डाव्या संघटनांच्या वतीनं, काल औरंगाबाद इथं ट्रॅक्टर आणि दुचाकी फेरी काढण्यात आली. शेतीमालाला हमीभावाबद्दल केंद्र सरकारनं कायदेशीर संरक्षण देण्याच्या मागणीचा, आंदोलकांचे नेते सुभाष लोमटे यांनी पुनरुच्चार केला.

****

राज्यात काल दोन हजार ४०५ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख १३ हजार ३५३ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. राज्यात या संसर्गाने दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ८६२ झाली असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. तर काल २ हजार १०६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख १७ हजार ४५० रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९५ पूर्णांक २४ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ४३ हजार ८११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नांदेड, तसंच औरंगाबाद इथं काल प्रत्येकी एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात ५६, औरंगाबाद जिल्ह्यात २१ आणि परभणी जिल्ह्यात काल सात नवे रुग्ण आढळून आले.

****

राज्यात पाचवी ते आठवीच्या शाळांचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. यासाठी शाळांनी कोविड संदर्भात सर्व नियमांचं पालन करणं तसंच पालकांकडून संमतीपत्र घेणं, आवश्यक आहे.

****

छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी, २३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. राज्यात गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं ही घोषणा महत्त्वपूर्ण आहे. या निधीतून प्रामुख्याने अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचं पुनरुज्जीवन, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शक आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, आदी कामं केली जाणार आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेचे सावित्रीबाई फुले तसंच नरहर कुरुंदकर पुरस्कार, काल पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. कुसुम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संध्या बारगजे तसंच बेबीसुरेखा शिंदे यांना, सावित्रीबाई फुले पुरस्कारानं, तर डॉ. सुरेश सावंत आणि आशा पैठणे यांना, नरहर कुरुंदकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, आणि दीड लाख रुपये, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

किनवट तालुक्यात आदिवासी भागातल्या मुलांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एनईईटी परीक्षेची चांगली तयारी करता यावी, यासाठी “मिशन नीट-2021” हा उपक्रम किनवट-बोधडी इथल्या शासकीय आश्रमशाळेत सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा शुभारंभही पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य वितरित करण्यात आलं.

भोकर विधानसभा मतदार संघात जनतेची कामं व्यवस्थित व्हावीत, या उद्देशाने उभारलेल्या अशोक चव्हाण सेतू सुविधा केंद्राचं उद्घाटन, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या हस्ते, दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आलं.

****

राज्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला २०२४ पर्यंत नळजोडणी दिली जाणार असून, प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लीटर पाणीपुरवठा करणार असल्याचं, राज्याचे पाणीपुरवठा तसंच स्वच्छता राज्यमंत्री, संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. काल लातूर जिल्ह्यात उदगीर इथं, जलजीवन अभियानाबाबत जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते.

****

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...